आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Shivsena Would Demand Home And Finance Ministry, Assembly News And Updates

तयारी नव्या सरकारची; उपमुख्यमंत्रिपदासह गृह आणि अर्थ खात्यांवर शिवसेनेकडून दावा

10 महिन्यांपूर्वीलेखक: चंद्रकांत शिंदे
 • कॉपी लिंक

मुंबई- ‘अबकी बार २२० पार’ हा निर्धार पूर्ण करू न शकल्याने बॅकफूटवर गेलेल्या भाजपला सत्तास्थापनेसाठी मदत करताना शिवसेनेकडून दबावतंत्राचा वापर केला जात आहे. २०१४ मध्ये भाजपने दुय्यम वागणूक दिल्याची खंत शिवसेनेला आहे. ती कसर भरून काढण्यासाठी शिवसेनेने आता लोकसभेच्या वेळीच ठरलेल्या ‘फिफ्टी फिफ्टी’च्या फॉर्म्युल्याची आठवण भाजपला करून दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, १९९५ मध्ये राज्यात युती सरकार असताना धाकटा भाऊ असलेल्या भाजपला तेव्हा जी महत्त्वाची खाती दिली होती, तीच खाती आता ‘धाकट्या’च्या रूपात असलेल्या शिवसेनेला हवी आहेत.  
 
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘फिफ्टी फिफ्टी’च्या फॉर्म्युल्यावर भाष्य करणे अनेकदा टाळले होते. मात्र, गुरुवारी निकाल जाहीर होताच पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरेंनी भाजपला लोकसभेच्या वेळीच ठरलेल्या फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युल्याची आठवण करून देत आता राज्यात त्यानुसारच सत्तेचे वाटप केले जाईल, असे सांगितले होते. तसेच प्रत्येक वेळी मी त्यांची अडचण समजून घेणार नसल्याचे सांगत या वेळी कुठलीही तडजोड न करण्याचा अप्रत्यक्ष इशाराच दिला होता. म्हणजेच नव्या सरकारमध्ये शिवसेनेचे महत्त्व जास्त असेल, असे ठाकरेंनी अधोरेखित केले आहे.
 
शिवसेनेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या वेळीच भाजपचे अध्यक्ष अमित शहा व उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या चर्चेत विधानसभेला १९९५ च्या सूत्रानुसार सत्तावाटप होईल, असे ठरल्याचे सांगितले जाते. तो शब्द आता भाजपने पाळावा, अशी आग्रही मागणी शिवसेनेतून होत आहे. याबाबत शिवसेना किंवा भाजपचे नेते अधिकृत बोलत नाहीत.
 

असे होते १९९५ चे सूत्र
 

 • १९९५ च्या निवडणुकीत शिवसेनेने ७३ तर भाजपने ६५ जागा जिंकल्या होत्या
 • मोठा पक्ष ठरलेल्या शिवसेनेला मुख्यमंत्रिपद तर भाजपला उपमुख्यमंत्रिपद
 • दोन्ही पक्षांचे १४ - १४ कॅबिनेट मंत्री होते.
 • गोपीनाथ मुंडेंना (भाजप) उपमुख्यमंत्रिपदासह गृहमंत्रिपदही
 • अर्थमंत्रिपदही भाजपच्या हशू अडवाणींकडे
 • सार्वजनिक बांधकाम खाते नितीन गडकरींकडे
 • कामगार मंत्रिपद हरिभाऊ बागडेंकडे
 • जलसंपदा खाते महादेव शिवणकरांकडे
 • अन्न व नागरी वस्तू पुरवठा खाते शोभाताई फडणवीसांना

  अशी महत्त्वाची खाती १९९५ मध्ये भाजपकडे होती. २०१४ मध्ये मात्र फडणवीस यांनी शिवसेनेला ना उपमुख्यमंत्रिपद दिले ना गृहमंत्रिपद. जलसंपदा, बांधकाम, अर्थमंत्री खातीही भाजपकडेच होती. सेनेला पर्यावरण, परिवहन यासारखी दुय्यम खाती दिली.  

उपमुख्यमंत्रिपद शिवसेनेनेच घेतले नाही : भाजप
 
भाजपमधील एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले, ‘युती करताना जे ठरले आहे त्यानुसारच सत्तेचे वाटप होईल. उपमुख्यमंत्रिपद शिवसेनेला यापूर्वीही देण्यास आम्ही तयार होतो, परंतु त्यांनी घेतले नाही. आता जर युतीच्या फॉर्मुल्यात तसे ठरले असेल तर त्यांना उपमुख्यमंत्रिपदही दिले जाईल.’
 

‘आदित्य ठाकरे मुख्यमंत्री’ वरळीत लागले फलक
 
शिवसेनेच्या सूत्रांनी सांगितले, ‘सत्तेचे समान वाटप म्हणजे अडीच वर्षे भाजपचा मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे उपमुख्यमंत्री आणि पुढचे अडीच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि भाजपचा उपमुख्यमंत्री असू शकेल.’ दरम्यान, वरळीत आदित्य ठाकरे यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ असे लिहून अभिनंदनाचे फलक लागले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार का, याविषयी चर्चेला पेव फुटले आहे.
 

सत्तेसाठी शिवसेनेशी युती नाहीच : शरद पवार 
 
‘जनतेने आम्हाला विरोधात बसण्याची संधी देऊन सन्मानाची जागा दिली. त्यामुळे राष्ट्रवादी व काँग्रेस हे पक्ष शिवसेनेशी युती करून सत्तेपर्यंत जाण्याचा विचार करणार नाहीत. लोकांचे प्रश्न, सरकारचे धोरण या प्रश्नांवर जनमत केंद्रित करण्यावर आता आमचा भर असेल,’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.