मंत्रिमंडळ विस्तार / शिवसेनेतर्फे महिलेला मंत्रिपदाची संधी नाहीच; काँग्रेसकडून दोघींना, राष्ट्रवादीकडून एकीला मंत्रीपद

यापूर्वी युती शासनाच्या काळातही शिवसेनेतर्फे मनीषा निमकर या एकमेव महिलेस मंत्रिपद देण्यात आले होते

Dec 31,2019 11:19:08 AM IST

दीप्ती राऊत

नाशिक - महाविकास आघाडीने पहिल्या शपथग्रहण कार्यक्रमात सर्व पक्ष, विभाग आणि समाज घटकांचा सामाजिक समतोल साधून ६ कॅबिनेट मंत्र्यांना स्थान दिले होते. मात्र, त्या वेळीही महिला आमदारांना डावलण्यात आले होते. आता सोमवारच्या मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसतर्फे अॅड. यशोमती ठाकूर आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड यांना कॅबिनेट मंत्री, तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आदिती तटकरे यांना राज्यमंत्रिपद देण्यात आले. मात्र, शिवसेनेतर्फे एकही महिला मंत्री देण्यात आलेली नाही.


विशेष म्हणजे या वेळीच नव्हे, तर यापूर्वी युती शासनाच्या काळातही शिवसेनेतर्फे मनीषा निमकर या एकमेव महिलेस मंत्रिपद देण्यात आले होते. त्यांच्याकडे नेहमीप्रमाणे महिला आणि बालविकास खाते देण्यात आले होते. यंदा शिवसेनेच्या ५६ आमदारांत दोनच महिला आहेत. सेनेच्या ज्येष्ठ नेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे विधान परिषदेचे उपसभापतिपद देण्यात आले आहे. हा अपवाद वगळला तर महिलांचे नेतृत्व विकसित करण्यात शिवसेनेला पक्ष संघटना म्हणून आलेले अपयश मंत्रिमंडळ विस्तारातही दिसून आले.


शिवसेनेच्या चिन्हावर न लढलेल्या अपक्षांनाही सेनेच्या कोट्यातून मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे. परंतु, यासाठीही महिलेचा विचार झालेला नाही. धुळे जिल्ह्यातील साक्रीच्या आमदार मंजुळा गावीत यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यावर त्या स्वबळावर निवडून आल्या. यानंतर त्यांनी सेनेला पाठिंबाही दिला होता. महापौर म्हणून अनुभवाची शिदोरी त्यांच्या गाठीशी आहे. आदिवासी महिलेस मंत्रिपद देऊन शिवसेनेला ऐतिहासिक पाऊल उचलण्याची संधी या वेळी असल्याचे बोलले जात होते. मात्र, शिवसेनेने त्यांचा मंत्रिपदासाठी विचार केला नाही.

X