आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेच्या प्रचाराची धुरा गटप्रमुखांवरच; आशा भाजपशी युतीची, तयारी स्वबळाची

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. अाजवर भाजपसोबत युतीनेच लोकसभा निवडणुका लढत आलेली शिवसेना यंदा मात्र प्रथमच स्वबळावर लोकसभेच्या निवडणुकांना सामोरी जाण्यासाठी जय्यत तयारी करत अाहे. मित्रपक्ष भाजप युतीसाठी शिवसेनेला जाहीर अावाहन करत असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मात्र स्वबळाच्या भूमिकेवर ठाम अाहेत, त्यामुळे सर्व विद्यमान खासदारांचे लक्ष अंतिम निर्णय काय हाेताे याकडेच लागलेले दिसते. पुन्हा निवडून यायचे असल्यास युती हवीच असा यापैकी काही खासदारांचा पक्षप्रमुखांकडे अाग्रह अाहे. आशा युतीची असली तरी स्वबळावर लढण्याचीही तयारी शिवसेनेने केली आहे. गेली २०१४ ची विधानसभा स्वबळावर लढून ६३ आमदार पाठवून शिवसेनेने ताकद दाखवली आहे. आता अशीच ताकद २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दाखवण्याचा शिवसेनेचा मनसुबा आहे.   लोकसभेत किमान २५ खासदार पाठवण्याचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निर्धार असल्याची माहिती शिवसेनेच्या सोशल मीडिया कॅम्पेनची जबाबदारी सांभाळणारे हर्षल प्रधान यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना दिली. यासाठी आम्हाला काही वेगळ्या योजना आखण्याची गरज नसून आमचे गटप्रमुख वर्षाचे १२ महिने जनतेच्या संपर्कात असतात, असेही त्यांनी सांगितले. भाजपसाेबत सत्तेत असतानाही शिवसेनेने वारंवार केंद्र व राज्यातील निर्णयांवर अासूड अाेढले. पंतप्रधान नरेंद्र माेदी व भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली. अाताही स्वबळावर लढण्याची वेळ अाल्यास हाच अजेंडा राबवून प्रचार करायचे पक्षाचे नियाेजन अाहे. 

 

पक्षप्रमुखांपासून ते तालुकाप्रमुखांपर्यंत साखळी, खरी ताकद गटप्रमुख
उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून गटप्रमुख नेमण्यात आले. आधी ते फक्त मुंबई व कोकणात होते. २०१४ मध्ये राज्यभरात गटप्रमुख नेमले गेले. गटप्रमुख जी माहिती देतात त्यावरच उद्धव आपले निर्णय घेतात. यानंतर तालुकाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, जिल्हाप्रमुख, समन्वयक, संघटक आणि पक्षप्रमुख अशी साखळी आहे.


भाजपशी युतीचा आम्हाला फायदाच : हर्षल प्रधान   
युतीत १८ खासदार निवडून आणल्या. स्वबळावर ६३ आमदार निवडून आणले. अाता २५ खासदार निवडून आणण्याचा प्रयत्न आहे, असे हर्षल प्रधान म्हणाले. युती झाल्यास अामच्या खासदारांची संख्या वाढेल युतीला ४५ वर जागा मिळतील. मात्र आम्ही स्वबळाचीच तयारी केली आहे, असे ते म्हणाले.


२५० घरांची जबाबदारी एकाकडे
एका गटप्रमुखाकडे सुमारे २५० घरांची जबाबदारी आहे. तो निवडणुकीच्या तोंडावरच नव्हे, तर सतत मतदारांच्या संपर्कात असतो. मतदारांना वैद्यकीय मदत देण्यापासून ते त्यांच्या वैयक्तिक समस्या सोडवण्यापर्यंतची कामे करताे. अर्थात यासोबत शिवसेनेचा प्रचारही वेळाेवेळी करताेच.


युती न झाल्यास मोदींविरुद्ध प्रचार  
गटप्रमुख प्रत्येक घरात जाऊन केंद्राच्या योजनांचा लाभ झाला का, कर्जमाफी मिळाली का, त्यात काही अडचण आहे का, असेल तर कोणामुळे याची माहिती घेतील. मोदी फक्त आश्वासने देतात, कामे करत नाहीत. त्यामुळे शिवसेनेला निवडून दिल्यास त्यांचे प्रश्न मार्गी लागतील, असे मतदारांवर गटप्रमुख बिंबवतील.


युती झाल्यास योजनांचा प्रचार  
भाजपने तोडगा काढत युती केली तर वेगळी रणनीती अवलंबण्यात येणार आहे. केंद्राच्या लाभदायी योजनांची माहिती देऊन पुन्हा युतीला मते द्यावीत, असे आवाहन गटप्रमुख करतील. परंतु जोपर्यंत उद्धव ठाकरे युतीची घोषणा करीत नाहीत तोपर्यंत गटप्रमुख फक्त शिवसेनेसाठीच मतांची बेगमी करतील.

 

चार दशकांतील लोकसभा निवडणुकांमधील शिवसेनेची कामगिरी
1971 ते 1981  

शिवसेना प्रथमच लोकसभेची निवडणूक लढली. महाराष्ट्रात १.६३%च मते मिळाली. १९८० मध्येही पाटी कोरीच होती. १९८९ मध्ये विद्याधर गोखले यांच्या विजयाने खाते उघडले. मुंबई नॉर्थ सेंट्रलमधून ते जिंकले.    
1991 ते 1996
१९९१ मध्ये शिवसेनेचे ४ खासदार निवडून आले. १९९६ मध्ये शिवसेनेने प्रथमच दुहेरी आकडा गाठत १५ खासदार लोकसभेत पाठवले. १९९५ मध्ये शिवसेना राज्यातही भाजपसोबत सत्तेत आली होती.   
1998 ते 2014
१९९८ मध्ये शिवसेनेचा आलेख पुन्हा घसरला. केवळ सहाच ठिकाणी विजय मिळाला. १९९९ मध्ये मध्यावधी निवडणुकांत शिवसेनेने १५ खासदार निवडून आणले. २००४ मध्ये १२ जागी विजय मिळाला.   
2009 ते 2014
२००९ मध्ये शिवसेनेने ११ खासदार निवडून अाणले.तर २०१४ मध्ये ऐतिहासिक १८ जागा (२१% मते) मिळाल्या. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने स्वबळावरच लढत ६३ अामदार निवडून अाणले.

बातम्या आणखी आहेत...