आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सिल्लोड : सर्व विरोधक एकत्र आले तरी शिवसेनेचा वाघ अब्दुल सत्तार एकटा लढून जिंकेल, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सिल्लोड येथे रविवारी आ.अब्दुल सत्तार यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत बोलताना व्यक्त केला. दरम्यान, आज सत्तार आमच्याकडे आले, उद्या सत्ताही येईल, असेही ते या वेळी म्हणाले.
शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर झालेल्या जाहीर सभेस उमेदवार आ.अब्दुल सत्तार, शिवसेनेचे उपनेते चंद्रकांत खैरे,आ.अंबादास दानवे, औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देवयानी डोणगावकर, जिल्हा प्रमुख नरेंद्र त्रिवेदी,भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डाॅ. मच्छिंद्र पाखरे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.या वेळी बोलताना उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, शिवसेना परंपरा घेऊन चालणारा पक्ष असून युती झाल्यानंतर सिल्लोड-सोयगाव विधानसभेची जागा शिवसेनेकडे पहिल्यांदाच आली आहे.येथे शिवसेनेच्या विरोधात सर्व पक्ष,अपक्ष एकत्र आले तरी ही जागा लढणार व जिंकणार. निवडणूक जनतेच्या हातात असून शिवसेनेचा वाघ एकटा लढून जिंकतो, काळजी करू नका लढायचे व जिंकायचे ही घराण्याची परंपरा आहे.सत्तारभाई विचाराने सोबत आहेत.त्यामुळे सत्तार आपल्या सोबत असून उद्या सत्तारांसोबत आपली सत्ताही येणार आहे.पुढील काळात सर्वसामान्यांना आरोग्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एक रुपयामध्ये प्राथमिक तपासणी, चाचणी सेवा गोरगरिबांसाठी उपलब्ध करून देणार आहे. युतीचे सरकार सत्तेवर आल्यास गावागावात उद्योग धंदे व बेरोजगारांच्या हाताला काम उपलब्ध करून देणार आहे. यासोबतच सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात मका प्रक्रिया प्रकल्प, कॉटनहब तयार करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. या वेळी नगराध्यक्षा राजश्री निकम, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष केशवराव तायडे, बाजार समितीचे सभापती अर्जुन गाढे, उपसभापती नंदकिशोर सहारे, शिवसेना तालुकाप्रमुख किशोर अग्रवाल, सुदर्शन अग्रवाल यांची उपस्थिती होती. या सभेस कन्नडचे उमेदवार उदयसिंग राजपूत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव तायडे, शिक्षक सेनेचे पद्माकर इंगळे,उपजिल्हाप्रमुख रघुनाथ चव्हाण,उपजिल्हा प्रमुख राजेंद्र राठाेड,आदींची उपस्थिती हाेती.
परभणीत शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन
आमदार-खासदार करूनही काड्या करण्याचा उद्योग सुरूच
नांदेड : आमदार-खासदार करूनही काही मंडळींची काड्या करण्याची सवय जातच नाही. अशा मंडळींना त्यांची जागा दाखवून द्या, असा दम शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोहा येथील जाहीर सभेत दिला. त्यांचा रोख नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावर होता. शिवसेना उमेदवार मुक्तेश्वर धोंडगे, राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. ठाकरे पुढे म्हणाले की, ज्यांच्या रक्तातच गद्दारी आहे अशा मंडळींकडून अपेक्षा तरी काय कराव्यात? गद्दारी केल्यानंतर झाले-गेले विसरून लोकसभेला मदत केली, परंतु काड्या करण्याची सवय मात्र जात नाही.
आमदार बाजोरिया पिता-पुत्र प्रगटले..; निमित्त होते उद्धव ठाकरे यांच्या सभेचे
परभणी : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत यश पटकावल्यानंतर महिन्यानो महिन्यापासून गायब आ.विप्लव बाजोरिया यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या परभणीतील जाहीर सभेत हजेरी लावून महायुतीस सुखद धक्का दिला. शिवसेनेचे उमेदवार आ.डॉ.राहुल पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करते वेळी केलेल्या शक्तिप्रदर्शनास काही तासापुरते आ.विप्लव बाजोरिया व त्यांचे पिताश्री आ.गोपीकिशन बाजोरिया या दोघांनी हजेरी लावली. अन् पुन्हा अकोला गाठले.
ना आचार ना विचार, सत्ता आली तिकडे हे झुकणार; ठाकरेंचा पवारांवर घणाघात
परभणी : सरकार घालविण्याची भाषा करणाऱ्यांना ना आचार ना विचार, सत्ता आली तिकडे झुकणार अशीच यांची पध्दत. कितीही आदळआपट केली तरी हे सरकार हटणार नाही, असा इशारा देत शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी रविवारी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. परभणी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ.राहुल पाटील यांच्या प्रचारार्थ ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर मराठवाडा संपर्कप्रमुख विश्वनाथ नेरूरकर, खा.संजय जाधव आदींची उपस्थिती होती.
परभणी जिल्ह्यातील बंडखोरांबाबत शिवसेना पक्षप्रमुखांचे मौन
परभणी : जिल्ह्यातील पाथरी व जिंतूर या दोन विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारांबाबत शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी रविवारच्या जाहीर सभेतून अवाक्षरही काढले नाही. व्यासपीठावर पाथरीचे महायुतीचे उमेदवार आ.मोहन फड असतानाही त्यांची दखलही पक्षप्रमुखांकडून घेतली गेली नाही. पाथरीमध्ये शिवसेनेचे डॉ.जगदीश शिंदे यांनी, तर जिंतुरात शिवसेनेचे विधानसभा प्रमुख व जिल्हा परिषदेचे गटनेते राम खराबे पाटील यांनी देखील बंडखोरी करीत रिंगणात उडी घेतलेली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.