आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिहारच्या आरा तुरुंगात डॉक्टर म्हणून 9 महिने वावरला तोतया

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरा- बिहारमधील आरा शहरात बनवेगिरीने इतका कळस गाठला आहे की, एक तोतया बनावट डॉक्टर म्हणून चक्क तुरुंगातच कैद्यांवर उपचार करत आहे. त्याने तुरुंग व्यवस्थेचे धिंडवडे काढले. मसोढी येथील डॉक्टर धीरजकुमार धीरू यांच्या नियुक्त जागेवर तो आरा मंडळ कारागृहात गेल्या ९ महिन्यांपासून बनावट डॉक्टर बनून कैद्यांवर उपचार करत होता. त्याने तीन महिन्यांची सुटीही मंजूर करून घेतली होती. दुसऱ्यांदा आला व रुजूही झाला. परंतु तुरुंग प्रशासनास त्याचा संशय आला नाही. त्याच्याबद्दल संशय आला तोपर्यंत तो तुरुंगातून गायबही झाला होता. विशेष म्हणजे तो तुरुंगाच्या शासकीय निवासस्थानात मजेत राहत होता. गेल्या एक महिन्यापासून चौकशी झाली. त्याला अटक करण्याची तयारीही झाली, पण ई-मेलवरून राजीनामा पाठवून तो फरार झाला होता. 

 

मसोढीच्या डॉक्टरांच्या नावावर तोतया काम करत होता : 
पाटणा जिल्ह्यातील मसोढी येथे डॉक्टर धीरजकुमार धीरू राहतात. ते मसोढीमध्येच रुग्णांवर उपचार करत आहेत. त्यांची पोस्टिंग पाटणा कारागृह प्रशासनाने मंडळ कारागृह आरा येथे केली होती. सुमारे ९ महिन्यांपूर्वी मसोढीच्या डॉक्टरचे नाव धारण करून एक व्यक्ती आली. तिने तुरुंग प्रशासनासमक्ष धीरजकुमार धीरू या नावाने पदभार स्वीकारला. त्याच्या वर्तणुकीवर संशय बळावल्याने तुरुंग प्रशासनाने गोपनीय चौकशी सुरू केली. तेव्हा अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या. 

 

सुरक्षेत गलथानपणा : तुरुंग प्रशासनाचे अपयश, माहिती बाहेर जाण्याची चिन्हे , आता प्रश्न उरले 
-९ महिन्यांपासून कसे केले काम? 
-रुजू होताना प्रशासनाने सत्यापन का केले नाही? 
-हे तुरुंग प्रशासनाचे अपयश नव्हे काय? 
-डॉ. धीरज तेथे का आले नाहीत? 
-बनावट डॉक्टरच्या अटकेची बातमी फुटली होती का? 
-कुख्यात कैद्यापर्यंत पोहोचणे शक्य, असे समजावे काय? 

 

ई-मेलचीही चौकशी 
ज्या ई-मेलवरून बनावट डॉक्टराने मंडळ कारागृह प्रशासनास माहिती पाठवली, पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी जाळे पसरवले होते. त्याने ई-मेलने राजीनामा पाठवला तेव्हाच त्याची बनवेगिरी उघड झाली होती. 

 

अधीक्षक म्हणाले, एफआयआर नोंदवून कारवाई करू 
तुरुंगातील अधीक्षक निरंजन पंडित म्हणाले, मंडळ कारागृह, आरा येथील एक डॉक्टर बनावट निघाला. धीरजकुमार धीरू नावाची कागदपत्रे सादर करून तोतया डॉक्टर काम करत होता. त्याच्याबाबतीत अनेक धक्कादायक माहिती हाती आली आहे. लवकरच त्याला अटक केली आहे. त्याच्यावर एफआयआर दाखल केला जाईल.