राजकीय / शिवसेनेकडून सर्वच मतदारसंघांची चाचपणी, उद्धव ठाकरे यांनी घेतली राज्यातील नेत्यांची बैठक

शिवसेनेने 288 मतदारसंघांतील परिस्थितीची चाचपणी घेतली

प्रतिनिधी

Sep 16,2019 09:16:00 AM IST

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी मातोश्री बंगल्यावर सेनेचे पदाधिकारी, संपर्क व विभागप्रमुख यांचे म्हणणे रविवारी जाणून घेतले. युतीची बोलणी चालू असतानाच शिवसेनेने २८८ मतदारसंघांतील परिस्थितीची रविवारी चाचपणी घेतली. जागावाटप तोडग्याच्या चर्चेतून काहीच निष्पन्न होत नसल्यामुळे वेट अँड वॉच या भूमिकेतून शिवसेनेने आपल्या नेत्यांना या बैठकीत सबुरीचा सल्ला दिल्याचे सांगण्यात येत आहे.


मातोश्री निवासस्थानी रविवारी बैठक चालू असतानाच शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही पार पडल्या. विधानसभा मतदारसंघांतील आढावा घेताना, त्या त्या मतदारसंघातील राजकीय परिस्थिती उद्धव यांनी जाणून घेतली. युतीच्या जागावाटपात काही मतदारसंघांची अदलाबदल झाली तर काय चित्र राहील, याचा अंदाज या बैठकीत घेण्यात आल्याचे शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले. निवडणुकीच्या काळात पक्षप्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून आढावा घेत असतात. त्याचाच हा भाग होता. हा आढावा असून चाचपणी नाही, असे आमदार संजय पोतनीस यांनी सांगितले. निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश असून, शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह आहे, असे खासदार राजन विचारे यांनी सांगितले. तर युती करण्याबाबत दोन्ही पक्ष सकारात्मक असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे लवकरच भूमिका स्पष्ट करतील, असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.


चर्चा गुंडेंच्या आगमनाची
इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू असतानाच गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप-सेनेच्या वाटाघाटीत महत्त्वाची भूमिका बजावणारे नीरज गुंडे ‘मातोश्री’वर पोहोचले. गुंडे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोघांचेही मित्र आहेत. गुंडे युती व जागावाटपासंदर्भात मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन आले होते, अशी दिवसभर चर्चा हाेती.

X
COMMENT