आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘वालस पावूला’ : सोमलता सुभाषशिंगे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगीत, नृत्य, रंगांचा वापर करत ‘वालस पावूला’ बालनाट्य मनावर सखोल, सकारात्मक परिणाम करते. अशी संहिता लिहिण्यासाठी केवळ रंगतंत्रावर कमांड उपयोगाची नाही, तर त्याबरोबर निखळ, तरल मनसुद्धा आवश्यक आहे. हा निखळपणा आपल्या प्रत्येक कलाकृतीत जपणाऱ्या सोमलता सुभाषसिंगेंबद्दल ...

 

साखळी बॉम्बस्फोटाने श्रीलंकाच नाही, तर सगळं जग हादरलं. स्थिर होऊ पाहणारा श्रीलंका पुन्हा अस्वस्थ, अस्थिर वाटू लागलाय. आजवरची त्याच्या अस्वस्थतेची कारणं भाषेशी, संस्कृतीशी निगडित होती.  भूगर्भातल्या अस्थिरतेची परिणती जशा प्रचंड ज्वालामुखीच्या रूपानं बाहेर येते तसंच सांस्कृतिक, वैचारिक अस्वस्थतेमुळे अत्यंत प्रभावी कलाकृती निर्माण होतात. मग श्रीलंकेच्या सांस्कृतिक पटलावर काय घडत होतं? तीव्र द्वेष, प्रचंड हिंसेचं  प्रतिबिंब तिथल्या कलाकृतीत कसे उमटले? याचा शोध लंकेतील प्ले हाऊसवर स्थिरावला. गेली चार दशकं यशस्वीपणे चालू असलेली सोमलता सुभाषशिंगे आणि त्याचं चिल्ड्रन्स थिएटर. बाल आणि युवा रणभूमी, त्यातून नाटक, टीव्ही, सिनेमाच नाही तर इतर अनेक क्षेत्रात योगदान देणारे प्ले हाऊसचे हे  विद्यार्थी, दुर्लक्षून चालणार नाही. उन्हाळी शिबिराप्रमाणे आपली बाल रंगभूमी सिझनल आहे. पण प्ले हाऊसचे संकेतस्थळ बघितले तर प्रत्येक महिन्याचे भरगच्च कार्यक्रम, वर्षभर चालणाऱ्या नाट्य प्रयोगाचे कॅलेंडर पाहायला मिळते.
सोमलतांनी रंगभूमीवर अभिनेत्री म्हणून पाऊल ठेवलं. प्रो. सरतचंद्र यांच्या एलोवा गिलीन मेलोवा आणि रथथरां पासून सुरु झालेला हा प्रवास सिनेमापर्यंत पोहोचला. आज श्रीलंकन सिनेमातील सर्वोत्कृष्ट भूमिका म्हणून सोमलतांच्या महाजदारा, विराग्य, सुदु कालुवारा या भूमिकांकडे बघितले जाते. 


१९८१ मध्ये सोमलतांनी Lanka Children’s and Youth Theatre Foundation (LCYTF) ची स्थापना केली. लहान मुलांमध्ये खिलाडू वृत्ती, कलासक्ती वाढून त्या अनुषंगानं सृजनात्मकता वाढावी म्हणून LCYTF स्थापना करण्यात आली होती. LCYTF लाच पुढे प्ले हाऊस म्हणून संबोधले जाऊ लागले. केवळ अभिनय, नाट्य प्रशिक्षणच नाही तर संगीत रसग्रहण, चित्रकला, भाषा, पपेट्री इत्यादींचा समावेश करून सोमलतांनी तयार केलेल्या अभ्यासक्रमातून लंकन सिनेमा, टीव्ही, नाट्य क्षेत्राला उत्तम अभिनेते, दिग्दर्शक, लेखकच मिळाले नाही तर इतर क्षेत्रात सृजनात्मक कार्य करणारे उच्चपदस्थ प्ले हाऊस चे विद्यार्थी आहेत. नाटककार, दिग्दर्शक म्हणून सोमलतांचे योगदान मोठे आहे.  त्यांनी लेखक आणि दिग्दर्शक म्हणून लंकेच्या तात्कालिक परिस्थितीवर वारंवार भाष्य केलेले आढळते. लंकेतील शैक्षणिक क्षेत्रातल्या गोंधळावर बेतलेले विकृती, बुद्दिस्ट तत्वज्ञानावर आधारलेले संदा किंदुरू, गार्सिया लोऱका च्या येरमा वर आधारित मुदु पुथ्थु, लंकेतील समाजवादावर आधारित पवारा नुवारक, ब्रेख्तच्या च्या मदर करेज अँड हर चिल्ड्रनवर आधारित मवाकाजे संग्रामाया सारख्या उत्तम प्रयोगांची जंत्रीच समोर येते. सोमलतांनी लिहिलेले “वालस पावूला” या बालनाट्याचे प्रयोग आजही लंकेत हाऊस फुल्ल असतात.  वालस पावूला ही एका  मुलीची गोष्ट आहे. आजची मुलं जशी  टीव्ही, मोबाइल आणि इतर गॅजेट्समधे असतात त्याच प्रमाणे हि मुलगीसुद्धा  तिच्या कडे असलेल्या निर्जीव खेळण्यातच मग्न असते. एक दिवस आई-वडील घरी नसताना तिला या खेळण्यांचा कंटाळा येतो. आई-वडिलांनी बजावलेले असतानाही ती जवळच्या जंगलात जाते. तिथला रम्य निसर्ग पहिल्यांदाच पाहते. निर्जीव खेळण्यांपेक्षा हे किती तरी जास्त मजा देणारे आहे या भावनेने ती थकेपर्यंत खेळते.  तेवढ्यात तिथे एक भालू कुटुंब येते. ती त्यांच्याबरोबरसुद्धा रमते. मुलांमध्ये निखळ प्रेम, निसर्गाप्रती आत्मीयता वाढीस लावायची असेल तर हे नाटक त्यांना अवश्य दाखवले पाहिजे अशी लंकेत मान्यता आहे. संगीत, नृत्य,रंगांचा वापर करत हे नाटक बाल मनावर सकारात्मक परिणाम करते. अशी संहिता लिहिण्यासाठी केवळ रंगतंत्रावर कमांड उपयोगाची नाही, तर त्या बरोबर निखळ, तरल मनसुद्धा आवश्यक आहे.  सोमलतांचा हा निखळपणा त्यांच्या प्रत्येक कलाकृतीत जाणवतो. प्ले हाऊस आता सोमलता सुभाषसिंगे प्ले हाऊस नावाने ओळखले जाते. प्ले हाऊसच्या संकेतस्थळावर “Our vision is to impact children and youth to view the world from the widest perspective” ही ओळ ठळक अक्षरात लिहिलेली आहे. श्रीलंकेतील अस्थिरता अराजकाकडे न वळता शांततेकडे जावी, प्ले हाऊसला त्यांचे मिशन पुढे नेता यावे ही सदिच्छा!