मुंबई- भारत आणि पाकिस्तानमधील कलाकारांच्या संयुक्त बॅंडची घोषणा करणा-या पत्रकार परिषदेत आज शिवसेनेने राडा केला. पाकिस्तानचे कलाकार असलेल्या कोणत्याही बॅंडला अथवा इतर कोणत्याही कार्यक्रमाला आमचा विरोध राहील, असे शिवसैनिकांनी म्हटले आहे. सध्या मुंबईत सुरु असलेल्या काला घोडा फेस्टिव्हलमध्ये भारत-पाकच्या संयुक्त बॅंडचा कार्यक्रम होणार होता.
भारत आणि पाकिस्तान यांच्या संयुक्त बॅंडच्या माध्यमातून दोन्ही देशातील सांस्कृतिक घटकांना एकत्र आणून दोन्ही देशाचे बिघडलेले संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी दोन्ही देशांतील कलाकारांच्या एक संयुक्त बॅंडची संकल्पना मांडण्यात आली होती. त्यानुसार एक संयुक्त बॅंडही तयार केला. त्याबाबतची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात होती. मात्र, शिवसेनेला याची चाहुल लागली होती. आज दुपारी तीन-साडेतीनच्या सुमारास मुंबईच्या प्रेसक्लबमध्ये या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. पत्रकार परिषदेला सुरुवात होताच दबा धरून बसलेल्या शिवसैनिकांनी पत्रकार परिषदेत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तसेच तेथे पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. मुंबई आणि आमच्या देशावर हल्ला करणा-या पाकिस्तानच्या कलाकारांना मुंबईतच नव्हे तर देशभर काम करण्यास आमचा विरोध राहिल अशी भूमिका सेनेनी घेतली आहे.