आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना कार्यकर्त्याची भाजपा पदाधिकारीच्या मोबाईल दुकानावर दगडफेक; सामानांची केली तोडफोड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संतोष उगले  

औरंगाबाद - शिवसेनेच्या कार्यकर्त्याने वाळूज परिसरातील भाजप पदाधिकाऱ्याच्या मोबाइलच्या दुकानावर आज (बुधवार) दुपारी दगडफेक करत दुकानातील संगणकाची तोडफोड केल्याची घटना घडली. दुकानात केलेली तोडफोड सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या कार्यकर्त्याने दोन दिवसांपूर्वी फेसबुकवर लाइव्ह करून पदाधिकाऱ्याला धमकी दिली होती.
 
रवी ऊर्फ दीपक काळे असे युवकाचे नाव आहे. दीपकने भाजपा पदाधिकारी जय भवानी चौक, बजाजनगर येथील श्री मोबाइल्स या दुकानावर सोमवारी दगडफेक करत दुकानातील संगणकाची तोडफोड केली. त्याने दोन दिवसांपूर्वी फेसबुक लाइव्ह करून धमकी दिली होती. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल रोडे व पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी दीपकला ताब्यात घेतले असून प्रकरणाची चौकशी करत आहेत.  सदरील पदाधिकारी भाजपचे बंडखोर उमेदवार राजू शिंदे यांचे काम करत असल्याचा रोष मनात धरून हा प्रकार घडल्याची चर्चा सुरू आहे. 
 

युवकाचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही -  संजय शिरसाठ 
संबधित कार्यकर्ता शिवसेनेचे उपरणे डोक्याला बांधून आला होता. यावरून हा पूर्वनियोजित कट असून त्याचे मुख्य सूत्रधार कोण याची माहिती घ्यावी असे संतोष चोरडिया यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले. दरम्यान  दगडफेक करणाऱ्या तरुणाशी शिवसेनेचा काही संबंध नाही. स्वतःच्या वैयक्तिक कारणामुळे हा हल्ला केला असावा असे आमदार संजय शिरसाठ यांनी सांगितले.