आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेचे अामदार विजय औटी हाेणार विधानसभेचे उपाध्यक्ष ?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -  २१ ऑक्टोबर २०१४ पासून अस्तित्वात आलेल्या तेराव्या विधानसभेचे रिकामे असलेले उपाध्यक्षपद  भरण्यास अखेर चार वर्षांनंतर का हाेईना मुहूर्त लागला अाहे. शुक्रवारी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी या पदासाठी निवडणूक हाेणार असल्याची घाेषणा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विधानसभेत केली.  विधानसभेचे अध्यक्षपद भाजपकडे असल्याने उपाध्यक्षपद शिवसेनेला देऊन त्यांची नाराजी दूर करण्याची तयारी भाजपने दर्शवली अाहे. त्यानुसार नगर जिल्ह्यातील पारनेरचे शिवसेना अामदार विजय अाैटी यांची या पदावर वर्णी लागण्याची चिन्हे अाहेत.

  
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर सुरुवातीला विरोधी पक्ष म्हणून कार्यरत झालेल्या शिवसेनेने नंतर सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. उपाध्यक्षपदाचीही मागणी केली होती. परंतु चार वर्षे झाली तरी यावर निर्णय घेण्यात आला नव्हता, त्याला अाता मुहूर्त लागला अाहे.  

 

बहुमत असल्याने युतीचेच यश
विधानसभेत भाजप १२३ आणि शिवसेना ६३ अशी सदस्य संख्या असल्याने युतीचे स्पष्ट बहुमत अाहे. त्यामुळे उपाध्यक्षपदाची निवडणूक झाल्यास विजय औटी सहज निवडून येतील. मात्र ही निवडणूक बिनविरोध होईल असे म्हटले जात आहे.

  
या निवडणुकीसाठी २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.४५ वाजेपर्यंत विधानमंडळाचे  प्रधान सचिव यांच्या दालनात उमेदवारी अर्ज दाखल करता येतील.  त्याच दिवशी अर्जांची छाननी हाेईल. ज्या उमेदवाराला अर्ज परत घ्यायचा असेल त्याने स्वतः अथवा त्याच्या अनुमोदकाने त्याबाबतची लेखी सूचना प्रधान सचिवांकडे  ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजेपर्यंत देणे आवश्यक आहे. निवडणुकीची  आवश्यकता भासली तर ३० नोव्हेंबर  रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १ वाजता या वेळेत विधानसभा सभागृहात मतदान होईल. त्यानंतर दुपारी १.३० वाजता सभागृहाची बैठक पुन्हा सुरू होईल, असेही अध्यक्षांनी  या वेळी बोलताना सांगितले.  

 

आतापर्यंत १३ विधानसभांमध्ये झाले २२ उपाध्यक्ष
१९३७ पासून २०१४ पर्यंत एकूण २२ विधानसभा उपाध्यक्षांची निवड करण्यात आली होती. सुरुवातीला नारायणराव गुरू जोशी, षण्मुगप्पा अंगदी आणि शिवलिंगप्पा कंठी उपाध्यक्ष होते. द्विभाषिक मुंबई विधानसभेच्या १९५० ते ६० च्या दरम्यान शेषराव वानखेडे आणि दीनदयाल गुप्ता उपाध्यक्ष होते. त्यानंतर १९६० ते २०१४ पर्यंत दीनदयाल गुप्ता, कृष्णराव गिरमे,रामकृष्ण बेत, सय्यद फारुक पाशा, शिवराज पाटील, गजाननराव गरुड, सूर्यकांत डोंगरे, शंकरराव जगताप, कमलकिशोर कदम, डॉ. पद्मसिंह पाटील, बबनराव ढाकणे, अण्णा जोशी, मोरेश्वर टेमुर्डे, शरद तसरे, प्रमोद शेंडे, मधुकरराव चव्हाण आणि प्रा. वसंत पुरके यांनी उपाध्यक्षपद सांभाळले होते.

बातम्या आणखी आहेत...