आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद- विधानसभा निवडणुकीनंतरचा आढावा व संघटनात्मक निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपतर्फे आयाेजित मराठवाडास्तरीय बैठक साेमवारी औरंगाबादेत झाली. ‘भविष्यातील सर्व निवडणुका आता स्वबळावरच लढायच्या आहेत, त्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कामाला लागावे’, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना केले. शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादीसाेबत युती केल्यामुळे आता त्यांचा हिंदुत्वावरील दावा निरस्त झाला आहे. आता फक्त भाजपकडेच हिंदुत्वाचा ब्रँड आहे.
शिवसेनेने हिंदुत्वाला तिलांजली दिल्याने आता भाजपची जबाबदारी वाढली असून यापुढे भाजपचे हिंदुत्व अधिकाधिक निखरणार आहे,’ असा दावाही पाटील यांनी केला.
भाजपच्या काेअर कमिटी सदस्या व माजी मंत्री पंकजा मुंडे मात्र बैठकीस गैरहजर हाेत्या. विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यापासून पंकजा या पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या गैरहजेरीची चर्चा चांगलीच रंगली हाेती. मात्र, तब्येतीच्या कारणामुळे त्या येऊ शकल्या नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
औरंगाबादेतील पक्ष कार्यालयात झालेल्या या बैठकीस भाजप प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक, विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे, प्रदेश सचिव सुजितसिंह ठाकूर, केंद्रीय पदाधिकारी व्ही. सतीश, आमदार अतुल सावे, आमदार बबनराव लाेणीकर, मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डाॅ. भागवत कराड, प्रदेश प्रवक्ते शिरीष बाेराळकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल मकरिये, भाजप केंद्रीय महिला आघाडीच्या अध्यक्षा विजया रहाटकर, भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, उपमहापाैर विजय आैताडे आदींची प्रमुख उपस्थिती हाेती.
बैठकीनंतर पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, ‘भविष्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपंचायत, जिल्हा परिषद, महापालिका, विधानसभा आणि लाेकसभा अशा सर्व निवडणुका आता भाजप स्वबळावर लढणार आहे. आैरंगाबाद महापालिकेची निवडणूक एप्रिल २०२० मध्ये असून, ही निवडणूकदेखील भाजप आपल्या ताकदीवर लढून विजय संपादन करेल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जनहिताच्या याेजनांना तिलांजली देणे चुकीचे : पाटील
राज्यातील नवीन सरकार यापूर्वीच्या याेजना बंद करत असल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी चिंता व्यक्त केली. ‘सर्वसामान्य नागरिकांच्या हिताच्या याेजनांना तिलांजली देणे याेग्य नसल्याचेही ते म्हणाले. भाजपच्या पक्षपातळीवरील निवडणुकांची तयारी सुरू आहे. बूथप्रमुखांची निवड १० ते १५ डिसेंबरदरम्यान करण्यात येणार आहे. त्यानंतर १५ ते २० डिसेंबरदरम्यान मंडळ प्रमुखांच्या नियुक्त्या केल्या जातील. माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षांची निवड केली जाईल, असेही ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.