आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभकर्ण 4 वर्षांपासून निद्रेत, त्याला उठवण्यासाठी अयोध्येमध्ये आलोय- उद्धव ठाकरे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अयोध्या- राम मंदिराच्या मागणीसाठी विहिंपच्या धर्मसभेच्या एक दिवस आधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येत दाखल झाले. त्यांनी लाेकसभा निवडणूक आणि सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी मंदिर उभारणीची तारीख सांगा, असा अल्टिमेटमच मोदी सरकारला दिला. उद्धव ठाकरे यांनी लक्ष्मण किलामध्ये आशीर्वाद संमेलनात पत्नी व पुत्र आदित्यसह पूजा केली. नंतर शरयू तटावरील आरतीतही ते सहभागी झाले. 

उद्धव म्हणाले, कुंभकर्ण ६ महिने झोपायचा. मात्र आजचा कुंभकर्ण चार वर्षांपासून निद्रावस्थेत आहे. मी कुणाचे मंदिर निर्मितीचे श्रेय हिरावून घेण्यासाठी नव्हे तर कुंभकर्णाला जागे करण्यासाठी अयोध्येत आलो आहे. दिवस, महिने वर्षे, पिढ्या जात आहेत.
 
अचानक राम मंदिराच्या मुद्द्याला हात घालतानाच थेट अयोध्येत साधू-संतांची भेट घेण्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. हा भाजपला धक्का होता.तेव्हा शनिवारी (२३ नोव्हेंबर) ठाकरे येथे दाखल होणार असल्याने काही गडबड तर होणार नाही, अशी धास्ती होती. पण त्यापेक्षाही जास्त उत्सुकता ती त्यांच्या येण्याची होती. अयोध्या आणि फैजाबादमध्ये वातावरण तयार करण्याचे एवढे नियोजन केले गेले की या शहरात शिवसेनेचीच सत्ता आहे की काय, असे वाटावे.

येथील हिंदू तरुणाई आणि महिलांमध्ये ठाकरे या नावाचे कमालीचे आकर्षण असल्याचे जाणवले. उद्धव व त्यांच्या कुटुंबाने बरोबर दुपारी दीड वाजेच्या ठोक्याला फैजाबाद धावपट्टीवर पाय ठेवले. उद्धव हे स्वत: एकटे नव्हे तर पत्नी, युवा नेते आदित्य आणि तेजस यांच्यासह ते आल्याचे समजल्यानंतर तर ‘मुखिया ऐसा होना चाहिए’ असे उद््गार तेथील तरुणांच्या मुखातून बाहेर पडले. ठाकरे यांच्या समर्थनासाठी येथे दाखल झालेले मराठी शिवसैनिक यांच्याबद्दलही येथील महिलांसह सर्वांनाच काहीशी उत्सुकता जाणवली. त्यातच ‘साहब परिवार के साथ मिलने आये है’ हा संदेश गेल्यानंतर आधीच शिवसेनेविषयी असलेल्या आस्थेत वाढ होऊन ठाकरे परिवाराने येथील हिंदू नागरिकांची मने जिंकल्याचे चित्र दिसले. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेण्यासाठी पूर्वी महाराष्ट्रातील तरुण, जनता जशी दुतर्फा थांबत असत तसेच काहीसे चित्र येथे होते.

मुखिया हवाय, शिवसेनेने येथे लढावे, आम्ही साथ  देऊ : ठाकरेंच्या स्वागतासाठी आलेले गब्बर मिश्रा सांगत होते, आधी मुलायम, नंतर मायावती, अखिलेश आणि आता योगी आदित्यनाथ यांनी आमची निराशा केली. योगींकडून अपेक्षा होती. परंतु आता आम्ही वैतागलोय, आम्हाला कोणी मुखिया नाही. ठाकरेंनी येथे निवडणूक लढावी, आम्ही त्यांना साथ देऊ.

सात वर्षांपूर्वी दहा हजार मते घेतली होती, आता विजयी होईल : ग्रामीण भागातून आलेले राजेश शर्मा शिवसेनेविषयी भरभरून बोलत होते. ते म्हणाले, मी सात वर्षांपूर्वी शिवसेनेकडून फैजाबाद जिल्हा परिषदेची निवडणूक मसोदा या गटातून लढवली होती. तेव्हा मला दहा हजार मते मिळाली. आता जर पुन्हा शिवसेनेने संंधी दिली तर मी निवडणूक जिंकलेलो असेल. स्व. बाळासाहेबांनी आधीच येथे लक्ष द्यायला हवे होते, तसे झाले असते तर आज वेगळे चित्र दिसले असते.  अयोध्येत सर्वत्र सेनेचे  पोस्टर दिसत होते. ‘हर हिंदू की यही  पुकार, पहले मंदिर फिर सरकार’ असे वाक्य असलेल्या पोस्टरवर स्व. बाळासाहेबांचा भला मोठा फोटो लक्षवेधक होता. 
 
राज- शिवसेनेविषयी चौकशी
अयोध्या तसेच फैजाबाद येथील तरुण, नोकरदार, व्यापारी यांच्याशी संवाद साधत असताना येथील नागरिकांना शिवसेनेविषयी कमालीचे आकर्षण असल्याचे स्पष्ट जाणवले. पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी यातील अनेकांनी शिवसेना नेमकी कशी आहे, त्यांची कार्यपद्धती कशी आहे, ते दंगल कशी घडवतात, यावर थेट प्रश्न केले. त्याचबरोबर सेनेने महाराष्ट्राचा विकास कसा केला, असे प्रश्न आले.  राज यांनी सेना का सोडली, हा प्रश्नही केला.
 
जास्तीचा किराणा भरला..
साधू, संत शिवसेना आणि भाजप या त्रिकोणी वादात रविवारी येथे काही गडबड होऊ शकते, अशी भीती येथील जनतेला आहे. जर खरेच गडबड झाली तर कसे होईल, असा प्रश्न येथील दुकानदार रमेश बाली यांना केला तर ते म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून नागरिकांकडून जास्तीचा किराणा भरून ठेवला जात आहे, यामागे भीती हेच कारण असले तरी ‘साब मै आपको बोलता अगर ये टाइम गडबड होई गयी तो पुरा साल इसमे चला जायेगा’.
 
विमानातही घोषणाबाजी
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक येथे दाखल होत आहेत. शुक्रवारी पुणे-चेन्नई मार्ग बंगळुरू येथे विमानाने थांबा घेतला. सात वाजता प्रवासी आत प्रवेश करू लागले आणि अचानक, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’, ‘उद्धव साहेब तुम आगे बढो हम तुमारे साथ है’च्या घोषणा विमानात सुरू झाल्या. नेमके काय होतेय, हे अमराठी प्रवाशांना क्षणभर समजलेच नाही. त्यातील एकाने या मंडळींना शांत बसण्याची विनंती केली तेव्हा  ‘भाऊ घोषणा तर देणारच, पण तुम्हाला त्रास होईल असे काही करणार नाही’ असे शुद्ध मराठीत सांगितले. ही मंडळी साताऱ्याची होती.  ते त्याला काही समजले नाही. त्याने पुन्हा हिंदीत विनंती केली. तेव्हा ‘ठिक है भाई, किसी को तकलीफ होगी, एैसा हम कुछ करनेवाले नाही’ असे सांगत घोषणाबाजी थांबवली खरी, पण जो जोश त्यांनी दाखवला त्यावरून अयोध्येत काय होईल, यावर शेजारी प्रवाशाने शंका व्यक्त केली. 
 
नोटबंदीसाठी कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहिली नाही, मग मंदिरासाठी कशाला?
उद्धव ठाकरे म्हणाले, नोटबंदीचा निर्णय लागू करण्यासाठी केंद्र सरकारने कोर्टाच्या निकालाची वाट पाहिली नव्हती. आता राम मंदिर उभारण्यासाठी कोर्टाच्या निकालाची प्रतीक्षा का? आता हिंदू गप्प राहणार नाही. यादरम्यान शिवसैनिकांनी ‘हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार’ अशा घोषणा दिल्या. 
बातम्या आणखी आहेत...