आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीच्या तोंडावर बीडमध्ये विनायक मेटेंना धक्का, \'शिवसंग्राम\'च्या दोन झेडपी सदस्यांनी हाती घेतला भाजपचा झेंडा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बीड- राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही. याची प्रचिती बीड जिल्ह्यात आली आहे. ''कार्यकर्ते नाराज असल्यामुळे मी पंकजा मुंडेंसोबत काम करणार नाही,'' असा इशारा शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिला होता. या घटनेला आठ दिवस होत नाही तोवर शिवसंग्रामचे दोन जिल्हा परिषद सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. जिल्हा परिषदेतील गटनेते अशोक लोढा आणि सदस्य विजयकांत मुंडे अशी या सदस्यांची नावे असून पंकजा मुंडे यांचे नेतृत्व स्वीकारून भाजपमध्ये प्रवेश केला.

 

शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे हे पहिल्यांदाच विधानसभेसाठी निवडणूक लढवली होती. राष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात त्यांना काही मतांनी पराभव स्विकारावा लागला होता. त्यानंतर त्यांनी मतदारसंघात पुन्हा जोमाने काम करायला सुरूवात केली, आणि त्याचाच परिणाम म्हणजे त्यांचे तीन सदस्य जिल्हापरिषदेवर निवडून गेले. या सदस्यांच्या बळावर मेटेंचे आमदारकीचे स्वप्न पूर्ण झाले होते.

 


येत्या विधानसभा निवडणुकीसाठी मेटे यांनी जय्यत तयारी केली होती, पण पंकजा मुंडे यांच्या दुराव्यामुळे विनायक मेटे यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागला आहे. मुंडे यांनी राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्याशी जवळीक साधल्याने मेटे पुरतेच नाराज झाले होते. त्यामुळे काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडेंवर शिवसंग्रामचे कार्यकर्ते नाराज आहेत, असे सांगत लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या सोबत काम करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले होते. तिकडे कार्यकर्ते नाराज असल्याचे सांगत असतानाच दुसरीकडे शिवसंग्रामचे दोन जिल्हा परिषद सदस्य भाजपच्या गोट्यात गेल्याने मेटेंना पुन्हा एकदा जोरदार धक्का बसला आहे.

बातम्या आणखी आहेत...