आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्या आयुष्यातील दुष्काळ कायमचा संपवायचा असेल तर सेनेचा राजकीय दुष्काळ तुम्हीच घालवा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- बीड जिल्हा जसा पावसाच्या बाबतीत दुष्काळी आहे तसा तो शिवसेनेसाठी राजकीय दुष्काळी आहे. हा राजकीय दुष्काळ हटला पाहिजे. तुमच्या आयुष्यातील हा दुष्काळ कायमचा संपवायचा असेल तर इथला शिवसेनेचा राजकीय दुष्काळही तुम्हालाच हटवावा लागेल. एक दुष्काळ मी हटवतो, दुसरा दुष्काळ तुम्ही हटवा, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील जनतेला शिवसेनेच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले. 

 

बीड शहरातील आशीर्वाद लॉन्सच्या पाठीमागील सहा एकर मैदानात बुधवारी दुपारी साडेबारा वाजता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पशुखाद्य वाटप व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. बीडमध्ये सकाळी पोहोचल्यानंतर ठाकरे यांनी तालुक्यातील म्हाळसजवळा गावाला भेट देऊन शेतकऱ्यांना पशुखाद्याचे वाटप केले. त्यानंतर बीडला येऊन सभा घेतली. या वेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरणमंत्री रामदास कदम, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी मंत्री बदामराव पंडित, प्रा. सुनील धांडे, आमदार नीलम गोऱ्हे, खासदार रवी गायकवाड, चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, कुंडलिक खांडे, बाळासाहेब पिंगळे, बाळासाहेब अंबुरे, सुशील पिंगळे आदी उपस्थित होते. या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, नवीन वर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा देत असून अच्छे दिन नव्हे तर नवे वर्षच अच्छे असले पाहिजे. ते आणण्यासाठी आपल्याला तयारी करावी लागणार आहे. आपल्याला कोण थापाड्या आणि कोण चांगले आहे हे कळले पाहिजे. ज्या-ज्या वेळी शेतकऱ्यावर संकटे येतात तेव्हा शिवसेनाच मदतीला येते. आम्ही नुसत्या घोषणा करून जगत नाही. आज दुष्काळाने महाराष्ट्र होरपळत आहे. राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी राज्य सरकारला दुष्काळ शोधण्यासाठी यंत्रणा कामी लावावी लागत आहे. आज विहिरीला पाणी नाही. शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय पथक येऊन गेले. हातात काही आलेच नाही. जे आज गाजर दाखवतात त्यांना ते वाटण्याची हिंमत नाही, असेही ठाकरे यांनी सांगितले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला चांगली शिकवण दिली आहे. खोटे बोलून मला मत नको आहे. मी सत्तेत आहे. मी माणुसकी विसरत नाही. आम्ही सत्तेत आहोत. या सत्तेच्या झुली आहेत, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

 

दुधी हलवा आणि हास्याचे फवारे 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात जत्रेतील दुधी हलव्याचा किस्सा सांगितला. जत्रेत दुधी हलव्याची पाटी लिहिलेली असते. लोक तिकीट काढून पाहण्यासाठी जातात तेव्हा तो त्यांना मिळत नाही. तेव्हा लोकांची फसवणूक झालेली असते. तेव्हा हास्याचे फवारे उडाले. अशीच फसवणूक राज्य सरकारने केली आहे. मराठवाड्याची ही माझी शेवटची भेट नाही, तर मी परत येणारच आहे. सरकारी यंत्रणेचा सुस्त अजगर ढोसण्यासाठी मी परत येणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी बीडकरांना आवर्जुन सांगितले. 

 

कर्जमाफी मिळाली का.. गॅस मिळाला का ? 
उद्धव ठाकरे यांनी सभेत व्यासपीठावरूनच शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांना उद्देशून ते म्हणाले, तुम्हाला कर्जमाफी मिळाली का? नक्की सांगा, असा प्रश्न केला. तेव्हा शेतकऱ्यांनी नाही असे उत्तर दिले. महिलांच्या दिशेने पाहून तुम्हाला उज्ज्वला योजनेचा गॅस मिळाला का, असा प्रश्न केला तेव्हा महिलांनीही नाहीच उत्तर दिले. 

 

पीक विमा हा रफालपेक्षाही मोठा घाेटाळा : जालन्यातील सभेत ठाकरे यांचा आरोप 
भाजपकडून केवळ आश्वासने दिल्या जात आहेत. २०१२ मध्येही दुष्काळात शिवसेनेने आंदोलन केले आहे. कर्जमुक्तीची मागणी असताना भाजपने ती फक्त कर्जमाफी केली आहे. पीक विमा किती भरला, त्यातून किती मिळाला हे पाहिले जात नाही. कुण्या शेतकऱ्यांना पाच तर काहींना शंभर रुपयांपर्यंत मदत मिळाली आहे. त्यामुळे पीक विम्याचा घोटाळा हा रफालपेक्षाही मोठा निघेल, असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जालना येथे सभेत केला. ठाकरे म्हणाले, शेतकऱ्यांनी भरलेल्या विम्याच्या हप्त्यातून मोठ्या प्रमाणात रक्कम जमा झाली आहे. परंतु, त्या प्रमाणात वाटप कमी आहे. यातून विमा कंपनीचेच भले झाले आहे. यात भाजपचाही हात अाहे. हा रफालपेक्षाही मोठा घोटाळा आहे. 

 

गुरांसाठी हौदाची व्यवस्था 
शेतात गोठ्यातील गाय किंवा बैल हा आपल्या कुटुंबातील एक सदस्य असतो. आपल्याला खायला मिळालं नाही तरी चालेल, मात्र गोमातेला, बैलाला खायला मिळालं पाहिजे, असं म्हणून उपाशी राहणारे शेतकरी मी बघितले आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. यामुळेच या जनावरांचे दुष्काळात पाण्यावाचून हाल होऊ नयेत म्हणून शिवसेना त्यांच्यासाठी हौदाची व्यवस्था करणार असल्याचे ठाकरे म्हणाले. 

 

२० हजार कोटींची कर्जमाफी गेली कुठे? 
मी उडत विदेश दौरे करत नाही, मी माझ्या दुष्काळी मराठवाड्यात फिरत आहे, दुष्काळी बातम्या बघून मी शांत बसणार नाही, बसलो तर शिवसेनाप्रमुख मला माफ करणार नाहीत. निवडणुका येतात-जातात, जाहीर होतील तेव्हा होतील. अन्नदाता शेतकरी जगला पाहिजे. दावणीला चारा की छावणीला? परंतु आम्ही घरपोच देऊ. परतीचा पाऊस परतलाच नाही, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. सरकार सुस्त आहे. २० हजार कोटींची झालेली कर्जमाफी गेली कुठे, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गेवराई येथे कार्यक्रमात केला. 

 

माजी मंत्री बदामराव पंडित यांच्या निवासस्थानाजवळील मैदानावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना बुधवारी पशुखाद्य वाटप केले. या वेळी शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे, रामदास कदम, खासदार चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख सुधीर मोरे, माजी मंत्री बदामराव पंडित, मिलिंद नार्वेकर, विलास महाराज शिंदे, मिलिंद मांडाळकर, सहसंपर्कप्रमुख प्रा. सुनील धांडे, अॅड . चंद्रकांत नवले, जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, जिल्हा परिषद सभापती युद्धाजित पंडित, पंचायत समिती सभापती अभयसिंह पंडित, रोहित पंडित आदी उपस्थित होते. या वेळी मंत्री रामदास कदम म्हणाले की, बदामराव पंडित यांच्या पाठीशी तुम्ही ताकदीने उभे आहेत हे इथे दिसत आहे. या तालुक्याला आमदार तुम्ही शिवसेनेचा भगवा हाती घेतलेलाच देणार हे निश्चित आहे. 

 

मदत सन्मानाने केली उद्धवजींनी परत 
स्वातंत्र्यसैनिक कै. लक्ष्मणराव भोपळे यांच्या पत्नी विजयाताई भोपळे यांनी पेन्शनमधून २१ हजार रुपयांची मदत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अॅड. उज्ज्वला भोपळे यांच्या हस्ते देऊ केली. परंतु पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, देशासाठी बलिदान दिलेल्या सैनिकाच्या कष्टाची रक्कम शेतकऱ्याला देण्याऐवजी, शिवसेना शेतकऱ्यांसाठी स्वतः मदत करून, प्राण पणाला लावेल, असा विश्वास देऊन ठाकरे यांनी सन्मानपूर्वक त्यांचा मदत निधी परत केला. 

बातम्या आणखी आहेत...