आत्महत्या / मुख्यमंत्र्यांच्या सभेआधी धक्कादायक घटना, भाजपचे 'पुन्हा आणुया आपले सरकार' टी-शर्ट घालून शेतकऱ्याची आत्महत्या

काल एका शेतकऱ्याने आपले जीवन संपवले

दिव्य मराठी वेब टीम

Oct 13,2019 04:17:00 PM IST

बुलडाणा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यावेळीच एका शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आत्महत्येवेळी शेतकऱ्याने "पुन्हा आणूया आपले सरकार" असे लिहलेले भाजपचे टी-शर्ट घातले आहे. राज्यभरात प्रचाराची रणधुमाळी सुरु असतानाच मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळीच शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचलल्यामुळे खळबळ उडाली आहे. 35 वर्षीय राजू ज्ञानदेव तलवारे यांनी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. कर्जबाजारीपणामुळे तलवारे यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे.
दरम्यान, ही आत्महत्या जिथं झाली त्याच मतदार संघामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होईल.

जामोद इथून कामगार मंत्री डॉ संजय कुटे आमदार आहेत. शेगाव तालुक्यातील खातखेड इथे रविवारी सकाळी 11 वाजता हा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे त्यानंतर अवघ्या काही तासांतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा मतदारसंघात आयोजित करण्यात आली होती याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजू ज्ञानदेव तलवारे यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा आहे.

काल एका शेतकऱ्याची आत्महत्या

शनिवारी संध्याकाळी येवल्यातही एका तरुण शेतकऱ्याने कर्जबारीपणामुळे आत्महत्या केल्याची माहिती आहे. संतोष हरोडे याच्याकडे चार एकर शेती होती. शेतीसाठी त्याने साडेतीन लाख रुपये कर्ज काढलं होते. पण, कर्ज कसे फेडावे आणि मुलांचे पालनपोषण कसे करावे या चिंतेतून त्याने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. हरोडेच्या आत्महत्येमुळे त्याच्या दोन चिमुकल्यांचे पितृछत्र हरपलं.

X
COMMENT