आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेच्या हमीनंतर काँग्रेस सरकारमध्ये! सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांचा नांदेडात गौप्यस्फोट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘घटनेच्या चौकटीमध्येच कारभार’ची हमी

नांदेड- घटनेच्या चौकटीत राहूनच राज्यकारभार चालवला जाईल असे शिवसेनेकडून लिहून घ्या. घटनेच्या चौकटीबाहेर कारभार गेला तर सरकारमधून बाहेर पडा, अशी ताकीद सोनिया गांधींनी दिली. त्यावर उद्धव ठाकरे यांच्या सहमतीनंतरच काँग्रेस पक्ष सरकारमध्ये सहभागी झाल्याचा गौप्यस्फोट सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केला. 

रविवारी कोचिंग क्लासच्या कार्यक्रमात बोलताना अशोक चव्हाण यांनी हा गौप्यस्फोट केला. या कार्यक्रमाला अभिनेते सचिन खेडेकर व नाट्य निर्माते वामन केंद्रे उपस्थित होते. त्यांचा उल्लेख करून चव्हाण म्हणाले, आमच्या तिघांचेही क्षेत्रे सारखीच आहेत. चालले तर चालले नाही तर पडले. आता काळ बदलला. पूर्वी एका हीरोवरच चित्रपट चालायचा. आता मल्टिस्टारचा जमाना आला.


त्यामुळे सरकारही एका पक्षाचे चालत नाही. मी यापूर्वी दोन पक्षांचे सरकार चालवले आहे. परंतु आता तीन पक्षांचे सरकार आहे. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना, तीन पक्ष, तीन विचार हे सरकार चालणार नाही, अशी भीती होती. तेव्हा त्यांनी घटनेच्या चौकटीत राहून हे सरकार कारभार करणार असेल तरच सरकारमध्ये राहा. तसे त्यांच्याकडून लिहून घ्या, अन्यथा सरकारकडून बाहेर पडा, असे सांगितले. मग तसे उद्धव ठाकरे यांना सांगितले. ते म्हणाले, ठीक आहे. घटनेच्या चौकटीतच कारभार केला जाईल, ठाकरे यांनी तसे सांगितल्यानंतरच काँग्रेस या सरकारमध्ये सहभागी झाली.

छगन भुजबळांचा दुजोरा 


महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी बराच काळ चर्चा सुरू होती. दिल्लीतही बैठका झाल्या. लोकशाही मार्गाने सरकार चालले पाहिजे अशी अपेक्षा काँग्रेस नेत्या सोनिया गांधींची होती. घटनेनुसारच सरकार चालेल हे शिवसेनेने मान्यही केल्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक येथे सांगितले.

चव्हाण नेमके काय म्हणाले ते माहीत नाही : बाळासाहेब थोरात 

अशोक चव्हाण नक्की काय बोलले ते मला ठाऊक नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष  बाळासाहेब थोरात यांनी मुंबईत दिली. आमचा मल्टिस्टारर सिनेमा असून आम्ही पाच वर्षे एकत्रित काम करणार आहोत, असेही थोरात यांनी स्पष्ट केले. 

‘लिहून घेणं’चा शब्दश: अर्थ घेणे चालणार नाही : रोहित पवार 
 
‘लिहून घेणं’ याचा शब्दश: अर्थ घेऊन चालणार नाही तर, आपण सर्व विचारांनीच एकत्र आलो आहोत.  महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे टिकेल, असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला. 

बातम्या आणखी आहेत...