आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेकडून बहुमताचा दावा; भाजप दाखवतेय 'राष्ट्रपती राजवटी'ची भीती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजपचे दिल्लीतील प्रवक्ते तेजिंदर पालसिंह बग्गा यांनी हे व्यंगचित्र पाेस्ट करून सेनेला डिवचले. - Divya Marathi
भाजपचे दिल्लीतील प्रवक्ते तेजिंदर पालसिंह बग्गा यांनी हे व्यंगचित्र पाेस्ट करून सेनेला डिवचले.

मुंबई : विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून एक आठवडा होऊन गेला तरी जनतेने स्पष्ट बहुमत दिलेल्या भाजप- शिवसेना महायुतीत अद्याप सत्तास्थापनेबाबत एकमत झालेले दिसत नाही. मुख्यमंत्री कुणाचा? मंत्रिपदे किती? याच मुद्द्यावर या दाेन्ही पक्षांत सुंदाेपसुंदी सुरू अाहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपशिवाय बहुमत सिद्ध करण्याची अामची तयारी असल्याचे सूताेवाच केले. तर भाजपचे नेते अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 'वेळेत निर्णय न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू हाेऊ शकते,' असा इशारावजा भीती शिवसेनेला दाखवली अाहे. त्यामुळे दाेन्ही मित्रपक्षांतील दुरावा वाढतच चालला अाहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युल्याबाबत माहिती नसल्याचे सांगून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नाराजी अाेढवून घेतली. त्यामुळे युतीतील चर्चेला खीळ बसल्याचे सांगितले जाते. त्यातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने शिवसेना राष्ट्रवादीच्या मदतीने तर सत्ता स्थापन करणार नाही ना, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. 'भाजपशिवाय अाम्हीही बहुमत सिद्ध करू शकताे,' असे दावे राऊत करत असल्याने या संशयाला पुष्टीही मिळू लागली अाहे. या पार्श्वभूमीवर मुनगंटीवार यांनी थेट राष्ट्रपती राजवटीचीच भीती दाखवत शिवसेनेवर प्रतिडाव टाकण्याचा प्रयत्न चालवला अाहे. खरे तर शिवसेना- भाजपने कितीही ताणले तरी सरतेशेवटी दाेन्ही पक्ष तडजाेड करून युतीचेच सरकार सत्तारूढ हाेईल, अशी राजकीय अभ्यासकांना अाशा वाटते. त्यातही जर मुनगंटीवार म्हणतात त्यानुसार राष्ट्रपती राजवट लागू झाली तरी त्याचा फायदा भाजपलाच हाेईल, असेही मानले जाते.

द ग्रेट महाराष्ट्र पॉलिटिकल थिएटर : भाजप-सेनेतील दुरावा वाढला

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीचे संजय राऊत यांच्याकडून संकेत
५६ अामदार असलेल्या शिवसेनेने अपक्षांच्या मदतीने ६२ पर्यंत संख्याबळ गाठले अाहे. राज्यात बहुमतासाठी १४५ अामदारांची गरज अाहे. म्हणजे त्यांना अजून ८३ अामदारांची गरज अाहे. काँग्रेस व राष्ट्रवादीचे एकत्रित संख्याबळ ९८ अाहे, त्यांच्या पाठिंब्याच्या जाेरावर खासदार संजय राऊत बहुमताचे दावे करत असल्याचे संकेत मिळत अाहेत. मात्र, अाम्ही विराेधी पक्षातच बसणार, असे अजित पवारांनी स्पष्ट केले अाहे. तसेच शिवसेेनेसाेबत जाण्यास काँग्रेसच्या एका गटाचाही विराेध अाहे. त्यामुळे राऊत यांच्या दाव्यातील हवा निघून जाते. भाजप अामदार प्रसाद लाड म्हणाले, 'शिवसेनेची भूमिका मांडण्याचे अधिकार संजय राऊत यांना नसल्याने त्यांचे वक्तव्य अधिकृत मानता येणार नाही.'

शिंदे, निरुपमांचा सेनेला विराेध
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले, 'काँग्रेस हा सेक्युलर पक्ष असल्याने अाम्ही शिवसेनेसोबत जाऊच शकत नाही.' काँग्रेस नेत्यांवर नाराज संजय निरुपम यांनी 'शिवसेनेचे नाटक हे फसवे असून जास्तीत जास्त मंत्रिपदे पदरात पाडून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे,' असा अाराेप केला. तरीही काही काँग्रेस नेते शिवसेनेला पाठिंबा देण्याचा विचार कसा करतात, हॅव दे लॉस्ट... असा प्रश्न निरुपम यांनी टि‌्वटरद्वारे केला.

राष्ट्रपती राजवट म्हणजे काय? 
राज्यघटनेत कलम ३५२ ते ३६० आणीबाणीशी संबंधित असून यात तीन प्रकारच्या आणीबाणींचा उल्लेख आहे. पहिली राष्ट्रीय, दुसरी आर्थिक आणि तिसरी राष्ट्रपती राजवट. राज्यघटनेच्या कलम ३५६ मध्ये राष्ट्रपती राजवटीचा उल्लेख आहे. कलम ३५६ नुसार जर राज्यपालांना वाटले की राज्याचा कारभार राज्यघटनेनुसार चालत नाही आणि त्यांनी राष्ट्रपतींना तसा अहवाल दिला आणि त्यांची खात्री पटली तर राष्ट्रपती जाहीरनामा काढून राष्ट्रपती राजवटीची घोषणा करू शकतात. तेच संपुष्टातही आणू शकतात.

महाराष्ट्रात अाजवर दोनदा लागली राष्ट्रपती राजवट
शरद पवार यांचे पुलोदचे सरकार बरखास्त करून १७ फेब्रुवारी १९८० ला राज्यात प्रथम राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. ९ जून १९८० राेजी ती उठवण्यात अाली.


२०१४ : राष्ट्रवादीने पाठिंबा काढल्याने काँग्रेसचे सरकार गडगडले. २८ सप्टेंबर २०१४ ते ३१ ऑक्टोबर २०१४ या काळात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.

सत्तेसाठी पर्याय काय?
१. महाराष्ट्र विधानसभेची मुदत ९ नाेव्हेंबरपर्यंत अाहे. त्या कालावधीपर्यंत राज्यात नवे सरकार अस्तित्वात येणे आवश्यक अाहे. मात्र, समजा या मुदतीत सरकार सत्तारूढ झालेच नाही तर राज्यपाल अापल्या अधिकारात नव्या सरकार स्थापनेसाठी काही मुदत देऊ शकतात. तोपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस काम पाहतील. त्याला कालावधीचे बंधन नाही.
२. भाजपने सत्तास्थापनेचा दावा केला नाही तर राज्यपाल दुसऱ्या मोठ्या पक्षाला म्हणजेच शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करू शकतात. परंतु शिवसेनेला बहुमत सिद्ध करावे लागेल. यासाठी त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मदत घ्यावीच लागेल. अाणि हे दाेन्ही पक्ष सध्या तरी मदतीच्या तयारीत नाहीत.
३. तरीही सरकार स्थापन झाले नाही तर राज्यपाल राज्यात राष्ट्रपती राजवटीची शिफारस करू शकतात.

बातम्या आणखी आहेत...