आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पत्नीसह बाळाच्या मृत्यूप्रकरणी पतीची माजलगाव पोलिस ठाण्यात तक्रार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव- प्रसूतीदरम्यान पत्नी मीरा एखंडे व नवजात बाळाच्या मृत्यूला माजलगाव ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व परिचारिका जबाबदार असल्याचा आरोप करून मृत महिलेच्या पतीने माजलगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी डॉक्टर आणि परिचारिकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची विनंती पतीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत केली आहे. 

पत्नीला तीन तासानंतर प्रसूतीसाठी टेबलवर ठेवल्यानंतर दोन परिचारिका हजर असणे, बाळाचे वजन अंदाजे चार किलो असतानाही रक्तस्रावाची काळजी घेतली नाही. प्रसूतीच्यावेळी कॉट्री मशीन आणले नाही. स्त्रीरोग तज्ञास बोलावले नाही किंवा सिझरिंगही केले नाही. रात्रीच्या वेळी पत्नीला बीड येथे पुढील दाखल करायचे आहे असे ऐनवेळी सांगून डॉक्टरांनी दोन कोऱ्या कागदावर सह्या घेऊन १० मिनिटानंतरच मला तुमची पत्नी व बाळ दोघेही मृत झाले असल्याचे सांगितले. रात्री साडेबारा वाजता उत्तरीय तपासणीसाठी घेऊन गेल्यानंतर पत्नीच्या व बाळाच्या मृत्यूस डॉक्टर व नर्स हे जबाबदार असल्याचे मृत मीरा एखंडेचा पती रामेश्वर एखंडे यांनी तक्रारीत म्हटले आहे. 

 

रामेश्वर भगवान एखंडे ( वय ४२ वर्षे रा.जिजामाता नगर, मावलगाव) यांच्या तक्रारीनुसार त्यांना सात मुली असून पत्नी मीरा गरोदर असल्याने तिच्या माजलगाव ग्रामीण रुग्णालयात तपासण्या केल्या होत्या. ९ डिसेंबर २०१८ रोजी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या अहवाला नुसार शहरातील डॉ.रेखा मुगदिया यांच्या आनंद हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी केली होती. तेव्हा गर्भातील बाळ व आई चांगले असल्याचा अहवाल हाती आला होता. दिवस भरल्यानंतर २८ डिसेंबर २०१८ रोजी दुपारी दीड वाजता त्यांनी पत्नीस येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तेव्हा एकही डॉक्टर हजर नव्हता. 

 

परिचारिकेने थातूर-मातूर तपासणी करून त्यांना थांबण्यास सांगून सामान्य वार्डात दाखल करून घेतल्यानंतर प्रसूती कळा वाढल्या. तेव्हा पती रामेश्वर यांनी नर्सला लक्ष देण्यास सांगितले. तेव्हा ड्युटीवरील नर्सने थोडे थांबा खूप गडबड आहे का? पेशंटला कळा येतच असतात,असे म्हणत ८-८ लेकरं कशाला होऊ देता, असे टोमणे मारले. मीराला दुपारी चार वाजता प्रसूती रूममध्ये दाखल करण्यात आले. तेव्हा पत्नीची प्रकृती चांगली होती. तेथे डॉक्टर अथवा स्त्रीरोग तज्ज्ञ उपस्थित नव्हते. 

 

केवळ दोन परिचारिका हजर होत्या. प्रसूती रूममध्ये गेल्यानंतर तिचा पोटातील बाळ सशक्त असल्याने त्याचे वजन अंदाजे चार किलो होते. त्यामुळे प्रसूतीच्या वेळी बालरोग तज्ञास बोलावणे गरजेचे होते. बाळाच्या जास्तीच्या वजनामुळे रक्तस्राव होईल हे गृहीत असताना कॉट्री मशीनची गरज असताना ते उपलब्ध ठेवले गेले नाही. 

 

पत्नीला प्रसूती रुममध्ये घेऊन जाईपर्यंतही तिचा रक्तगट, हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली नव्हती. उपचाराच्या वेळी रक्तस्राव सुरू असताना तिचे प्राण वाचवण्यासाठी रक्त देणे गरजेचे होते. परंतु दिले नाही. उलट रक्त दिल्याचे सांगितले, असा आरोपही रामेश्वर एखंडे यांनी माजलगाव शहर पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केला आहे. पत्नीचा रक्तगट माहिती नसतानाही रक्त दिल्याचे त्यांनी खोटे सांगितले. 

 

रुग्णालय प्रशासनाने कुठलीच माहिती दिली नाही 
तक्रारीत म्हटले की, प्रसूतीदरम्यान बाळ अर्धवट बाहेर आल्यानंतर स्त्रीरोग तज्ञास बोलावले. पण तो पर्यंत बाळाचा मृत्यू झाला होता. प्रसूतीदरम्यान बाळाचे वजन जास्त असल्याने नैसर्गिक प्रसूती होणार नाही, आईच्या व बाळाच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो याची कल्पना असतानाही डॉक्टर व नर्स यांनी निष्काळजी दाखवली. मीराचे सिझरिंग करण्यात आले नाही. बाळाच्या कमी-अधिक ठोक्याची माहिती त्याच बरोबर त्याच्या जिवाच्या धोक्याची माहिती दिली नाही. वेळ पडली तर पत्नीला मोठ्या हॉस्पिटलला घेऊन जाण्याची गरज आहे की नाही याची माहितीही मला किंवा नातेवाइकांना दिलीच नाही, असा आरोपही रामेश्वर एखंडे यांनी तक्रारीत केला आहे. 

 

कोऱ्या कागदावर सह्या 
रात्री ८.३० वाजता पुढील उपचारासाठी पत्नीला बीड येथे दाखल करायचे आहे असे सांगून डॉक्टरांनी मला २ कोऱ्या कागदावर सह्या मागितल्या. घाईगडबडीत मी त्या केल्या. १० मिनिटांनंतर मला तुमची पत्नी व बाळ दोघेही मृत झाले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले, असेही एखंडे यांनी तक्रारीत नमूद केले. 

 

निष्काळजीपणा लपवला : 
वैद्यकीय उपचारांतील निष्काळजीपणा लपवण्यासाठी २९ डिसेंबर २०१८ रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता उत्तरीय तपासणीसाठी घेऊन गेले. प्रकरणास वेगळी कलाटणी देण्यासाठी प्रसूतीदरम्यान पत्नीस अती रक्तस्राव झाला असल्याचे सांगितले असून या प्रकरणात ग्रामीण रुग्णालय माजलगाव येथील डॉक्टर व नर्स हे माझ्या पत्नीच्या व बाळाच्या मृत्यूस सर्वस्वी जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कारवाई करावी, असेही रामेश्वर एखंडे यांनी माजलगाव शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.