politics / माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्या समर्थनार्थ शिवसेना रस्त्यावर 

आंदोलन खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी, कोतवाली ठाण्यासमोर निदर्शने 

दिव्य मराठी

Aug 20,2019 11:46:00 AM IST

अहमदनगर : माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्यासह त्यांच्या नातेवाइकांवर दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याच्या निषेधार्थ शिवसेना सोमवारी रस्त्यावर उतरली. पोलिस प्रशासनाचा धिक्कार असो, या प्रशासनाचे करायचे काय? खाली डाेके वर पाय अशी घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी कोतवाली पोलिस ठाण्यासमोर निदर्शने केली. खोटा गुन्हा तत्काळ मागे घेऊन या प्रकरणाची चौकशी करावी, तोपर्यंत कोणतीही कारवाई करू नये, अशी मागणी करण्यात आली. चौकशी पूर्ण झाल्याशिवाय कारवाई करणार नाही, असे आश्वासन अतिरिक्त पोलिस अधीक्षक सागर पाटील यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

फुलसौंदर यांच्यासह त्यांच्या दहा नातेवाईकांविरूध्द मारहाण व बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. जागेच्या वादातून हा प्रकार घडला असून एका आदिवासी महिलेच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. भगवान फुलसौंदर, गणेश फुलसौंदर, महेश फुलसौंदर, अरुण फुलसौंदर व पाच अनोळखी व्यक्तींसह दहा जणांचा आरोपींमध्ये समावेश आहे. पीडित आदिवासी महिला १२ ऑगस्टला दुपारी साडेचारच्या सुमारास बुरूडगाव रस्त्यावरील पडीक रानात बकऱ्या चारताना हा प्रकार घडला. जागेचा वाद मिटवायचा की नाही, असे म्हणत आरोपींनी मारहाण केली. नंतर गणेश व महेश फुलसौंदर यांनी बलात्कार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पोलिसांनी दाखल केलेला हा गुन्हा खोटा असून तो तत्काळ मागे घ्यावा, या मागणीसाठी शिवसेनेने कोतवाली पोलिस ठाण्यासमोर सकाळी आंदोलन केले. नेता सुभाष चौकात जमलेल्या शिवसैनिकांनी तेलीखूंट, कापडबाजारमार्गे मोर्चा काढून खोट्या गुन्ह्याचा निषेध नोंदवला. त्यानंतर कोतवाली पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडून शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक सागर पाटील यांना निवेदन देण्यात आले. शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, भाजपचे अभय आगरकर, विक्रम राठोड, आशा निंबाळकर, माजी महापौर सुरेखा कदम, संदेश कार्ले अादींसह शिवसैनिक सहभागी झाले होते.

समता परिषदेची निदर्शने
राजकीय आकसातून आदिवासी महिलेला पुढे करून अनुसूचित जाती जमाती अधिनियम व अत्याचार यासारख्या गंभीर कलमान्वये खोटा गुन्हा दाखल केला. त्यानिषेधार्थ महात्मा फुले समता परिषदेने निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना निवेदन देत निदर्शने केली. यावेळी जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे, विभागीय अध्यक्ष अंबादास गारुडकर, माळीवाडा देवस्थानचे सचिव अशोक कानडे, अशोक गोरे, संजय गारुडकर, धोंडीराम अनाप आदी उपस्थित होते.

नागरिकांसह विविध संघटनांनीही दिली पोलिसांना निवेदने
माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्यासह त्यांच्या नातेवाइकांवर दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने आंदोलन केले. या वेळी माजी आमदार अनिल राठोड व पदाधिकारी. छाया : धनेश कटािरया.

चौकशी झाल्याशिवाय अटक करू नका
फुलसौंदर यांच्याविरुद्ध खोटी फिर्याद देणाऱ्यांवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. संबंधित लोक सराईत गुन्हेगार असून बुरूडगाव रस्ता परिसरात त्यांच्या टोळ्या कार्यरत आहेत. तेथील उच्चभ्रू नागरिकांना खोटी फिर्याद देण्याच्या धमक्या देऊन ते खंडणी गोळा करतात. यापूर्वी असे अनेक प्रकार घडले आहेत. फिर्यादीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून फुलसौंदर यांच्या विरोधातील खोटी फिर्याद रद्द करावी, तसेच या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्याशिवाय फुलसौंदर यांना अटक करू नये, असे शिवसेनेने निवेदनात म्हटले.

अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करणार
राजकीय षडयंत्रातूनच फुलसौंदर यांच्यावर खोटा गुन्हा दाखल झाला आहे. दोन दिवसांपूर्वी फुलसौंदर यांचा जबाब नोंदवण्यात आला असतानाही त्यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. एखाद्या नेत्याला बदनाम करण्यासाठीच असे उद्योग सुरू आहेत. फिर्याद देणाऱ्यांनी यापूर्वी अशाच पद्धतीने अनेकांना त्रास दिला आहे. अार्थिक लाभासाठी या टोळ्या ब्लॅकमेल करतात. फुलसौंदर यांच्यावरील खोटा गुुन्हा त्वरीत मागे घ्यावा, अन्यथा शिवसेना यापेक्षा तीव्र आंदोलन करेल.'' दिलीप सातपुते, िशवसेना शहरप्रमुख

आमदार संग्राम जगताप समर्थकांचे पुन्हा निवेदन
फुलसौंदर यांच्यावर दाखल झालेल्या खोट्या गुन्ह्याचा जगताप समर्थकांनी निषेध नोंदवला. महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी कार्यालय व कोतवाली पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले. यावेळी प्रा. माणिक विधाते, नगरसेवक गणेश भोसले, बाबा गाडळकर, सारंग पंधाडे, अभिजित खोसे, प्रकाश भागानगरे, संभाजी पवार, शुभम रासकर, नीलेश बांगरे, अरविंद शिंदे उपस्थित होते. खोटा गुन्हा मागे घेण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी पुढाकार घेतला अाहे.

X