आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींचे \'मी\', उद्धवांचे \'ते\'; मोदींचे काँग्रेसवर तर शिवसेना पक्षप्रमुखांचे भाजपवर शरसंधान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर/बीड : महाराष्ट्रात बुधवारी दोन नेत्यांच्या सभा गाजल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापुरात मागचे-पुढचे संदर्भ जोडत काँग्रेसवर आणि राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला. दुसरीकडे, बीडमध्ये उद्धव ठाकरे यांनी मोदी तसेच भाजपला लक्ष्य करत राज्यातील शेतकरी कर्जमाफीसारखा संवेदनशील मुद्दा उचलत जोरदार वार केले. 

 

चौकीदार झोपतच नाही, तो तर अंधारालाही भेदून चोर पकडतो 
चौकीदार कधीच झोपत नाही. अंधाराला भेदून चाेरांना पकडताे आहे याची काही लोकांना धास्ती वाटते. म्हणूनच ते 'चौकीदार चोेर है' असा सातत्याने कांगावा करतात, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे जाहीर सभेत राहुल गांधींना नाव घेता फटकारले. काँग्रेसवर अप्रत्यक्षपणे जोरदार टीका करत मोदी यांनी काँग्रेेसशी संबंधित अनेक विषयांवर भाष्य केले. 

 

भूमिपूजन करतो आणि उद्घाटनही... 

सोलापूर-तुळजापूर चौपदरी महामार्गाचे लोकार्पण तसेच सोलापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गासाठी एक हजार कोटींची घोषणा मोदींनी केली. यानंतरच्या सभेत मोदींच्या भाषणातील संपूर्ण रोख गांधी घराण्यावर होता. मागील सरकार रिमोट कंट्रोलवर होते. सत्तेची खुर्ची जन्मसिद्ध अधिकार असल्याचे त्यांना वाटत होते. देशवासीयांनी त्यांना जागा दाखवली. आता देश बदलू लागला आहे, हे जगाला दिसत आहे. परंतु काही लोकांना राजकारणाशिवाय दुसरे काहीच दिसत नाही. विकासाची परिभाषा आम्ही दाखवून दिली. देशभरातील विकास कामांचे दाखले मोदींनी दिले. आम्ही भूमिपूजन करतो व उद्घाटनही, असा टोला त्यांनी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना मारला. शिंदेंनी सोलापुरात पत्रकार परिषद घेऊन आम्ही केलेल्या कामांचे मोदी उद््घाटन करत आहेत, असे म्हटले होते. 

 

मिशेलमामा बोलतोय... 

हेलिकॉप्टर घोटाळ्यातील ज्या दलालास परदेशातून भारतात आणले तो मिशेलमामा' आता बोलतोय. त्याची दलाली फक्त हेलिकॉप्टर घोटाळ्यात नाही, तर यापूर्वीच्या सरकारच्या काळात फ्रान्ससोबत ज्या राफेल कराराची चर्चा सुरू होती त्यातही सौदेबाजी होती. त्यामुळेच मूळ यूपीएच्या काळातील राफेल विमान करार खोळंबला होता का, हे तपास यंत्रणा शोधत आहेत, असे मोदी म्हणाले. चौकीदार म्हणून मीदेखील अशा व्यवहारांतील पै- पैचा हिशेब मागता आहे म्हणूनच माझ्यावर खोटे आरोप सुरू झाले. मोदी अशा आरोपांना जुमानणारा नाही, असा इशाराही त्यांनी दिला. 

 

सोलापूर-येडशी मार्गाचे लोकार्पण : 
सोलापुरातील स्मार्ट सिटीच्या कामांचे उद्घाटन, सोलापूर-येडशी महामार्गाचे लोकार्पण, अमृत योजनेतून पायाभूत सुविधा व असंघटित क्षेत्रातील ३० हजार कामगारांच्या घरांची पायाभरणी असे कार्यक्रम पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले. या वेळी मोदींनी कुणाचेही नाव न घेता विरोधकांवर हल्ला चढवला. सुरक्षेशी तडजोड करणऱ्या लाचखोरांना सोडणार नाही, असेही त्यांनी निक्षून सांगितले. 

 

आरक्षणावरून खोटा प्रचार : 
आरक्षणाच्या मुद्द्यावरून खोटा प्रचार करून लोकांची दिशाभूल केली जात होती. दलित, आदिवासी आणि ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण काढून घेणार, असा प्रचार केला गेला. मात्र, गरीब सवर्णांना १० टक्के अतिरिक्त आरक्षण देण्याचा निर्णय घेत आम्ही चपराक दिली आहे. दलित, आदिवासी व ओबीसी कोट्याला धक्का लागणार नाही, अशी हमी त्यांनी दिली. 

 

भारतमातेच्या कुशीत येणाऱ्यांना जागा देणार : 
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकही लोकसभेत मंजूर झाले आहे. त्यामुळे पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानातील अल्पसंख्याकांना भारतात नागरिकत्व देण्यात येईल. यात आसाम किंवा नैऋत्येकडील नागरिकांच्या अधिकारांना धक्का लागणार नाही. अत्याचार सहन करून भारतमातेच्या कुशीत जागा मागणाऱ्यांना, वंदे मातरम म्हणणाऱ्यांना जागा देण्याचे हे धोरण आहे, असे स्पष्टीकरण मोदींनी दिले. 
 
युती गेली खड्ड्यात, आधी शेतकऱ्यांचे काय ते बोला... 
'मला शेतीतलं कळत नाही, अशी टीका होते. मात्र मला शेतकऱ्यांचे अश्रू दिसतात. रोज नव्या देशात फिरणारे 'देश बदल रहा है' म्हणतात; परंतु, प्रत्यक्षात देशबांधवांची स्थिती तशीच आहे. घोषणांच्या पावसाने दुष्काळग्रस्तांचे हंडे भरणार नाहीत. घोषणांची अंमलबजावणी करा. युती गेली खड्ड्यात, आधी शेतकऱ्यांसाठी काय ते बोल,' अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या कार्यपद्धतीवर कडवी टीका केली.

मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शिवसेनेच्या वतीने पशुखाद्य, पाण्याच्या टाक्यांच्या वितरणाला बुधवारी बीडमधून प्रारंभ झाला. प्रारंभी ठाकरेंनी म्हाळसजवळा (ता. बीड) येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. नंतर बीडमध्ये दुपारी सभेला संबोधित केले.

 

शेतकरी पीक विम्यात रफाल कराराएवढाच घोटाळा : 
सरकारी यंत्रणांचा अजगर सुस्त आहे. त्यांना शेतकऱ्यांचे देणे-घेणे नाही. त्या अजगराला ठोसून जागे करण्यासाठी मी आलाे आहे. मी सत्तेत असलो तरी माणुसकी विसरलेलो नाही. शेतकऱ्यांना पिडाल तर मी सरकारविरोधात असेन. पीक विम्यात रफालइतका घोटाळा झाल्याचे सांगितले जाते, हे गंभीर आहे, असे ठाकरे म्हणाले.आपल्या भाषणातून ठाकरे यांनी सरकारी योजनांवर चौफेर टीका केली. उज्ज्वला योजना, सौभाग्य योजना, विदेश दौरे, राम मंदिर, कर्जमाफी या सर्व मुद्द्यांवर त्यांनी भाजपला खडे बोल सुनावले. उद्धव म्हणाले, दुष्काळ की दुष्काळसदृश स्थिती असे शब्दांचे खेळ करून झाल्यानंतर केंद्रीय पथक आले. उलट बीड जिल्ह्यातील लोकांच्या रेशनमध्येही कपात केली आहे. पशुधन मरत असताना चारा छावणीला की दावणीला घोळ कायम आहे. 

 

'जन की बात' करतो : 
मी 'मन की बात' नाही तर 'जन की बात करतो'.राम मंदिराच्या मुद्द्यावर पंतप्रधान कोर्टाकडे बोट दाखवत आहेत. कोर्टच हा प्रश्न सोडवणार होते तर जाहीरनाम्यात मंदिराचा मुद्दा का घेतला? राम मंदिर हा सुद्धा निवडणुकीचा जुमलाच होता. 'मंदिर वही बनाऐंगे लेकिन तारीख नही बतायेंगे' अशी यांची अवस्था आहे, अशी टीका ठाकरे यांनी केली. 

बातम्या आणखी आहेत...