आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोळाव्या वर्षी प्रेयसी बनली दोन मुलांची आई; वाऱ्यावर सोडून प्रियकर फरार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- प्रेम आंधळं असतं अाणि यामध्ये आयुष्याची कशी राखरांगोळी होते याची प्रचिती देणाऱ्या एक धक्कादायक प्रेमप्रकरणाचा छडा पाेलिसांनी लावला. चौदाव्या वर्षी प्रेमात पडलेल्या मुलीला लग्नाचे आमिष देत प्रियकराने तिचे अपहरण केले. तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत दोन अपत्यांना जन्म देत तिला वाऱ्यावर सोडून देत प्रियकर फरार झाला. मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने या मुलीला पुण्यात ताब्यात घेतले. शनिवारी (दि. १) तिने एका मुलाला जन्म दिला. प्रियकराच्या कुटुंबीयांचा शोध घेत पीडित मुलीसह तिच्या मुलांचा सांभाळ करण्यास सांगून पाेलिसांनी या मुलीसह तिच्या दाेन अपत्यांना अाधार मिळवून दिला. 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबड चुंचाळे शिवारातून दोन वर्षांपूर्वी एका चौदा वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल झाला होता. ऑपरेशन मुस्कान अंतर्गत बेपत्ता मुलांचा शोध सुरू असताना पीडित मुलीला तिच्या शेजारी राहणाऱ्या आणि नातेसंबंधातील २४ वर्षीय तरुणाने लग्नाचे आमिष देत फूस लावून पळवून नेल्याची माहिती मिळाली. पीडित मुलीचे फोटो राज्यातील सर्व पोलिस आयुक्तालय आणि अधीक्षक कार्यालयांना पाठवण्यात अाले हाेते. पीडित मुलगी बिहारची असल्याने तिचा शोध घेण्यास पोलिसांना अडचण येत होती. काही दिवसांपूर्वी पीडित मुलीने तिच्या भावाशी संपर्क साधल्याची माहिती मिळाली. मध्यवर्ती गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक सचिन सावंत यांनी तंत्रविश्लेषण शाखा व अन्य एका गुप्त माहितीच्या आधारे या मुलीचा शोध घेतला असता तिच्या चेहऱ्याशी मिळतीजुळती एक मुलगी पुण्यात असल्याची माहिती मिळाली. तत्काळ पथक पुण्याला रवाना झाले.

 

पुण्यात दोन दिवस या मुलीचा शोध घेतला असता ती रस्त्यावर फिरताना आढळून आली. तिच्या कडेवर सव्वा वर्षाची मुलगी होती. तिला विश्वासात घेत माहिती घेतली असता, 'महिन्यापासून प्रियकर सोडून पळून गेला. रस्त्यावर फिरून दिवस काढत अाहे', अशी माहिती तिने पथकाला दिली. ती गरोदर असल्याने तिची प्रथम पुण्याच्या जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यात अाली. नाशिकला तिला तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात अाले. शनिवारी तिने मुलाला जन्म दिला. मुलगी आणि आता तिचे दोन अपत्य यांचा सांभाळ कसा करायचा या चिंतेत पीडितेचे कुटुंब हाेते. सहायक निरीक्षक सावंत यांनी संशयित प्रियकराच्या कुटुंबियांशी संपर्क साधला. सुरुवातीला त्यांनी मुलाबाबत उडवाउडवीचे उत्तर दिले. पोलिसांनी अापल्या खाक्या दाखवत चांगली समज दिल्यानंतर मुलीसह तिच्या दोन अपत्यांचा त्यांनी स्वीकार केला. पोलिसांनी या घटनेत अपहरण झालेल्या मुलीचा केवळ शोधच लावला नाही तर तिला हक्काचा निवाराही उपलब्ध करून दिला. 

 

तिला आधार मिळाला 

अपहरण झालेल्या मुलीवर कोवळ्या वयात आघात झाले. तिचा शोध लावल्याचा आनंद होताच पण ती स्वत:लाही सांभाळू शकत नव्हती. अशातच तिने दोन अपत्यांना जन्म दिला. प्रियकर तिला सोडून पळून गेल्याने ती रस्त्यावर आली होती. प्रियकराच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन तिला तिचा हक्क मिळवून दिला, याचे मााेठे समाधान आहे. - सचिन सावंत, सहायक निरीक्षक, मध्यवर्ती गुन्हे शाखा. 

बातम्या आणखी आहेत...