मुंबई- शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. खासदार वाकचौरे यांनी आज दुपारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट घेऊन याबाबत पुढचे पाऊल टाकले आहे. माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे-पाटील यांच्या मध्यस्थीने वाकचौरे काँग्रेसमध्ये जात असल्याचे कळते आहे. तसेच काँग्रेस त्यांना शिर्डीतून पुन्हा लोकसभेचे तिकीट देणार असल्याचे काँग्रेसमधील वर्तुळातून सांगण्यात येत आहे. दरम्यान, खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी हे वृत्त फेटाळून लावले. तसेच वाकचौरे हे दिल्लीत आजपासून सुरु होणा-या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत सहभागी झाले आहेत.
साई संस्थानचे निवृत्त कार्यकारी अधिकारी राहिलेल्या भाऊसाहेब वाकचौरे यांनी 2008 साली शिवसेनेत प्रवेश करीत सक्रीय राजकारणात उडी घेतली होती. शिवसेनेच्या आमदार निलम गो-हे व अरविंद सावंत यांच्या पुढाकाराने त्यांनी सेनेत प्रवेश केला होता. तसेच त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली होती. त्यात त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार रामदास आठवले यांचा पराभव केला होता.
वाकचौरे यांनी आठवलेंचा सुमारे 1 लाख 32 हजार मतांनी दारूण पराभव केला होता. वाकचौरे यांना 3 लाख 60 हजार तर, आठवलेंना 2 लाख 27 हजार मते मिळाली होती. थोराताच्या आशीर्वादने (?) अपक्ष म्हणून उभे राहिलेल्या प्रेमानंद रूपवते यांना केवळ 22 हजार मते मिळाली होती. शिर्डी लोकसभा मतदारसंघात अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर व नेवासा या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या सहा पैकी पाच ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार असूनही आठवलेंना विखे-पाटलांच्या सहकार्यामुळे वाकचौरे यांनी सव्वा लाखाच्या मतांनी धूळ चारली होती.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील हे आहेत सहा आमदार- अकोले- मधुकर पिचड (राष्ट्रवादी), शिर्डी- राधाकृष्ण विखे-पाटील (काँग्रेस), नेवासा- शंकरराव गडाख (राष्ट्रवादी), संगमनेर- बाळासाहेब थोरात (काँग्रेस), श्रीरामपूर- भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस), कोपरगाव- अशोक काळे (शिवसेना).