आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवराज्याभिषेक दिनविशेष; : शिवछत्रपतींचे शिवराई नाणे तब्बल सव्वादोनशे वर्षे चलनात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - शिवराज्याभिषेकाला आज ३४५ वर्षे पूर्ण झाली. राज्याभिषेक ही शिवाजी महाराजांच्या आणि मराठेशाहीच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाची घटना होती. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजेच ६ जून १६७४ रोजी राज्याभिषेक मोठ्या थाटात पार पडला. राज्याभिषेकापासून महाराज ‘राजा शिवछत्रपती’ झाले. या राज्याभिषेकापासून महाराजांनी स्वराज्याचे प्रतिनिधित्व करणारे स्वचलन सुरू केले. तांब्याची ‘शिवराई’ आणि सोन्याचा ‘शिवराई होन’ ही नाणी महाराजांनी सुरू केली. शिवराई हे तांब्याचे नाणे स्वराज्यात अत्यंत लोकप्रिय झाले आणि इ.स. १६७४ पासून १९ व्या शतकापर्यंत तब्बल सव्वादोनशे वर्षे महाराजांचे हे नाणे चलनात राहिले.


ब्रिटिश काळातही शिवराईचा वापर
ऐतिहासिक नाण्यांचे युवा अभ्यासक, संशोधक आशुतोष पाटील म्हणाले, ‘महाराजांच्या मूळ शिवराई नाण्यात कालौघात विविध बदल होत गेले. पण हे शिवराई नाणे चलनात राहिले हे विशेष. १८१८ नंतरच्या ब्रिटिश काळातही शिवराई वापरात होते. महाराजांनी सुरू केलेली ही नाणी वैशिष्ट्यपूर्ण होती. महाराजांची आदर्श शासनव्यवस्था, राज्यकारभारामुळे या चलनाला प्रतिष्ठा, विश्वासार्हता प्राप्त झाली होती.’

 

शिवराईची वैशिष्ट्ये
या नाण्याच्या पुढील बाजूस बिंदुमय वर्तुळामध्ये ‘श्री/राजा/शिव’ असे तीन ओळीत तर मागील बाजूस ‘छत्र/पति’ असा दोन ओळीत मजकूर असतो. या नाण्यांचा आकार साधारणतः वाटोळा असून अत्यंत सुबक अक्षरात या नाण्यांवर मजकूर असतो. ही नाणी प्रत्येकी ११ ते १३  ग्रॅम वजनात आढळतात.

 

सुवर्ण होनाची वैशिष्ट्ये
छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकदिनी सुरू केलेल्या सोन्याच्या नाण्यास ‘शिवराई होन’ म्हणतात. शिवाजी महाराजांच्या शिवराई होन या नाण्यावर बिंदुमय वर्तुळात पुढील बाजूंनी तीन ओळींत “श्री/राजा/शिव” तर मागील बाजूंनी दोन ओळींत “छत्र/पति” असे अंकित केलेले असून या नाण्याचा आकार वाटोळा असतो, नाण्याचे वजन २.७ ग्रॅमच्या आसपास आढळते. नाण्याचा व्यास १.३२ सेंमी असून त्यात सोन्याचा कस हा ९७.४५ असतो.
 

फनम, कासूचाही समावेश
शिवराई व होन या नाण्यांव्यतिरिक्त सोन्याचा फनम, कासू, होन नुख्रा, ही नाणीदेखील शिवछत्रपतींच्या नावाने टाकसाळीत आढळतात. स्वराज्याचे चलन या पुस्तकात याविषयी मी मांडणी केली आहे. 
आशुतोष पाटील, नाण्यांचे अभ्यासक 

 

उस्मानाबादच्या अात्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलेस राज्याभिषेकाचा मान
किल्ले रायगडावर गुरुवारी (दि. ६) शिवराज्याभिषेक साेहळा साजरा हाेत अाहे. यंदा शिवराज्याभिषेकाचा मान मेंडसिंगाचे (जि. उस्मानाबाद) आत्महत्याग्रस्त शेतकरी लक्ष्मण अवचार यांच्या पत्नी रेश्मा यांना मिळाला अाहे. राज्यात कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. यामुळे शेतकऱ्यांत नैराश्यही अालेले अाहे. या पार्श्वभूमीवर सोहळ्याचे आयोजक खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी हा निर्णय घेतला.

बातम्या आणखी आहेत...