rally / विमा कंपन्यांना शिवसेना सरळ करणार; उद्धव ठाकरेंचा जालना येथील सभेत इशारा

कर्जमाफी, पीक विम्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली नाराजी

प्रतिनिधी

Jun 10,2019 09:13:00 AM IST

जालना - शिवसेनेच्या प्रयत्नांमुळेच शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळाली आहे. मात्र बँकांच्या धोरणामुळे या योजनेत अद्यापही अनेक अडथळे आहेत. पीक विम्याचीही अशीच अवस्था आहे. विमा कंपन्यांच्या दलालांनी गावोगाव फिरून हप्ते गोळा केले, मात्र शेतकऱ्यांना त्याचा लाभ दिला नाही. मुख्यमंत्र्यांनी त्यांना कडक सूचना केल्या आहेत. मात्र तरी या कंपन्या ठिकाणावर आल्या नाहीत तर शिवसैनिक त्यांना सेना स्टाइलने सरळ करतील, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. ते जालना तालुक्यातील साळेगाव घारे येथील सभेत बोलत होते.


बाळासाहेब ठाकरे महाप्रसाद योजनेअंतर्गत चारा छावणीत पशुधन दाखल केलेल्या शेतकऱ्यांना शिधावाटप करण्यात आला. त्यानिमित्त जालना तालुक्यातील साळेगाव घारे येथील चारा छावणीवर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमास शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर,आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री संजय राठोड, खासदार प्रताप जाधव, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर,जयदत्त क्षीरसागर, माजी खासदार चंद्रकांत खैरे, संजय शिरसाट, महापौर नंदू घोडेले, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, देवयानी डोणगावकर, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे. बोराडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पाच हजार शेतकऱ्यांना शिधावाटप करण्यात आला. यात १५ दिवस पुरेसे होईल इतके पीठ, तांदूळ, तेल, मसाले आदी देण्यात आले. याप्रसंगी ठाकरे यांनी कर्जमाफी व पीक विम्याबाबत नाराजी व्यक्त केली. शिवसेनेने शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून दिली. सरकारने या योजनेत केवळ एक लाख रुपयांची मर्यादा ठेवली होती, मात्र शिवसेनेमुळे ती दीड लाख रुपये करण्यात आली. परंतु आता बँकांमुळे अद्यापही सर्वच शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही. त्यामध्ये असलेले अडथळे दूर करून त्याचा शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत लाभ पोहोचावा हा शिवसेनेचा आग्रह व हट्ट असल्याचे ठाकरे याप्रसंगी म्हणाले. पीक विमा गोळा करण्यासाठी ११ मोठ्या कंपन्यांचे दलाल गावोगाव फिरले, त्यांनी शेतकऱ्यांकडून हप्ते गोळा केले. मात्र नुकसानभरपाई शेतकऱ्यांना त्यांनी दिलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊन बँका आणि विमा कंपन्यांना सरळ करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र तसे झाले नाही तर शिवसैनिक त्यांना आणखी वाकडे करेल असा इशारा ठाकरे यांनी या वेळी दिला. तत्पूर्वी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संकटात मदतीसाठी धावून येणारा पक्ष म्हणून शिवसेनेची ओळख निर्माण झाली आहे, असे खोतकर याप्रसंगी म्हणाले. या वेळी चंद्रकांत खैरे, एकनाथ शिंदे, जयदत्त क्षीरसागर यांनीही मनोगत व्यक्त केले.


शेतकऱ्यांशी संवाद : उद्धव ठाकरे यांनी साळेगाव घारे येथील चारा छावणीतील शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांनी चारा छावण्या सुरूच ठेवाव्यात, पीक विम्याचा लाभ मिळूवन द्यावा, कर्जमाफी आणि पुन्हा कर्ज मिळवण्यासाठी येत असलेल्या अडचणींची ठाकरे यांना माहिती दिली.


उशीर झालेला नाही : उद्धव ठाकरे यांनी पावसाळा सुरू झाल्यावर दुष्काळी दौरा सुरू केल्याची टीका होते आहे. त्यावर ठाकरे यांनी उत्तर दिले. आता पाऊस पडला तरी लगेच चारा तयार होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आणखी चारा छावण्या व अन्य मदतीची गरज आहे. शिवाय राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे स्वखर्चातून टँकरद्वारे पाणी वाटप करीत आहेत, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनीही गावोगाव जाऊन दुष्काळात मदत केली आहे. एकनाथ शिंदे यांनी औरंगाबाद जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांचे वाटप केलेे. त्यामुळे मी जरी आता आलो असलो तरी शिवसेना शेतकरी व दुष्काळग्रस्तांसोबत असल्याचे ठाकरे म्हणाले.


मदत केंद्र सुरू करा : पीक विम्याबाबत विमा कंपन्या शेतकऱ्यांना मदत करीत नाही. त्यामुळे जालन्यात अर्जुन खोतकर, औरंगाबादेत चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर अशा प्रकारे मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवसेनेने मदत केंद्रे सुरू करावीत. कोणत्या शेतकऱ्याने किती रुपये विमा भरला, त्याला विम्याची मदत मिळाली का, मिळाली नसेल तर कारण काय अशी माहिती गोळा करून आपल्याकडे पाठवावी. आपण विमा कंपन्यांना मदत देण्यास भाग पाडू, असे ठाकरे या वेळी म्हणाले.

खैरेंचा नाही, माझा पराभव
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचा पराभव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. जालना तालुक्यातील साळेगाव घारे येथील चारा छावणीच्या भेटीप्रसंगी आपल्या १८ मिनिटांच्या भाषणात ठाकरे यांनी त्याचा दोन वेळा उल्लेख केला. हा पराभव दुर्दैवी आहे. हा चंद्रकांत खैरेंचा पराभव नाही, तर माझा पराभव आहे. परंतु आम्ही औरंगाबाद सोडणार नाही. ती जागा आम्ही पुन्हा ताब्यात घेऊ, असा निर्धार उद्धव ठाकरे याप्रसंगी व्यक्त केला.

X
COMMENT