आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी करत शिवसेनेचा भाजपला चेकमेट करण्याचा प्रयत्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सगळीकडे सध्या नावांची चर्चा आहे. देशातील काही शहरांची नावे बदलली जात आहेत. तर काहींची नावे बदलण्याच्या मागण्यांनी जोर धरला आहे. अशातच नावाची आणखी एक चर्चा सुरू झाली आहे. ती म्हणजे राज्यात होऊ घातलेल्या समृद्धी महामार्गाच्या नावाची. या चर्चेचे कारण म्हणजे शिवसेनेने समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची केलेली मागणी. शिवसेना नेते आणि राज्य मंत्रिमंडळाचे सदस्य एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी केली आहे. 

 
अशी केली मागणी..
शिवसेनेने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुंबई-पुणे या दोन शहरांदरम्यान द्रुतगती महामार्ग असावा हे स्वप्न बाळासाहेब ठाकरेंनी पाहिले होते. जनतेने सत्ता दिल्यानंतर तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्या मोलाच्या सहकार्याने हे स्वप्न पूर्णदेखिल झाले. त्यामुळेच देशातील पहिल्या द्रुतगती महामार्गाचे शिल्पकार म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचे नाव राज्यात होऊ घातलेल्या दुसऱ्या द्रुतगती महामार्गाला देण्याची विनंती शिष्टमंडळाने पत्राद्वारे केली आहे. 


चेक मेट केल्याची चर्चा 
अशाप्रकारची मागणी करत शिवसेनेने भाजपला चेकमेट केल्याची चर्चा आहे. त्याचे कारण म्हणजे मुंबई-नागपूर दरम्यान होऊ घातलेल्या या द्रुतगती महामार्गाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव दिले जाणार असल्याची चर्चा भाजपच्या गोटात होती. पण तशी घोषणा होण्याच्याही आधीच शिवसेनेने बाळासाहेबांचे नाव देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे भाजपने ही मागणी मान्य केली तर त्यांना वाजपेयींचे नाव या महामार्गाला देता येणार नाही. आणि मागणी फेटाळली तर निवडणुकीच्या तोंडावर बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम असल्याचा भाजप केवळ बनाव करते असा आयता मुद्दा शिवसेनेला मिळू शकतो. त्यामुळेच शिवसेनेने भाजपला चेकमेट केल्याची चर्चा आहे. 

बातम्या आणखी आहेत...