आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रलोभनांपासून दूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगात दैनंदिनीसाठीही वेळ काढावा लागतो. एवढी व्यग्रता वाढली आहे. त्यातच आजूबाजूला घडणा-या चो-या, महिलांवरील अत्याचार, लूट, फसवेगिरी पाहता प्रामाणिकपणा, साधनशुचिता यांना जीवनात स्थान आहे की नाही, असा विचार मनात डोकावू लागतो. मात्र, काही प्रसंगांतून प्रामाणिकतेची खात्री पटते. संबंधिताच्या या गुणाला सलाम केल्याशिवाय राहवत नाही. अकोल्याच्या रणपिसेनगरातील बारा ज्योतिर्लिंग मंदिराजवळ ऑटोमोबाइल्सचे एक छोटेसे दुकान आहे. बबन राऊत यांचा बोलका स्वभाव असल्याने येणा-या-जाणा-या व्यक्ती त्यांच्याजवळ थांबतात. विचारांची देवाण-घेवाण होते. काही दिवसांपूर्वी त्या भागातील रहिवासी गजानन कुळकर्णी राऊत यांच्या दुकानात हीरो होंडाची डिकी काढून टाकण्यासाठी गेले होते. रात्रीची वेळ होती. रस्त्यावर गर्दी होती. घाईतच बबन राऊत यांनी कुळकर्णी यांना डिकी काढून दिली. त्यांच्या कामाचे पैसे दिले. अनवधानाने पैशाचे पाकीट दुकानातील एका स्टूलवर विसरून कुळकर्णी निघून गेले. त्यांच्या पाकिटामध्ये गाडीचे लायसन्स, एटीएम कार्ड व बरीच मोठी रक्कम होती. त्यातील 1300 रुपये त्यांनी गाडी पुण्याला पाठवायची असल्यामुळे त्यासाठी वेगळे काढून ठेवले होते. बबन राऊत यांच्या लक्षात एकूण प्रकार आला. त्यांनी कुळकर्णी यांच्या घरी जाऊन पाकीट त्यांच्या स्वाधीन केले. इकडे कुळकर्णींना पाकीट नेमके कोठे ठेवले ते लक्षातच येत नव्हते. एवढ्यात सदनिकेचे तीन मजले चढून गजानन राऊत पाकिटासह त्यांच्या पुढ्यात उभे ठाकले. तुमचे पाकीट द्यायला आलो, असे त्यांनी सांगताच कुळकर्णी यांचा जीव भांड्यात पडला. महत्त्वाची कागदपत्रे, पैसे
अचानक दिसत नसल्यामुळे वेगवेगळे विचार कुळकर्णी यांच्या मनात आले होते. कारण आजकाल दिवसच बदलले आहेत, परंतु राऊत यांच्या प्रामाणिकपणाचा चांगला अनुभव कुळकर्णी यांना आला. इतकेच नाही तर कुळकर्णी यांनी देऊ केलेले बक्षीसही राऊत यांनी नाकारले.