आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - भाजपने सत्ता स्थापन करू न शकल्यामुळे शिवसेनेवर खापर फोडू नये असे संजय राऊत म्हणाले. आम्ही सत्ता लाथाडू, विरोधी पक्षात बसू, मात्र शिवसेनेला ठरल्याप्रमाणे अडीच वर्षे मुख्यमंत्री पद देणार नाही या द्वेषाच्या आणि अहंकाराच्या भूमिकेतून महाराष्ट्रावर ही वेळ आल्याचेही ते म्हणाले. सोमवारी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
महाराष्ट्राला स्थिर आणि सुदृढ सरकार देणे ही भाजपची जबाबदारी होती. मात्र खोटेपणातून आणि अहंकारातून भाजपने महाराष्ट्राला अशा परिस्थितीत ढकलेले. यामुळे सत्ता स्थापन करता न आल्यामुळे भाजपने शिवसेनेला दोष देऊ नये असे राऊत म्हणाले.
भाजपचा मुख्यमंत्री होऊ नये, असा सूर उमटत आहे - राऊत
भाजपने देश आणि राज्यात केलेल्या कामावरून भाजपचा मुख्यमंत्री होऊ नये असा सूर उमटत आहे. दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आधीची वक्तव्ये आणि भूमिका लक्षात घेऊन योग्य मार्गाने पावले टाकणे गरजेचे आहे आणि आम्ही ते करत आहोत असे संजय राऊत म्हणाले.
राज्यपालांनी आम्हाला कमी वेळ दिला - राऊत यांचा आक्षेप
दरम्यान संजय राऊत यांनी राज्यपालांनी दिलेल्या वेळेबाबत आक्षेप केला आहे. राज्यपालांनी शिवसेनेला 24 तासांची मुदत दिली आहे. तर भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी 72 तासांचा वेळ दिला होता. बहुमतासाठी आकडा जमवण्यासाठी जास्त वेळ द्यावा लागतो. यामुळे महाराष्ट्राला राष्ट्रपती राजवटीकडे ढकलायचेच या दृष्टीकोनातून आम्हाला 24 तासांची मुदत देण्यात आली आहे.
उद्धव ठाकरेंच्या आदेशानेच अरविंद सांवतांचा राजीनामा
सोमवारी सकाळी शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत आपल्या केंद्रीय पदाचा राजीनामा देत असल्याचे ट्विटरवर ट्विट करून सांगितले. उद्धव ठाकरेंच्या आदेशाने केंद्रीय मंत्री अरविंद सावंत मंत्रिपदाचा राजीनामा दिला. केंद्रातील एका पदासाठी आम्ही अशा वातावरणात का राहू असे संजय राऊत यांनी सांगितले. यावरून शिवसेना आणि भाजपचा केंद्रात काडीमोड झाला हे जवळपास निश्चित झाले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.