political / जागावाटप : शिवसेनेला साेडावे लागेल 55 मतदारसंघांवर पाणी, दाेनदा पराभूत जागांच्या अदलाबदलीत भाजपला लाभ

जागावाटप दाेनदा पराभूत जागांच्या अदलाबदलीत भाजपला लाभ 

Sep 04,2019 10:07:37 AM IST

महेश रामदासी/ बिपिन खंडेलवाल
औरंगाबाद :
विधानसभेसाठी भाजप-शिवसेनेची जागावाटपावर चर्चा सुरू आहे. यात विद्यमान आमदार असलेल्या जागा त्याच पक्षांकडे कायम ठेवण्यावर दाेन्ही बाजूंचे जवळपास एकमत झाले आहे. मात्र २००९ व २०१४ अशा दाेन निवडणुकांत पराभव पत्करावा लागलेल्या जागांची अदलाबदली करण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू आहे. ताे मान्य झाल्यास भाजपच्या पदरात २००९ च्या तुलनेत ५५ जागा जास्त पडू शकतात. २०१४ मध्ये स्वबळावर लढून भाजपला १२२ तर शिवसेनेला ६३ जागा मिळाल्या. या एकूण १८५ जागांत चार- सहा जागांचा अपवाद वगळता फारसा बदल संभवत नाही. मात्र उर्वरित १०३ जागांची वाटणी कशी करायची, यावरून रस्सीखेच सुरू आहे. यातून मधला मार्ग म्हणजे गेल्या दाेन निवडणुकांत ज्या मतदारसंघात भाजप पराभूत झाला आहे ती जागा शिवसेनेकडे व जिथे सेना हरली ती जागा भाजपला देण्याच्या प्रस्तावावर खल सुरू आहे. तसे झाल्यास २००९ मध्ये वाट्याला आलेल्या ११९ पैकी २१ जागांवर भाजपला तर १६० पैकी ७६ जागांवर सेनेला पाणी साेडावे लागेल, असे आकडेवारीवरून दिसते. भाजपच्या २१ जागा शिवसेनेकडे गेल्या तरी त्यांच्या ७६ जागा मिळणार असल्याने भाजपकडे ५५ जास्तीच्या जागा येऊ शकतात.


दाेन निवडणुकांतील निकालांचा अाढावा घेतल्यास २१ जागी भाजप तर ७६ जागी शिवसेना सलग दाेनदा पराभूत
पक्षांतरेही याच फाॅर्म्युल्यानुसार

सिल्लाेड (भाजप दाेनदा पराभूत, मतदारसंघ शिवसेनेकडे)
काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांचा भाजपएेवजी शिवसेनेत प्रवेश


भाेकर (शिवसेना दाेनदा पराभूत; आता मतदारसंघ भाजपकडे)
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बापूसाहेब गाेरठेकर उमेदवारीसाठी भाजपमध्ये


अकाेले (शिवसेना दाेनदा पराभूत; आता मतदारसंघ भाजपकडे)
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार वैभव पिचड उमेदवारीसाठी भाजपमध्ये


शिर्डी (शिवसेना दाेनदा पराभूत, आता मतदारसंघ भाजपकडे)
काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपत, उमेदवारी निश्चित.


एेराेली (शिवसेना दाेनदा पराभूत, आता मतदारसंघ भाजपकडे)
राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक उमेदवारीसाठी भाजपत


मित्रपक्षांचे 'अाेझे' कुणाच्या खांद्यावर ?
महादेव जानकरांचा रासप, रामदास आठवलेंचा रिपाइं, विनायक मेटेंचा शिवसंग्राम व सदाभाऊ खाेतांच्या रयतक्रांती संघटनेने भाजपकडे किमान दाेन आकडी जागांची मागणी केली आहे. शिवसेना व भाजप दाेघांच्या काेट्यातून या मित्रपक्षांना थाेड्या थाेड्या जागा द्याव्यात, अशी भाजपची व मित्रपक्षांची अपेक्षा आहे. तर मित्रपक्ष भाजपचे असल्याने त्यांची जबाबदारी भाजपनेच घ्यावी, अशी शिवसेनेची भूमिका आहे. त्यामुळे भाजपला आपल्याच काेट्यातील काही जागा या छाेट्या मित्रपक्षांना द्याव्या लागू शकतात.


फाॅर्म्युला १
भाजपच्या संभाव्य जागा
विद्यमान जागा 122 + वाढीव जागा 55 = अपेक्षित जागा 177


शिवसेनेच्या संभाव्य जागा
विद्यमान जागा 63 + वाढीव जागा 21 = अपेक्षित जागा 84


भाजपच्या २१ जागा शिवसेनेला मिळतील. शिवसेनेच्या ७६ जागा भाजपला मिळू शकतील. या फाॅर्म्युल्यात भाजपच्या पदरात ५५ जागा जास्तीच्या पडू शकतील.
फाॅर्म्युला २
विजयी 185 जागा कायम, 103 मध्ये फिफ्टी-फिफ्टी
संभाव्य जागावाटप
भाजप
122 + 51 = 173
शिवसेना
63 + 51 = 114
पहिला फाॅर्म्युला शिवसेना सहजासहजी मान्य करणार नाही. त्यामुळे भाजपला काहीशी तडजाेड करुन मध्यम मार्ग काढावा लागेल.


आघाडीच्या बैठकीला भुजबळांची दांडी, शिवसेनेकडून भगवी शाल देऊन स्वागत
नाशिक | आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात मुंबईमध्ये मंगळवारी झालेल्या काँग्रेस- राष्ट्रवादीच्या बैठकीला ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची गैरहजेरी चर्चेचा विषय ठरली. त्यामुळे ते शिवसेनेत जाणार असल्याच्या वृत्ताला बळ मिळाले. दुसरीकडे लासलगाव (जि. नाशिक) येथे शिवसैनिकांनी भगवी शाल देऊन भुजबळांचे जाेरदार स्वागत करत लवकरात लवकर शिवसेनेत येण्याचे निमंत्रण दिले.

X