आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'महाराजांच्या गादीचा मान आहे, पण वारसांनी स्वतःला शिवाजी महाराज समजू नये...', जितेंद्र आव्हाडांचा उदयनराजेंवर पलटवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'साहेबांना महाराष्ट्राची जाण आहे, म्हणूनच ते जाणते राजे आहेत'

मुंबई- भाजप नेत्याच्या वादग्रस्त पुस्तकामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. यातच शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीका केली. ''अनेकजण स्वत:ला जाणता राजा म्हणवून घेतात. मात्र जानता राजा म्हणण्याचा हक्क त्यांना कोणी दिला. या जगात फक्त एकच जाणता राजा आहे, ते म्हणजे शिवाजी महाराज. त्यामुळे कोणालाही जे जाणता राजा म्हणतात, त्याचाही मी निषेध करतो,'' असे ते म्हणाले होते. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे नेते मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

आव्हाड म्हणाले की, ''होय शरद पवार जाणता राजा आहे. महाराष्ट्राचा अतिशय बारकाईने अभ्यास असणारा नेता म्हणजे शरद पवार आहे. येथील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा प्रश्न, येथील औद्योगिक वसाहतीचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमजुरांचे प्रश्न, स्त्रियांचे प्रश्न, अशा अनेक प्रश्नांची जाण आहे. म्हणून शरद पवार हे जाणता राजा आहेतच,'' असे आव्हाडांनी उदयनराजेंना प्रत्युत्तर दिले.

पुढे बोलताना आव्हाड म्हणाले की, ''महिलांना 30 टक्के आरक्षण, कोकण रेल्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मराठवाडा विद्यापीठाला नाव, जेएनपीटी, असे किती प्रकल्प सांगू, त्यामुळे गेल्या 60 वर्षांत महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात सर्वात जास्त योगदान हे शरद पवारांचे आहे. उदयनराजेंवर बाबासाहेब पुरंदरेंचे संस्कार आहेत. आपण एखाद्याला लोकनायक म्हणतो, लोकनेते म्हणतो. तसं शरद पवार यांना जाणते राजे म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराज आपण कुणाला म्हणत नाही. कुणाच्या घरात मुलाचे नाव शिवाजी ठेवले तर काय एनओसी साताऱ्यातून मागवायची का? शिवरायांच्या प्रेमापोटीच हे नाव ठेवले जाते."

"1960 ते 2020 असा 60 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव शरद पवारांना आहे. 90 च्या दशकात साताऱ्यात उदयनराजेंना फक्त 156 मते मिळाली होती. शिवाजींच्या वारसाबद्दल सातारकरांचे मत काय हे त्यांनी त्या वेळी दाखवून दिले होते. पवार साहेबांच्या आशीर्वादानेच ते इथपर्यंत आले. साहेबांनी त्यांच्या डोक्यावरील हात काढल्यास काय झाले हे सर्व भारताने पाहीले आहे. आम्ही महाराजांच्या गादीचा मान ठेवतो पण, वारसांनी स्वतःला शिवाजी महाराज समजू नये. आम्हाला उदयनराजेंच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही." असा हल्लाबोल आव्हाडांनी केला.
 

बातम्या आणखी आहेत...