आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुधारित आराखडा प्रमाणित नसताना शिवस्मारकाच्या कामाला होणार उद्यापासून प्रारंभ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबईच्या अरबी समुद्रात बांधायच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा सुधारित आराखडा तपासून न घेता व प्रमाणित न करताच स्मारकाच्या कामास बुधवारी (ता. २४ ) प्रारंभ होत आहे. त्यामुळे आतंरराष्ट्रीय दर्जाच्या या प्रकल्पाची सुरक्षितता आणि आयुष्यमानासंबंधी अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच प्रकल्प घाईगडबडीत रेटला जात असल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम खात्याकडूनही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. 


प्रकल्पाची मूळ किंमत ३ हजार ८२६ कोटी इतकी होती. ती २ हजार ५०० कोटींवर आणण्यात आली. त्यासाठी मूळ आराखड्यात अनेक बदल केले. त्या बदलांसंदर्भात ५ फेब्रुवारी २०१८ रोजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार कंपनीकडून (इजिज इंडिया) सादरीकरण करण्यात आले होते. 


त्या वेळी मुख्य सचिवांनी या सुधारित आराखड्यास निविदेतील तरतुदी, अटी व शर्ती यांचे उल्लंघन होणार नाही याची कटाक्षाने काळजी घेण्यात यावी तसेच प्रकल्पाची सुरक्षितता, आयुष्यमान आणि टिकाऊपणा याच्या संदर्भात कोणतीही तडजोड करण्यात येऊ नये. त्यासाठी सुधारित आराखडा इजिज इंडियाची मूळ कंपनी इजिज फ्रांन्स यांच्याकडून तपासून घेण्यात यावा. तसेच मुंबई आयआयटी यांच्याकडून प्रमाणित करून घ्यावा, अशा सूचना दिल्या होत्या. 


सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली चिंता 
२४ आॅक्टोबरपासून प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामास एल अँड टी कंपनी प्रारंभ करणार आहे. मात्र, अद्याप प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार कंपनीने (इजिज इंडिया) स्मारकाचा सुधारित आराखडा प्रमाणित करून घेतला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आश्चर्य म्हणजे सुधारित आराखड्यास सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव अध्यक्ष असलेल्या तांत्रिक समितीकडून मान्यता घेतलेली नाही. त्यानंतर आराखडा प्रमाणित नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या गोंधळामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. 


सुरुवातीपासून वाद 
२०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी स्मारकाचे जलपूजन केले. तेव्हापासून हा प्रकल्प वादात आहे. पर्यावरणवाद्यांचा प्रकल्पाला विरोध आहे. स्मारकाची उंची कमी केली, असा विरोधकांचा अारोप आहे. तांत्रिक समितीची मान्यता नाही. त्यात आता सुधारित आराखडा प्रमाणित नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे सरकार छत्रपतींच्या स्मारकाविषयी गंभीर नाही, असा आरोप होत आहे. 

बातम्या आणखी आहेत...