आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत सेनेच्या हाती बीडमध्ये भाजपच्या हाती भोपळा, तर चंद्रपुरात पुन्हा फुलले कमळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद/बीड : औरंगाबाद जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीने नशिबाच्या बळावर अध्यक्षपद राखले. काँग्रेसच्या मीना शेळके विजयी झाल्या. पण शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार समर्थक सहा तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक आणि भाजप समर्थक एका अपक्षाने उपाध्यक्षपदासाठी भाजपच्या पारड्यात मते टाकल्याने लहानू गायकवाड विजयी झाले. त्यामुळे शिवसेनेच्या शुभांगी काजे पराभूत झाल्या. शिवसेनेच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीला पूर्ण विजयाचे समाधान मिळाले नाही.

बीड : जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता

बीड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीने शिवसेना व काँग्रेसला सोबत घेत सत्ताधारी भाजपचे तीन सदस्य फोडून मंत्री धनंजय मुंडे यांनी बहीण माजी मंत्री पंकजा मुंडे यांना धक्का दिला. बीड जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेल्या शिवकन्या सिरसाट आणि उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेले बजरंग सोनवणे यांना प्रत्येकी ३२ मते मिळाल्याने त्यांची निवड झाली. बीड जिल्हा परिषद भाजपच्या ताब्यातून गेली.

सत्तार गद्दार, हिरवा साप : खैरे

वरिष्ठांनी आदेश दिले, त्यानुसार मोर्चबांधणी केली होती, पण सत्तार यांनी आदेश धुडकावून लावत भाजपशी हात मिळवणी केली. सत्तार गद्दार आहेत, हिरवा साप आहेत त्यांना मातोश्रीची पायरी चढू देणार नाही.

सत्तेतील आघाडीचा परिणाम : पंकजा मुंडे

राज्यातील आघाडीचा परिणाम जिल्हा परिषदेतही आहे. त्यामुळे लोकशाहीची प्रक्रिया म्हणून ही निवडणूक लढवत आहे, बाकी निकाल स्पष्टच आहे. असे टि्वट पंकजा मुंडे यांनी शनिवारी केले.

माझी निष्ठा ठाकरेंसोबत : सत्तार

अध्यक्षपद शिवसेनेला हवे असे माझे म्हणणे होते पण ते मान्य करण्यात आले नाही. मी गद्दार नाही माझी निष्ठा उद्धव ठाकरेंसोबतच आहे, जे सांगायचे ते पक्षप्रमुखांना सांगेन. माझ्या राजीनाम्याची पुडी सोडणाऱ्यांना तुम्ही बाकीचे विचारा.

सत्तारांच्या राजीनाम्याची फक्त चर्चाच

शिवसेनेच्या एका गोटाकडून आरोप, माजी मंत्र्यांकडून मनधरणी

जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचाच उमेदवार हवा, या भूमिकेला माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे यांनी विरोध केल्याने राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, अशी चर्चा शनिवारी दिवसभर होती. खैरे यांनी सत्तार गद्दार, हिरवा साप आहेत, अशी टीकाही केली.

माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर सत्तार यांच्या भेटीसाठी औरंगाबादेत आले होते. त्यांनी राजीनाम्याच्या वृत्ताचा इन्कार केला. शिवसेना सचिव अनिल देसाई यांनीही असे काहीही झाले नाही, असे स्पष्ट केले.

तरीही सेनेतील एका गोटातून सत्तार आमदारपदाचाही राजीनामा देणार असल्याचे सांगितले जात होते.

राजीनाम्याचे खंडन

मात्र, सायंकाळी सत्तार यांनीच त्याचे खंडन केले. राजीनाम्याच्या पुड्या ज्यांनी सोडल्या त्यांनाच विचारा, असा टोला त्यांनी खैरे यांचे नाव न घेता लगावला. माझी निष्ठा उद्धव ठाकरे यांच्याशीच आहे. जे काही बोलायचे, सांगायचे आहे ते त्यांनाच सांगेन, असे म्हणत ते मुंबईला रवाना झाले.

औरंगाबाद जि.प. पक्षीय बलाबल

  • भाजप २३
  • शिवसेना १७
  • काँग्रेस १६
  • राष्ट्रवादी ०३
  • रिपाई (डी) ०१
  • मनसे ०१

सत्तेचा गैरवापर केला होता : धनंजय मुंडे

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अडीच वर्षांपूर्वी भाजपने सत्तेचा गैरवापर करून आमचे सदस्य फोडले. यंदा महाविकास अाघाडीचे सरकार राज्यात आल्याने समीकरणे बदलली असून आमचे अध्यक्ष-उपाध्यक्षपदाचे उमेदवार विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत.

चंद्रपुरात पुन्हा फुलले कमळ

नागपूर : राजकीय स्वरूपाचे फारसे कुठलेही आव्हान नसलेल्या चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा सहज बाजी मारली. अध्यक्षपदी संध्या गुरनुले आणि उपाध्यक्षपदी रेखा कारेकार या महिला नेत्या निवडून आल्या आहेत.

शनिवारी पार पडलेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या संध्या गुरनुले यांनी काँग्रेसच्या वैशाली शेरकी यांचा पराभव केला, तर उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्याच रेखा कारेकार यांनी काँग्रेसचे खेमराज मरसकोल्हे यांना पराभूत केले. या दोन्ही पदांची निवडणूक भाजपने ३६ विरुद्ध २० मतांनी जिंकली. ५६ सदस्यांच्या चंद्रपूर जिल्हा परिषदेत भाजपचे ३३ सदस्य आहेत. त्यामुळे काही अन्य सदस्यांचाही पाठिंबा भाजपला मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेसकडे १९, तर राष्ट्रवादीचा एकच सदस्य आहे. तीन अन्य सदस्य आहेत. निवडणूक जिंकल्यावर भाजपने जिल्हा परिषद परिसरात जल्लोष साजरा केला.

पं. समित्यांवरही भाजपचे वर्चस्व

जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांवर भाजपचे सभापती व उपसभापती निवडून आले आहेत, तर सावली व जिवती या दोन पंचायत समित्यांमध्ये भाजपचे उपसभापती निवडून आले आहेत

औरंगाबाद जि.प. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर काँग्रेसच्या मीना शेळके.
 

बातम्या आणखी आहेत...