आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेचा ‘वरळी टर्न’

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेला महिनाभर मुंबापुरीत चर्चा सुरू आहे, ती वरळीची. वरळी म्हणजे बीडीडी चाळी. निम्नवर्गीय मराठी माणसांची वस्ती. दलितांचा बालेकिल्ला. आज वरळी चर्चेत आली ती आदित्यचा मतदारसंघ म्हणून. प्रबोधनकारांच्या घराण्यातील पहिली व्यक्ती निवडणूक लढवते आहे. त्यामुळे वरळीची चर्चा तर होणारच. शनिवारी आदित्यच्या उमेदवारीची घोषणा झाली. सोमवारी सकाळी वरळीभर आदित्यची होर्डिंग्ज झळकली. आदित्यची होर्डिंग्ज मायमराठीत असती तर हरकत नव्हती. पण, ती आंग्ल भाषेत आहेत. तामिळ-तेलगूत आहेत, तशीच ती चक्क गुजरातीतसुद्धा आहेत. मराठी अस्मितेच्या नावाने जे वाघासमान संघटन उभे राहिले, वाढले, त्याच्या युवराजाची होर्डिंग्ज परभाषांत लागली तर चर्चा होणारच. पण, आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. शिवसेना असा पक्ष आहे, जो आपल्या भूमिका सारखा बदलतो. १९६६ मध्ये मराठी माणसांच्या हक्कासाठी शिवसेना स्थापन झाली. पुढे याच पक्षाचे राज्यसभेवर सर्वाधिक अमराठी खासदार होते. ‘घरात नाही पीठ, अन् मागतात विद्यापीठ’ असं दलितांना हिणवणाऱ्या शिवसेनेने शिवशक्ती अन् भीमशक्तीच्या प्रयोगासाठी रिपाइंला साद घातली. सत्तरीच्या दशकात ‘उठाव लुंगी, बजाव पुंगी’ म्हणत नोकऱ्यांतील दक्षिण भारतीयांच्या वर्चस्वाला शिवसेनेने विरोध केला. आता तीच शिवसेना तेलगू अन तामिळमध्ये होर्डिंग्ज लावते? धारावीत पाय पसरता यावेत म्हणून तेलगू नेत्यांना पदे देते. ‘एक बिहारी सौ बिमारी’ म्हणत उत्तर भारतीयांच्या विरोधात रान उठवणारी शिवसेना हिंदी मतदारांना चुचकारण्यासाठी दोपहर का सामना वृत्तपत्र काढते. इतकेच नाही तर हिंदी माध्यमांत संपर्क वाढावा म्हणून प्रियंका चतुर्वेदी या हिंदी महिलेला सेनेचा नेताही करते. टोकदार अस्मिता निवडणुकांत जशा लाभाच्या असतात, तशाच त्या अपकारकसुद्धा असतात. त्यामुळेच सेनेने आपल्या सोयीप्रमाणे अस्मितांचे राजकारण केल्याचा तिचा इतिहास सांगतो. हल्ली शिवसेनेचे काम सोपे झाले आहे. शिवसेनेच्या अस्मितांचा भार मनसेने खांद्यावर घेतला आहे. त्यामुळे सेनेची मान अस्मितांच्या जोखडातून मोकळी झाली आहे. वरळी मतदारसंघातून या वेळी आदित्य निवडणूक लढवत आहेत. तो मतदारसंघ बहुभाषिक आहे. येथे ६० टक्के मराठी वस्ती आहे. ८ टक्के गुजराती, १० टक्के मुस्लिम आणि १० टक्के दक्षिण भारतीय आहेत. त्यामुळे मतदारांच्या भाषिक अस्मितांना शिवसेना कुरवाळते आहे. त्यातूनच आदित्यची तेलगू, तामिळ, गुजरातीत होर्डिंग्ज लावण्यात आली आहेत. काही हरकत नाही, आदित्य नव्या मनूतील नव्या पिढीचा शूर शिपाई आहे. पण, इतिहास भूतकाळ विसरत नाही आणि माफही करत नाही. मुंबईकरांची इतकीच मनीषा आहे, आदित्यच्या  होर्डिंग्जचा कित्ता सेना नेत्यांनीही प्रमाण मानावा. सेनेचे नेते विधिमंडळात उत्तर भारतीय आमदारांना हिंदीतून बोलू देणार नाहीत, तिकडे मुंबई महापालिकेत उत्तर भारतीय अधिकाऱ्यांना मराठीत बोलण्याचा हट्टाग्रह धरणार... इकडे हवी तशी होर्डिंग्ज लावणार. याला काय म्हणायचे? ‘पोटात एक अन्् ओठात एक’ असं सेनेचं कदापि नसतं, असं बाळासाहेब ठणकावून सांगायचे. ते आता शिवसेनेनं आपल्या भाषिक धोरणातूनही दाखवून द्यावं, इतकंच मुंबईकरांचं मागणं आहे.

बातम्या आणखी आहेत...