आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाराजी नाट्यानंतर अर्जुन खोतकर म्हणाले- अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिलाच नाही!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - अब्दुल सत्तार यांनी कुठल्याही प्रकारचा राजीनामा दिलेला नाही असा दावा आमदार अर्जुन खोतकर यांनी दिला. सत्तार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर औरंगाबादेत ते पत्रकारांशी संवाद साधत होते. शिवसेनेचे सिल्लोड मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आपल्या राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला असे वृत्त समोर आले होते. आज कोणत्याही क्षणी खातेवाटप होईल असे सांगण्यात येत आहे. अशात सत्तार यांना राज्यमंत्रिपदापेक्षा मोठी जबाबदारी हवी होती. त्यामुळे, नाराज असलेले सत्तार यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. परंतु, पक्षाकडून मनधरणी केल्यानंतर त्यांनी राजीनामा देणार नाही असा निर्णय घेतला असेही सूत्रांकडून समजते. दरम्यान, नाराजीनाट्य शमल्यानंतर आता अब्दुल सत्तार रविवारी संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असेही शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले.

शिवसेनेत प्रवेश करताना दिले होते कॅबिनेट मंत्रिपदाचे आश्वासन...


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाले. त्याच दरम्यान काँग्रेसकडून आमदारकीचे तिकीट न मिळाल्याने अब्दुल सत्तार नाराज झाले. यानंतर सप्टेंबर 2019 मध्ये त्यांनी शिवबंधन बांधले होते. निवडणूक काळात सत्तार भाजपमध्ये जाणार होते. परंतु, त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यावेळी त्यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, ऐनवेळी त्यांना मंत्रिमंडळ विस्तारात राज्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली. तेव्हापासूनच ते शिवसेनेवर नाराज होते.

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडणुकीतच दिले संकेत..!


त्यातच औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत त्यांनी शुक्रवारी यासंदर्भातील संकेतही दिले होते. अध्यक्षीय निवडणुकीत त्यांनी शिवसेनेला पाडण्यासाठी भाजपशी हातमिळवणी केली असा आरोपही करण्यात आला. या गोंधळात औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीचे मतदान एका दिवसासाठी पुढे ढकलण्यात आले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी सत्तार यांनी राजीनाम्याचा इशारा दिल्याचे वृत्त समोर आले.


शिवबंधन बांधण्यापूर्वी अब्दुल सत्तार यांच्यावर शिवसेनेकडून वेळोवेळी आरोप आणि टीका करण्यात आल्या. त्यात सर्वात गंभीर आरोप 1994 मध्ये सामना या मुखपत्रातून करण्यात आले होते. सामनात एका अग्रलेखामध्ये अब्दुल सत्तार यांना अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहीमचे जवळिक असल्याचे सांगण्यात आले होते. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही सत्तार यांना अंतर्गत विरोध होता असेही सांगितले जाते. त्याच कारणास्तव अब्दुल सत्तार यांना कॅबिनेट मंत्रिपद न देता राज्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.