आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Shiv Sena Candidates Couple Of Sangli Got Honourable Place In The Oath Taking Ceremony

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'सोनिया'चा दिनू आज अमृते पाहिला...! सांगलीच्या शिवसैनिक पती-पत्नीस मिळाले शपविधीवेळी मानाचे स्थान

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली : त्यांना कधी स्वप्नातही वाटले नव्हते की उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीला त्यांना मानाचा पाट मिळेल. पण, उद्धव यांनी दौऱ्यात दिलेला शब्द आठवणीत ठेवून या सच्च्या शिवसैनिकाला शपथविधीच्या सोहळ्याचे निमंत्रण धाडले, आणि जत तालुक्यातील सावंत पती-पत्नीच्या जीवनात २८ नोव्हेंबरचा दिवस चक्क सोनियाचा उगवला.

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी नोव्हेंबरमध्ये उद्धव ठाकरे सांगली दौऱ्यावर गेले हाेते. तेथे त्यांना बनाळी-बनशंकर गावी संजीवकुमार सावंत हा शिवसैनिक भेटला. त्याने उद्धव यांना 'तुम्ही मुख्यमंत्री होणार आहात, असा भाव मी कार्तिक वारीला पंढरपूरला गेलो असाताना साक्षात विठ्ठलाच्या चेहऱ्यावर पाहिला' असे सांगितले. तसेच, सावंत यांनी उद्धव यांना पंढरीच्या चंद्रभागेचे तीर्थ आणि विठ्ठलाच्या पायाची तुळशीची माळ प्रसाद म्हणून दिली हाेती. हे ऐकून उद्धव पार भारावून गेले.

'साहेब, तुमचा शपथविधी मला पायरीवर बसून सपत्नीक अनुभवायचा आहे, अशी इच्छा सावंत यांनी उद्धव यांच्याकडे बोलून दाखवली. 'अरे, मी मुख्यमंत्री होताना तुला शपथविधीला नक्की बोलावतो, असा शब्द उद्धव सावंत याला देऊन आले. योगायोगाने उद्वव यांचे मुख्यमंत्रिपदाचे गणित जुळले. त्यांनी आठवणीत ठेवून बनाळीच्या सावंत पती-पत्नीस आमंत्रण देण्याचे फर्मान सोडले. रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत यांनी लागलीच सांगलीचे शिवसेना जिल्हाप्रमुख यांना कळवले आणि सावंत कुटुंबाला शपथविधीच्या सोहळ्यासाठी बोलावण्यात आले.

दांपत्याचा सत्कार
 
शपथविधिनंतर उद्धव यांनी सावंत पती-पत्नीला व्यासपीठावर बोलावून घेतले व त्यांचा सत्कार केला. हे सर्व पाहून सांगायला माझ्याकडे शब्द नाहीत. सोनियाचा दिनू आज अमृते पाहिला, मी फक्त इतकेच म्हणेन, असे सावंत यांनी सत्कारानंतर सांगितले. साक्षात मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी न्योता आल्याने बनाळी-बनशंकरी गावचे अनेक शिवसैनिक सावंत पती-पत्नीबरोबर आले होते.

आता दरवर्षी २८ नाेव्हेंबरला पंढरीची वारी : सावंत
 
'मी व माझ्या पत्नीने यावेळी पंढरीला पायी कार्तिक वारी केली. ती केवळ उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी केली होती. आजचा दिवस शिवसैनिकांसाठी ऊर्जादिन आहे. यापुढे दरवर्षी २८ नोव्हेंबरला मी पंढरीची वारी करणार,' असे संजीवकुमार सावंत यांनी 'दिव्य मराठी'ला सांगितले.


आमच्या घरात वारीची परंपरा आहे. मात्र, मी उद्धव साहेब मुख्यमंत्री व्हावेत यासाठी पहिल्यांदा वारी केली, असे सांंगत उद्धव साहेबांनी आता शेतकऱ्यांच्या समस्या दूर कराव्यात, अशी इच्छा संजीवकुमार सावंत यांच्या पत्नी रूपाली यांनी व्यक्त केली.