आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूरसाठी भाजप-सेना ‘मॅनेज’ झाल्याची शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांची भावना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल मीडियीवर व्हायरल झालेल्या पोस्ट - Divya Marathi
सोशल मीडियीवर व्हायरल झालेल्या पोस्ट

लातूर - लातूरमध्ये भाजप आणि शिवसेना काँग्रेसला ‘मॅनेज’ असल्याची चर्चा पूर्वीपासून चालायची. त्याला किनार होती ती दिवंगत नेते विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्यातील मैत्रीची. मात्र राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर यामध्ये फरक पडलाय असे वाटत असतानाच पूर्वी स्थानिक पातळीवर ‘मॅनेज’ होणारी सेना-भाजप यावेळी वरिष्ठ पातळीवरूनच ‘मॅनेज’ झाल्याची जोरदार चर्चा लातूरमध्ये सोशल मीडियावरून सुरू आहे. विशेष म्हणजे त्यामध्ये खुद्द सेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांच्या शेजारच्या जिल्ह्यातील भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांचा राज्यभर दबदबा होता. परंतु या दोघांनी एकमेकांना आतून मदत करीत पूरक राजकारण केल्याचा ठपका ठेवण्यात आला. लातूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात या दोघांनीही आपण एकमेकांना कशी मदत करायचो याचे गुपित उलगडून सांगितले होते. मात्र २०१४ साली केंद्रात आणि राज्यात सत्ताबदल झाला. जुनी भाजप संपली. मोदी-शहांच्या नव्या भाजपचा उदय झाला. देवेंद्र फडणवीसांनी आक्रमक राजकारण सुरू केले. प्रारंभी लातूरच्या पालकमंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांनी अमित देशमुखांशी राजकीय मैत्री केल्याच्या चर्चा होत्या. मात्र संभाजी निलंगेकर यांना पालकमंत्री करून काँग्रेसच्या ताब्यातील पंचायत समित्या, नगर पालिका, महापालिका, जिल्हा परिषद या संस्था भाजपने आपल्याकडे खेचून घेतल्या. तेव्हा ‘मॅनेज’ होण्याचा प्रकार थांबल्याचे बोलले जाऊ लागले. परंतु विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी भाजपची ताकद असलेला आणि त्यांच्याकडे तगडा उमेदवार असतानाही भाजपने तो मतदारसंघ सेनेच्या पदरात टाकला. शिवसेनेने त्यापुढे एक पाऊल टाकत लातूरमधील एकाही पदाधिकाऱ्याकडे विचारणा न करता मुंबई-पुण्यात राहणाऱ्या सचिन देशमुख या नवख्या व्यक्तीला थेट एबी फॉर्मच बहाल केला. यामुळे लातूरचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले. त्यातून लातूर ग्रामीणची जागा विलासराव देशमुखांचे कनिष्ठ चिरंजीव धीरज यांच्यासाठी ‘मॅनेज’ केल्याची चर्चा सुरू झाली आहे. बुधवारी पहाटे जेव्हा भाजप-सेनेचे कार्यकर्ते भेटले तेव्हा एकमेकांकडे आपले साहेब नेमके कशात ‘मॅनेज’ झाले अशी विचारणा करताना पाहायला मिळाले.
 

कोण हे सचिन देशमुख ?
सेनेने ज्यांना लातूर ग्रामीणची उमेदवारी दिली ते सचिन देशमुख काेण अाहेत, अशी विचारणा कार्यकर्ते एकमेकांना करीत होते. सेनेला राजकीय तडजोडीत हा मतदारसंघ घ्यावा लागला तरी त्यांच्याकडे सहसंपर्कप्रमुख बळवंत जाधव यांच्यासारखे पदाधिकारी उपलब्ध होते. परंतु सेनेने  देशमुख यांना  उमेदवारी दिली. त्यांची साधी ओळखही कुणाला नाही. लातूरनजीकच्या सारोळा येथील मूळचे रहिवासी असलेले  देशमुख मुंबई, पुण्यात राहतात असे सांगण्यात आले. त्यांचा व्यवसाय काय, त्यांनी उमेदवारी कशी मिळवली हे गुलदस्त्यात आहे.
 

लातूर शहरही ‘मॅनेज’ होणार ?
दरम्यान, लातूर शहरातही अमित देशमुखांना सोयीचा उमेदवार दिला जाईल, अशी चर्चा बुधवारी दिवसभर होती. एकतर ही जागा सेनेला सोडली जाईल किंवा मित्रपक्ष असलेल्या रिपाइंला सोडली जाईल, अशी चर्चा करीत राजकीय पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांच्या नेत्यांची खिल्ली उडवली. देशमुख बंधूंनी मतदारसंघात अनेकांना मॅनेज करण्याऐवजी मुंबईतील दोघांनाच मॅनेज केल्याच्या चर्चेला ऊत आला आहे.