आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रभागा स्वच्छतेप्रश्नी ठेकेदाराला पर्यावरणमंत्री कदमांनी सुनावले, पर्यावरण विभागाच्या वतीने राबवली स्वच्छता मोहीम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर - श्री विठ्ठल मंदिर परिसर व चंद्रभागेच्या वाळवंटाची नियमित स्वच्छता व्हावी यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून पावणेदोन कोटी रुपये खर्चून ठेकेदाराला स्वच्छतेचा ठेका दिलेला आहे. मात्र, ठेकेदाराकडून स्वच्छतेचे योग्य काम होत नसल्याने पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी त्याला खडे बोल सुनावले. 

 

पर्यावरण विभागाच्या वतीने पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी चंद्रभागा वाळवंटात सोमवारी सकाळी स्वच्छता मोहीम राबवली. त्या वेळी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पडलवार, मुख्याधिकारी अभिजित बापट, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी आवताडे आदी उपस्थित होते. पर्यावरणमंत्र्यांनी चंद्रभागेची पाहणी केली. या वेळी त्यांना चंद्रभागा वाळवंटात घाणीचे साम्राज्य आढळून आले. यामुळे त्यांनी सोमवारी सकाळी चंद्रभागेत स्वच्छता मोहीम राबवली. नगरपालिकेचे कर्मचारी, मंदिर समितीचे कर्मचारी, वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी व शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झाले होते. या वेळी मंदिर समितीच्या ठेकेदाराला चंद्रभागा वाळवंटाची स्वच्छता व्यवस्थित करा, स्वच्छता करण्याची तुमची जबाबदारी आहे, अशा सूचना कदम यांनी दिल्या. 

 

शिवसेना स्वयंसेवकांनी बारा टन कचरा उचलला : चंद्रभागेत राबवण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत शिवसेनेचे स्वयंसेवक, नगर परिषदेचे १५० कर्मचारी, मंदिर समितीने नेमलेले स्वच्छता ठेकेदार, बीसीए कंपनीचे १५० कर्मचारी यांनी १ जेसीबी, ४ ट्रॅक्टर, २ कंटेनर यांच्या साह्याने चंद्रभागा पात्र व वाळवंटातील १२ टन कचरा अवघ्या काही तासांतच उचलला आहे. चंद्रभागेच्या पात्रात यापुढे साखर कारखान्यांचे मळीमिश्रित पाणी, औद्योगिक वसाहतीचे दूषित पाणी सोडले जाणार नाही. यासाठी आपण स्वतः लक्ष देणार आहे, तसेच दर महिन्याला पंढरपूरला येऊन चंद्रभागा वाळवंटाची तसेच पर्यावरण विभागामार्फत केल्या जाणाऱ्या कामाची पाहणी करणार आहे, असे पर्यावरणमंत्र्यांनी या वेळी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...