आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वंचित बहुजन आघाडीच्या जाहीरनाम्यात धक्कादायक आश्वासन, उच्च शिक्षणात ‘रोहित वेमुला’ कायदा बनवणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ज्या कुटुंबांनी तीन पिढ्या आरक्षणाचा लाभ घेतला आहे, अशा सर्वजातीय कुटुंबांचा अधोक्रम निश्चित करण्याचा कायदा बनवण्यात येईल, असे धक्कादायक वचन वंचित बहुजन आघाडीने आपल्या जाहीरनाम्यात दिले आहे. तसेच लिंगायत धर्माला मान्यता, उच्च शिक्षणात रोहित वेमुला कायदा, महिलांना कायदेमंडळात ५०% आरक्षण अशी आश्वासने ‘व्हीबीए’ने पुण्यात प्रकाशित केलेल्या जाहीरनाम्यात दिली आहेत. वंचित बहुजन आघाडीमुळे राज्यातील निवडणूक तिरंगी झाल्याचे चित्र आहे.

 

ओबीसी, एनटी, व्हीजेएनटी अशा जातींचे पूर्वसूचीकरण करून त्यांना अनुसूचित जमातीच्या (एसटी) आरक्षणाचा लाभ देण्यात येईल. शेतकरी जात समूहांना (मराठा, जाट, पटेल) आरक्षण देण्याचे राष्ट्रीय धोरण आखण्यात येईल, ओबीसी आरक्षणात उच्चवर्गीय जातींची घुसखोरी रोखली जाईल तसेच मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी आश्वासने या जाहीरनाम्यात आहेत.

 

वंचित बहुजन आघाडीच्या जाहीरनाम्यात म्हटले आहे की, पाच वर्षे पालावर राहिलेल्या भटक्यांना पक्के घर, मुस्लिमांना लोकसंख्येच्या प्रमाणात विकास निधी, न्यायपालिका, खासगी क्षेत्र आणि संरक्षण दलातही आरक्षण, राखीव प्रवर्गातील पदे तातडीने भरली जातील. तसेच हाताने मैला उचलण्याची प्रथा बंद करणार तसेच अॅट्राॅसिटी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याचे वचन या जाहीरनाम्यात दिले आहे.
याशिवाय २००५ पूर्वीची निवृत्तिवेतन योजना सुरू करणार, ज्यांना मनुवादी व्यवस्थेने मालमत्तेचा अधिकार नाकारला त्यांच्यासाठी स्वतंत्र बँकिंग व्यवस्था, कंत्राटी नोकरांना कायम करणार, पडीक जमिनीचे वाटप 
आणि अनुसूचित जाती-जमाती योजनेच्या निधीच्या नियंत्रणासाठी स्वतंत्र कायदा करण्याचे वचनही वंचित बहुजन आघाडीने अापल्या जाहीरनाम्यात दिले आहे.

 

मात्र संघाचा उल्लेख नाही 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राज्यघटनेच्या चौकटीत आणण्याची काँग्रेसकडे योजना नसल्याचा आरोप करत अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आघाडीस नकार दिला होता. त्याच आंबेडकर यांनी आपल्या जाहीरनाम्यात मात्र संघाला घटनात्मक चौकटीत आणण्याचे साधे सूतोवाचही केलेले नाही.

 

५ कोटी रुपयांचे कर्ज
खात्यात १५ लाखांच्या घोषणेने भाजप बदनाम झाला आहे. काँग्रेसच्या ७२ हजारांच्या ‘न्याय’ योजनेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.  या पार्श्वभूमीवर ‘व्हीबीए’ने ५ कोटींच्या विनातारण कर्जाचे आश्वासन आपल्या वचननाम्यात दिले आहे.

 

वंचित कोण?
धनगर, भटके, विमुक्त यांच्या पुढाकाराने दलित, बौद्ध यांच्या सहभागाने आणि मुस्लिमांच्या समर्थनाने वंचित बहुजन आघाडी २०१९ मध्ये अस्तित्वात आल्याचे जाहीरनाम्यात स्पष्ट केले आहे.
 

बनवला कोणी ?
प्रा. धम्मसंगिनी रमा गोरख, सचिन माळी, शांताराम पंदेरे, लक्ष्मण माने, अॅड. प्रियदर्शी तेलंग, रेखा ठाकुर, किसन चव्हाण, आदींनी हा जाहीरनामा बनवला.

बातम्या आणखी आहेत...