आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्तथरारक प्रात्यक्षिके, हेलिकाॅप्टरमधून पुष्पवृष्टीने शिवप्रतापदिन उत्साहात

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
किल्ले प्रतापगडावर बुधवारी छावा प्रतिष्ठानच्या युवकांनी मर्दानी खेळ सादर केले, तसेच शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकाॅप्टरनेही पुष्पवृष्टी करण्यात आली. - Divya Marathi
किल्ले प्रतापगडावर बुधवारी छावा प्रतिष्ठानच्या युवकांनी मर्दानी खेळ सादर केले, तसेच शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकाॅप्टरनेही पुष्पवृष्टी करण्यात आली.

महाबळेश्वर/ सातारा - छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा प्रतापगडाच्या पायथ्याशी काेथळा बाहेर काढला, ताे दिवस म्हणजे शिवप्रतापदिन. दरवर्षीप्रमाणे प्रशासनातर्फे यंदाही बुधवारी हा शाैर्य दिन गडावर अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.
 
जय भवानी जय शिवाजीच्या घाेषणा, शिवरायांच्या वेशभूषेतील बालके, पोवाडा, ढोलताशा-हलगी, तुताऱ्या, लेझीमच्या गजराने वातावरण भारावून गेले हाेते. चांदीच्या पालखीतून छत्रपती शिवरायाच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. गडावरील पुतळ्यावर हेलिकाॅप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. हा साेहळा पाहण्यासाठी माेठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित हाेते. 

बुधवारी पहाटे सातारचे अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी गडावरील भवानीमातेच्या मूर्तीला सपत्नीक अभिषेक केला. शिवशाहीचे प्रतीक असणाऱ्या भगव्या ध्वजाचे रोहण करण्यात आले. त्यानंतर मानाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली. या पालखीत शिवमूर्ती विराजमान करून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. लेझीम-तुताऱ्या, काठीवर चालणारी मुले, शिवरायांचा जयजयकार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घेाषणांनी मिरवणूक मार्ग दुमदुमून गेला होता.

पालखीचे शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ आगमन झाल्यावर तिथे पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. हेलिकाॅप्टरने पुष्पवष्टीही झाली. शिवकर्तृत्वाचा महिमा सांगणारा पोवाडा शाहीर शरद यादव यांनी सादर केला. शालेय विद्यार्थी व युवकांनी विविध चित्तथरारक कसरती करून उपस्थितांची मने जिंकली.