स्लीपर शिवशाहीचे तिकीट / स्लीपर शिवशाहीचे तिकीट होणार स्वस्त; एसटी प्रशासनानाचा निर्णय

प्रतिनिधी

Jan 05,2019 07:47:00 AM IST

नाशिक- खासगी वाहतूकदारांसोबत स्पर्धा करताना लांब पल्ल्याच्या मार्गावर एसटी महामंडळाच्या वतीने स्लीपर शिवशाही बससेवा सुरू करण्यात आली. मात्र, त्याचे भाडेदर जास्त असल्याने प्रवाशांचा प्रतिसाद घटला होता. मात्र, आता प्रवासी संख्या वाढवण्याच्या दृष्टीने स्लीपर शिवशाहीचे भाडेदर कमी करण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला आहे. याबाबत लवकरच आदेेश काढण्यात येणार असल्याची माहिती एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

प्रवासी संख्या तसेच उत्पन्न वाढवण्यासाठी एसटी महामंडळाकडून विविध उपक्रम, योजना राबवल्या जात आहेत. खासगी प्रवासी वाहतूकदारांसोबत स्पर्धा असल्याने एसटीने अत्याधुनिक सोयीसुविधा असलेली शिवशाही बससेवा सुरू केली. या बससेवेला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे लांब पल्ल्याच्या मार्गावरही मोठा गाजावाजा करत संपूर्ण वातानुकूलित स्लीपर शिवशाही बससेवा सुरू करण्यात आली. परंतु, खासगी वाहतूकदारांच्या तुलनेत या बससेवेकडे प्रवाशांनी पाठ फिरवली होती. दिवसेंदिवस प्रवासी संख्या घटत असल्याने स्लीपर शिवशाही एसटी महामंडळासाठी पांढरा हत्तीच ठरत होता. स्लीपर शिवशाहीकडे प्रवासी वळावे यासाठी स्लीपर शिवशाहीचा भाडेदर कमी करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत.

X
COMMENT