आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई : 'रात्रीस खेळ चाले'चे राजकारण शिवसेना करत नाही. आम्ही जे काही करतो ते उघड व दिवसाढवळ्या करतो. तुम्ही माणसे फोडून करता आहात, आम्ही सरळसरळ बोलणी करतो. राष्ट्रपती राजवट दूर करण्यासाठी भल्या पहाटे मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली. पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक करावा तसा महाराष्ट्रावर हा फर्जिकल स्ट्राइक करण्यात आला आहे. शिवरायांचा महाराष्ट्र या फर्जिकल स्ट्राइकचा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. शिवसेना व राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या राजकारणाचा समाचार घेतला.
ही 'रात्रीस खेळ चाले' ही मालिका नव्हे : उद्धव म्हणाले, लोकशाहीच्या नावाने चाललेला खेळ संपूर्ण देशालाच लाजिरवाणा आहे. हे नवे हिंदुत्व पहायला मिळाले आहे. जनादेशाचा अनादर आम्ही केलाय म्हणून आमच्यावर आरोप केला जातो. पण सर्वांना कल्पना आहे की शिवसेना जे काही करते ते उघडपणे करते. आमचे राजकारण म्हणजे रात्रीस खेळ चाले ही टीव्हीवरची मालिका नव्हे. जे काही करतो ते दिवसाढवळ्या आणि उघडउघड करतो.
उद्धव ठाकरे यांचा भाजपला इशारा. आम्ही केलं तर जनादेशाचा अनादर...
आम्ही जर काही करायला गेलो तर तो जनादेशाचा अनादर ठरतो, पण हरियाणा, बिहारमध्ये जे झाले त्याचे काय? बिहारमध्ये सरकार फोडून मध्ये घुसलात. हरियाणात आठ दिवसाच्या आत चाैटाला यांच्याशी साटेलाेटे करुन त्याला सरकारमध्ये घेतलं. हा जनादेशाचा आदरच म्हणायचा का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपला केला.
खुर्चीला फेव्हिकॉल
ईव्हीएमवरील अाराेप कमी की काय म्हणून हा सगळा खेळखंडोबा मांडण्यात आला. हे बघितल्यानंतर यापुढे निवडणुका न घेता, मी पुन्हा येईन असे म्हणण्यापेक्षा मी जाणारच नाही, असं म्हणून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला फेव्हिकॉल लावून जर कोणी बसले तर ते अधिक योग्य होईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
कोशिश करके देखो
पत्रकारांनी शिवसेनेचे आमदार फुटतील अशी चर्चा असल्याचे पत्रकारांनी विचारले असता 'कोशिश करके देखीए, महाराष्ट्र सोनेवाला नही,' असे आव्हानच उद्धव ठाकरे यांनी दिले.
ही मी पणाविरुद्धची लढाई
विरोधी पक्ष नको, मित्र पक्ष नको, फक्त मी आणि मीच. ही मी पणाविरुद्धची लढाई आहे. हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र फक्त बोलण्यापुरता नाही. पाठीवर वार झाल्यावर महाराजांनी काय केले होते हा इतिहास सर्वांना माहित आहे. म्हणून कोणी पाठीत वार करू नये, असा इशारा ठाकरेंनी दिला.
अजितचा निर्णय वैयक्तिक, राष्ट्रवादीचा पाठिंबा नाहीच
मुंबई : 'फोडाफोडीचे राजकारण मी खूप पाहिले आहे. पक्षात फूट पाडून सरकार स्थापन करण्याचा भाजपचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. या सरकारला बहुमत सिद्ध करता येणार नाही. ३० नाेव्हेंबरनंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष सरकार स्थापनेसाठी प्रयत्न करतील, अशी विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी व्यक्त केला.
अजित पवार यांनी पक्षातील अामदार फाेडून भाजपसाेबत सत्ता स्थापन केल्याचे समजताच शरद पवार यांनी अापली भूमिका स्पष्ट केले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आज मुंबईत बैठक होणार होती. त्यानंतर राज्यपाल यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा ते करणार होते. मात्र तत्पूर्वीच भाजप आणि अजित पवार यांनी पहाटे सरकार स्थापन करत शपथविधी पूर्ण केला. त्यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.
राजभवनावर आमचे १० ते १२ आमदार अजित पवार यांच्यासोबत गेले होते. मात्र त्यांना राजभवनावर कशासाठी नेले जाते आहे, याची या आमदारांना काही कल्पना नव्हती, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रश्न नाही असे, पवार यांनी सांगितले. अजित पवार यांच्यावर काय कारवाई करणार
शरद पवार यांनी दिले स्पष्टीकरण
आमदारांच्या सह्यांच्या प्रती घेतल्या असाव्यात
राज्यपाल यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी सर्व ५४ आमदारांच्या त्यांच्या मतदारसंघाच्या क्रमांकासह सह्या घेण्यात आल्या होत्या. त्याच्या काही प्रती पक्ष कार्यालयात होत्या. त्या प्रती अजित पवार यांनी घेतल्या असाव्यात आणि राज्यपाल यांना सादर केल्या असाव्यात, अशी माझी प्राथमिक माहिती आहे, असे पवार यांनी सांगितले.
पहाटे ६ वाजता कळाले
अजित पवार राजभवनावर गेल्याचे मला ६ वाजता समजले. राजभवनाची कार्यक्षमता अचानक वाढल्याचे आश्चर्य वाटले. नंतर उलगडा झाला. भाजपसह जाण्याचा अजित यांचा निर्णय पक्षविरोधी आहे. त्यांनी शिस्त मोडली आहे. पक्ष त्यांच्यासाेबत नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
फोडाफोडी खूप पाहिली
फाटाफुटीचा राजकारणातून मी अनेकदा गेलो आहे. १९८६ मध्ये आमचे फक्त सहा आमदार राहिले होते. फुटून अनेक आमदारांचा आम्ही पराभव केला हाेता, याची अाठवण पवारांनी करुन दिली.
सुप्रियांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत
मुख्यमंत्रिपदासाठी सुप्रिया सुळे यांचे नाव चर्चेत होते, म्हणून अजित पवार नाराज होते का? या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, ''सुप्रियाच्या मुख्यमंत्रिपदाचा काही प्रश्नच नव्हता. ती खासदार आहे. त्या यापुढे सुद्धा राष्ट्रीय राजकारणातच कार्यरत राहणार आहेत', असे पवार यांनी स्पष्ट केले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.