Politics / मोदींना राम मंदिर बनवण्यापासून कुणीच रोखू शकत नाही; अयोध्या दौऱ्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

निवडणुकीनंतर प्रथमच खासदारांसह अयोध्येत उद्धव ठाकरे...

दिव्य मराठी वेब

Jun 16,2019 05:07:54 PM IST

अयोध्या - शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाच्या 18 खासदारांसह रविवारी अयोध्या दौरा केला. तसेच सर्वांनी मिळून रामललाचे दर्शन घेतले. यावेळी आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे नेते संजय राउत देखील उपस्थित होते. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना, पीएम नरेंद्र मोदींना राम मंदिर बनवण्यापासून कुणीच रोखू शकत नाही. मोदी लवकरच राम मंदिर उभारतील असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. गेल्या सात महिन्यांत उद्धव ठाकरेंचा हा दुसरा अयोध्या दौरा आहे.


कायदा आणून राम मंदिर बांधा, देशातील प्रत्येक हिंदू तुमच्यासोबत -ठाकरे
राम मंदिरावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "हे प्रकरण गेल्या कित्येक वर्षांपासून कोर्टात लांबणीवर आहे. आता मजबूत सरकार आले असून आम्ही सगळेच तुमच्यासोबत आहोत. मोदीजींनी धाडसाने निर्णय घ्यायला हवा. सरकार असा निर्णय घेत असेल तर राम मंदिर बनवण्यापासून कुणीच रोखू शकणार नाही. कायदा आणा आणि राम मंदिर बनवा. देशाचा प्रत्येक हिंदू तुमच्यासोबत आहे. भाजप आणि शिवसेना आम्ही हिंदू आहोत आणि हिंदुत्वाचे बोलतो. जनतेच्या भावनांचा भाजप सरकारने आदर करायला हवा." राम मंदिर शिवसेनाच नव्हे, तर देशातील समस्त देशवासियांच्या आस्थेचा प्रश्न आहे. आता राम मंदिराच्या बांधकामासाठी विलंब होण्याची अपेक्षा करता येणार नाही. येत्या संसदीय अधिवेशनानंतर त्यासंदर्भात सकारात्मकत निर्णय पाहायला मिळेल असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. लोकसभेचे अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. यासाठी भगवान रामाचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलोय असेही उद्धव यांनी सांगितले आहे.

X
COMMENT