आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपला ‘चकवा’ देत जालना जिल्हा परिषदेवर शिवसेनेने फडकवला भगवा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अध्यक्षपदी शिवसेनेचे उत्तम वानखेडे, उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे महेंद्र पवार

जालना - गेल्या महिनाभरापासून जिल्हा परिषदेत सत्ता कायम ठेवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी महाआघाडीकडून प्रयत्न सुरू होते. भाजपनेही जोरदार फिल्डिंग लावली होती. यासाठी सदस्यांना सहलीवर नेण्यात आले होते. मात्र, महाआघाडीकडे संख्याबळ अधिक असल्यामुळे भाजपला नमते घ्यावे लागले.  भाजप सदस्य सोमवारी आयोजित विशेष सभेत गैरहजर राहिले. परिणामी जि.प. अध्यक्षपदी शिवसेनेचे उत्तम वानखेडे तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे महेंद्र पवार यांची बिनविरोध निवड झाली.  विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यात ज्याप्रमाणे शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी महाआघाडी स्थापन करून सत्ता स्थापन केली तसा प्रयोग जालना जिल्हा परिषदेत तीन वर्षांपूर्वीच  झाला होता. हाच पॅटर्न यंदाही कायम ठेवण्यासाठी बड्या नेत्यांनी पुढाकार घेतला. यासाठी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांना सहलीवर पाठवून दिले.  भाजपनेही सदस्यांना सहलीवर नेले होते. शिवाय, दोन्हीकडून बहुमताहून अधिक सदस्य सोबत असल्याचा दावा करण्यात येत होता. एकूण ५६ सदस्य असलेल्या जिल्हा परिषदेत बहुमतासाठी २९ सदस्यांची आवश्यकता असताना आपल्याला ३१ सदस्यांचा पाठींबा असल्याचे दोन्हीकडून सांगण्यात येत होते. अपक्षांसह पक्षातील काही नाराजांना हाताशी धरून हा आकडा गृहीत धरला जात होता.  काही अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची नावेही चर्चिल्या गेली. मात्र, रविवारी चित्र पालटले  भाजपकडे गेलेले काही नाराज सदस्य महाआघाडीत परतले. जिल्ह्यातील महाआघाडीच्या बड्या नेत्यांनी यात विशेष लक्ष दिल्यामुळे सोमवारी अध्यक्ष-उपाध्यक्षाची निवड बिनविरोध झाली. तर याचा अंदाज आल्याने भाजपच्या सदस्यांनी गैरहजर राहणेच पसंत केले. 

अशी झाली निवड प्रक्रिया

सकाळी ११ ते १ वाजेदरम्यान अध्यक्षपदासाठी उत्तम वानखेडे यांनी दोन अर्ज भरले. याला अनुक्रमे कैलास चव्हाण व भागवत उफाड हे सूचक होते. अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा वेळ दिला होता. निर्धारित वेळेत अध्यक्ष पदासाठी एकमेव उमेदवाराचे दोन अर्ज आले होते. यामुळे  पीठासीन अधिकारी दीपाली मोतीयेळे यांनी उत्तम वानखेडे हे बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले. त्यानंतर उपाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया सुरू झाली. यात उपाध्यक्ष पदासाठी महेंद्र पवार व पूजा सपाटे यांचे अर्ज आले होते. त्यांना अनुक्रमे गणेश पवार व रघुनाथ तौर हे सूचक होते. अर्ज मागे घेण्यासाठी २.२५ ते २.४० वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली होती. यात पूजा सपाटे यांनी अर्ज मागे घेतला. यामुळे उपाध्यक्ष पदासाठी एकमेव उमेदवार महेंद्र पवार यांचा अर्ज शिल्लक राहिल्याने पीठासीन अधिकाऱ्यांनी पवार हे बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले. 

जाफराबादला प्रथमच अध्यक्षपद

देशाच्या स्वातंत्र्यानंतर उत्तम वानखेडे यांच्या रूपाने प्रथमच जाफराबाद तालुक्याला जि. प. अध्यक्षपद मिळाले. सोनखेडा येथील रहिवासी वानखेडे हे वरुड बु.सर्कलचे नेतृत्व करतात. वानखेडे हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाल्याचे समजताच जाफराबाद तालुक्यातील पदाधिकारी-कायकर्त्यांनी जिल्हा परिषद सभागृह गाठून जल्लोष केला.

आता डोळे सभापतिपदाकडे 

अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड बिनविरोध झाली आता सभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याची उत्सुकता लागली आहे. यात काही नाराजांना संधी मिळू शकते. मात्र, महाआघाडीच्या पॅटर्नप्रमाणेच सभापती पदाचेसुद्धा वाटप होईल, असे सांगितले जात आहे. यासाठी महाआघाडीतील जिल्हा परिषद सदस्यांनी बड्या नेत्यांकडे आग्रह धरला आहे.

जिल्हा परिषदेत बडे नेते दाखल 

राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी आमदार सुरेश जेथलिया, माजी आमदार संतोष सांबरे,  माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्यासह शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए. जे. बोराडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, बबलू चौधरी यांच्यासह बडे नेते जिल्हा परिषदेत दाखल झाले होते.