आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या बंडखोरीने शिवसेना अडचणीत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड : शहरातील नांदेड उत्तर व दक्षिण दोन्ही विधानसभा मतदार संघातील जागा शिवसेनेने आग्रहपूर्वक वाटाघाटींत स्वत:कडे घेतल्या. आता याच मतदारसंघात भाजपचे मिलिंद देशमुख आणि दिलीप कंदकुर्ते यांच्या बंडखोरीमुळे शिवसेना अडचणीत आली आहे.

नांदेड उत्तर मतदार संघात काँग्रेसचे विद्यमान आमदार डी. पी. सावंत यांच्या विरोधात सेनेने बालाजी कल्याणकर यांना उमेदवारी दिली आहे. कल्याणकर महापालिकेतील एकमात्र नगरसेवक आहेत. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. तरीही ते सावंतांसमाेर तुल्यबळ ठरणार नाहीत, असे बाेलले जाते. २०१४ च्या निवडणुकीत हा मतदारसंघ भाजपकडे होता. त्यावेळी सावंत यांना ४० हजार ३५६ मते मिळाली. भाजपचे सुधाकर पांढरे यांना ३२ हजार ७५४ मते मिळाली. सेनेचे मिलिंद देशमुख यांना २३ हजार १०३ मते मिळाली. मिलिंद देशमुख सेनेचे माजी जिल्हा प्रमुख आहेत. चिखलीकरासोबत त्यांनी भाजपत प्रवेश केला. आता मतदारसंघ सेनेला गेल्याने त्यांनी उमेदवारी दाखल केली. त्यांची उमेदवारी बालाजी कल्याणकर यांच्यासाठी अडचणीची ठरणारी आहे. कल्याणकर यांच्या उमेदवारीने सेनेतील काही निष्ठावंत नाराज आहेत. देशमुख पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असल्याने नाराज शिवसैनिकांची मदत त्यांना मिळू शकेल अशी चर्चा आहे. चिखलीकरांचे समर्थक असल्याने भाजपची मतेही त्यांच्याकडे वळू शकतात.

नांदेड दक्षिण मधून खासदार हेमंत पाटील यांनी पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली आहे. २०१४ च्या निवडणुकीत या मतदारसंघात हेमंत पाटील उभे होते. त्यांना ४५ हजार ८३६ मते मिळाली. भाजपचे दिलीप कंदकुर्ते यांना ४२ हजार ५२९ मते मिळाली. काँग्रेसचे ओमप्रकाश पोकर्णा त्यावेळी चौथ्या क्रमांकावर राहिले. कंदकुर्ते यांनी त्यावेळी तुल्यबळ लढत दिली. केवळ सोनखेडमधील मतांवर हेमंत पाटील शेवटच्या फेरीत विजयी झाले. आता या मतदारसंघात कंदकुर्ते यांनी भाजप महानगराध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन बंडखोरी केली आहे. कंदकुर्तेही शेवटी भाजपत जाणार हे अटळ आहे. काँग्रेसने येथून हंबर्डे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदार संघातही त्रिकोणी सामना अटळ आहे.
 

बातम्या आणखी आहेत...