आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व शिवसेना एकत्र येत असल्याच्या पार्श्वभूमीवर दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सातव्या स्मृतिदिनी शिवाजी पार्कवर रविवारी अलोट गर्दी उसळली होती. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या ठिकाणी उपस्थिती लावून बाळासाहेबांच्या स्मृतीसमाेर अभिवादन केले.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सकाळी स्मृतिस्थळी येऊन अभिवादन केले. शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचे बाळासाहेबांना उद्धव यांनी दिलेले वचन पूर्ण करण्यास आपण सर्वतोपरी मदत करणार आहोत, असे भुजबळ म्हणाले. काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी मात्र शिवाजी पार्ककडे पाठ फिरवली. नाही म्हणायला काँग्रेसचे नेते भाई जगताप येऊन गेले. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अभिवादन केले. शिवसेनेच्या निर्वाचित सर्व आमदारांची हजेरी होती. शिवसेना राज्यात सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नात असल्याने यंदाच्या स्मृतिदिनी दादरचे शिवाजी पार्क गजबजले होते. कार्यकर्त्यांत कमालीचा उत्साह दिसला.
दुपारी बाराच्या सुमारास अामदार आदित्य, तेजस, उद्धव आणि रश्मी या ठाकरे कुटुंबीयांनी एकत्रित येऊन बाळासाहेबांना अभिवादन केले. तत्पूर्वी खासदार संजय राऊत यांनीही स्मृतिस्थळावर नतमस्तक हाेत ‘मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार’ असा पुनरुच्चार केला.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी टि्वटरवर बाळासाहेबांना अभिवादन करताना शिवसेनेला हिंदुत्व व स्वाभिमानाची आठवण करून दिली हाेती. त्यावर पत्रकारांनी विचारले असता ‘आम्हाला कोणी शहाणपण शिकवू नये. हिंदुत्व, राष्ट्रीयत्व, स्वाभिमान या सर्वांची त्यांना उत्तरे दिली जातील. काहीही झाले तरी सत्ताकेंद्र मातोश्री असेल,’ असे प्रत्त्युत्तर राऊत यांनी दिले. शिवसेनेचे बहुतांश अामदार, सर्व पदाधिकारी व खासदारांची उपस्थिती हाेती. त्यात अरविंद सावंत, सुभाष देसाई, मनोहर जोशी, सचिन अहिर, नीलम गोऱ्हे, अनिल देसाई, रामदास कदम, प्रताप सरनाईक, दीपक सावंत, दिवाकर रावते, दीपक केसरकर, उदय सामंत, अब्दुल सत्तार, रवींद्र वायकर, संजय राठोड, आनंदराव अडसूळ यांचा समावेश होता.
दरवर्षी प्रमाणे यंदाही स्मृतिस्थळावर सकाळपासूनच शिवसैनिकांनी हजेरी लावली होती. मुंबईसह राज्यभरातून शिवसैनिक आले हाेते. अब की बार ठाकरे की सरकार, शिवसेना जिंदाबाद, बाळासाहेब ठाकरे अमर रहे, अशा घोषणा उपस्थित शिवसैनिकांकडून सातत्याने दिल्या जात हाेत्या. स्मृतिस्थळासमोर ‘जय श्रीराम’ अशी रांगोळी काढण्यात आली होती. तसेच शिवाजी पार्कवर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
ठाकरे कुटुंबीय निघून गेल्यावर स्मृतिस्थळी आले देवेंद्र फडणवीस
युती तुटल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते अभिवादनास येतील की नाही अशी चर्चा हाेती. मात्र, माजी मंत्री विनोद तावडे व पंकजा मुंडे यांनी सर्वप्रथम हजेरी लावून हा संभ्रम दूर केला. ठाकरे कुटुंबीय निघून गेल्यानंतर काही वेळाने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शिवाजी पार्कवर येऊन स्मृतिस्थळाचे दर्शन घेतले. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्याशिवाय शिवसेनेचा इतर काेणताही माेठा नेता तेव्हा हजर नव्हता. फडणवीस परत जाऊ लागले तेव्हा ‘मी पुन्हा येईन… मी पुन्हा येईन...’ अशी घाेषणाबाजी करत शिवसैनिकांनी त्यांची खिल्ली उडवली.
मुस्लिम शिवसैनिकांनी चढवली भगवी चादर
शिवाजी पार्कवर मुस्लिम शिवसैनिकांची उपस्थिती डोळ्यांत भरण्याजोगी होती. यापैकी अनेकांनी भगवे कपडे परिधान केले होते. मुंबईतील मुस्लिम शिवसैनिकांनी आपल्या लाडक्या नेत्याच्या स्मृतिस्थळावर भगवी चादर चढवून अनोखे अभिवादन केले.
दाेन्ही काँग्रेसची साथ साेडा हीच श्रद्धांजली : आठवले
नवी दिल्ली - बाळासाहेबांना खरी आदरांजली वाहायची असेल तर शिवसेनेने दाेन्ही काँग्रेसची साथ साेडावी, असे आवाहन रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलेे. शिवसेनेने पुढच्या वेळी मुख्यमंत्रिपद घ्यायला हवे हाेते, असेही ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.