आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेने शोकप्रस्तावात राममंदिराचा आळवला राग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अयोध्येतील राममंदिराच्या मुद्द्यावर आक्रमक झालेल्या शिवसेनेने सोमवारी विधान परिषदेत या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यावरील शोकप्रस्तावाच्या प्रस्तावावर बोलताना परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी चार वर्षांत सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा हे सरकार उभारू शकते, पण राममंदिर उभारू शकत नाही, हे दुर्दैव आहे, असे म्हणत भाजपवर निशाणा साधला.   


यानिमित्त सभागृहाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी मांडलेल्या शोकप्रस्तावावर रावते बोलत होते. बाबरी मशीद पाडली. त्यानंतर तेथे राममंदिर उभारले जाईल, अशी सर्वांचीच अपेक्षा होती. आज राममंदिराचे स्वप्न पाहणारे चार वर्षे झाली तरी मंदिर उभारू शकले नाहीत. पूर्ण बहुमतातले सरकार आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक उभारले जाऊ शकते. सर्वात उंच पुतळा उभारला जाऊ शकतो. राममंदिरही उभारले गेले असते तर वाजपेयी यांना त्याचे दर्शन घेता आले असते, असे ते म्हणाले.   


हुकूमशाहीची भीती दाटून आली असताना “अटल’सूर्याच्या तेजाची ओळख समाजाला करून देण्यासाठी माझ्यासारख्या असंख्य काजव्यांची आज गरज आहे, अशा शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली.   


काँग्रेसचे राजूरकर तालिका सभापती   
राष्ट्रवादीचे जगन्नाथ शिंदे, शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे, काँग्रेसचे अमर राजूरकर, शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, भाजपचे प्रवीण दरेकर यांची तालिका सभापती म्हणून सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी नावे घोषित केली. दरम्यान,    सभागृह नेते चंद्रकांत पाटील, विरोधी डॉ. नीलम गोऱ्हे यांची शोकप्रस्तावावर भाषणे झाली.

 

कॉ. गायकवाडांनाबद्दल दिलगिरी व्यक्त   
राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि माजी राष्ट्रपती यांचा फक्त शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा नियम आहे. इतरांचा अपवाद म्हणून करायचा झाल्यास मुख्यमंत्री यांची परवानगी हवी. काॅ. माधवराव गायकवाड यांच्या अंत्यसंस्काराला मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली होती. मात्र, त्यांच्या नातेवाइकांनी त्यापूर्वी अंत्यसंस्कार केले, असे सांगून गायकवाड यांच्या शासकीय अंत्यसंस्काराला विलंब झाल्याप्रकरणी सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...