‘शिवशाही’ला घरघर, राज्यभरातील वीस मार्गांवरील स्लीपर बसेस होणार बंद

दिव्य मराठी

Apr 12,2019 10:25:00 AM IST

नाशिक - एसटी महामंडळाकडून लांब पल्ल्याच्या मार्गांवर गाजावाजा करत खासगी ठेकेदारांच्या माध्यमातून स्लीपर शिवशाही बसेस सुरू करण्यात आलेल्या होत्या. मात्र, या स्लीपर शिवशाही बसेस अार्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने त्या चालवण्यास ठेकेदारांकडून नकार दिला जात आहे. त्यामुळे आता राज्यातील २० मार्गांवरील स्लीपर शिवशाही बसेस बंद करण्यात येणार आहेत.


राज्य परिवहन महामंडळ गेल्या काही वर्षांपासून तोट्याच्या फेऱ्यात अडकले आहे. याच पार्श्वभूमीवर प्रवासी तसेच उत्पन्न वाढवण्यासाठी महामंडळाकडून मोठा गाजावाजा करत शिवशाही बसेस सुरू करण्यात आल्या. याचबरोबर लांब पल्ल्याच्या मार्गावरही प्रवाशांनी एसटीला पसंती मिळावी यासाठी महामंडळाकडून अत्याधुनिक सोई-सुविधांसह वातानुकूलित शिवशाही बसेस सुरू करण्यात आल्या. यातील बहुतांश बसेस खासगी ठेकेदारांच्या माध्यमातून चालवण्यात येत होत्या. अशी परिस्थिती असताना खासगी बसेसच्या तुलनेत या स्लीपर शिवशाहीचे भाडे जादा असल्याने प्रवाशांकडून त्यांच्याकडे पाठ फिरवली जात आहे. तसेच या बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुरवण्यात येणारे ब्लँकेट, मोबाइल चार्जिंग सिस्टिम, वातानुकूलित यंत्रणा सुरू ठेवणे, पाण्याची बॉटल आदी सोई-सुविधांमुळे या ठेकेदारांनाही स्लीपर शिवशाही आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने त्यांची नाराजी आहे. त्यांनी बसेस चालवण्यास नकार दिला असून याबाबतचे पत्रही महामंडळाला दिले आहे.

राज्यातील अन्य फायदेशीर मार्गांवर सुरू करणार असल्याचा दावा
या बंद करण्यात आलेल्या स्लीपर शिवशाही इतर फायदेशीर मार्गांवर सुरू करण्यात येणार असल्याचा दावा एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. मात्र याबाबत अद्याप कोणत्याही ठोस निर्णय झालेला नाही.

खासगीऐवजी एसटीच चालवणार?
नाशिक विभागात ४१ बसेस खासगी ठेकेदारांच्या माध्यमातून चालवण्यात येतात. मात्र याही बसेस एसटी महामंडळाद्वारेच चालवण्याबाबतही हालचाली सुरू असल्याची माहिती एसटीच्या कर्मचाऱ्यांनी दिली.

X