आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शुल्क न भरल्यामुळे दर्यापुरातील तिनशेच्यावर विद्यार्थ्यांना काढले शाळेच्याबाहेर, संतप्त पालकांचा शाळेत धुडगूस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दर्यापूर- नोटीस पाठवूनही पालकांनी विद्यार्थ्यांचे शुल्क न भरल्यामुळे व्यवस्थापनाने सुमारे तिनशेच्यावर विद्यार्थ्यांना शाळेबाहेर काढल्याने संतप्त झालेल्या पालकांनी शाळेत धुडगूस घातल्याने तणाव निर्माण झाला. ही घटना येथील श्रीमती के.डी सिकची एज्युकेशन अकॅडमी हायस्कूल येथे नववर्षातील पहिल्या दिवशी म्हणजे मंगळवारी (दि. १) घडली. दरम्यान,पालकांनी गैरवर्तन केल्याचा आरोप करीत शाळा व्यवस्थापनाने दिवसभर शाळा बंद ठेवली. या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले.

 
शहरातील मूर्तिजापूर रोडवरील खासगी शाळा सिकची एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित विनाअनुदानित श्रीमती के.डी सिकची एज्युकेशन अकॅडमी हायस्कूल आहे. या शाळेत नर्सरी ते दहावीपर्यंत सुमारे आठशे विद्यार्थी शिक्षण घेत आहे. तालुक्यातील शहरातील सर्व स्तरातील विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. शेतकरी व शेतमजूर वर्गातील काही विद्यार्थ्याच्या पालकांनी चालू वर्षातील शुल्क थकीत ठेवले. दरम्यान शाळा व्यवस्थापनाने गेटवर नोटीस लावून शुल्क भरण्याचे आवाहन संबंधित पालकांना केले. वारंवार सूचना देऊनही पालकांनी शुल्क अद्यापही जमा केले नाही. त्यामुळे शाळा प्रशासनाने ३१ डिसेंबरपर्यंत शुल्क न भरणाऱ्या पाल्यास १ जानेवारीपासून शाळेत पाठवू नये त्यांना शाळेत बसू दिले जाणार नाही. त्याचप्रमाणे ऑटोरिक्षा व इतर वाहनधारकांनीही शुल्क न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत न आणण्याचे गेटवरील सूचनेत म्हटले आहे. गेटवर लावलेल्या सूचनेप्रमाणे आज नववर्षातील पहिल्याच दिवशी शुल्क न भरणाऱ्या सुमारे तिनशेच्यावर विद्यार्थ्यांना शाळेबाहेर काढण्यात आले. विशेष म्हणजे वयाने लहान असणाऱ्या विद्यार्थ्यांचीही काळजी न करता पालकांच्या अनुपस्थितीत त्यांना बाहेर काढण्यात आले. प्रशासनाने बाहेर काढल्यानंतर विद्यार्थी शाळेबाहेरच्या परिसरात पालकांची वाट बघत उभे राहिलेत. ही बाब जेव्हा पालकांना समजली तेव्हा संतप्त पालकांनी मुख्याध्यापिकांसह प्रशासनाला धारेवर धरले. चिमुकल्या मुलांना बेजबाबदारपणे बाहेर काढून एकटे सोडणाऱ्या प्रशासनाचा निषेध केला. दरम्यान, पालकांनी गैरवर्तणूक केल्याचा आरोप करून मुख्याध्यापकांनी सुटी जाहीर करून शाळा बंद केली. यावर शिवसेनेचे तालुका प्रमुख गोपाल अरबट,विधानसभा प्रमुख रवी कोरडे ,गणेश साखरे आदींनी तातडीने शाळा गाठून मुख्याध्यापिका दीपाली टालेंना जाब विचारला व पं.स. गटशिक्षणाधिकारी प्रकाश घाटे यांना बोलावून घेतले. मात्र शाळा संचालक चूक मान्य करण्यास तयार नव्हते. या प्रकरणी सुधीर अरबट यांनीही भेट देऊन चौकशी केली. 

 

संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार 
फी न भरल्यावरून विद्यार्थ्यांना बाहेर काढल्या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल.शाळा प्रशासनाने पालक सभा बोलावून चर्चा करुन तोडगा काढावा.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यांची शाळा प्रशासनाने दखल घेणे गरजेचे आहे. प्रकाश घाटे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी पं.स. दर्यापूर . 

 

सूचनेतून अरेरावी 
शाळेच्या सूचना फलकावर फी भरण्याबाबतचे लावण्यात आलेल्या बँनरवर अरेरावीची भाषा वापरली. मंगळवारी विद्यार्थ्यांना बाहेर काढणे हा प्रकार शाळा प्रशासनाचा एका प्रकारे मनमानीच केल्याचे दिसून येते. सूचनेचा व विद्यार्थ्यांना वर्गामध्ये बसू न देण्याचा आम्ही निषेध करीत आहो.शाळा प्रशासनाने सर्व पालकांसमोर जाहीर माफी मागावी ही रास्त अपेक्षा आहे. - संजय मनोहरे, पालक . 

 

शुल्क भरण्यासाठी दिले वारंवार पत्र 
पालकांना शुल्क भरण्याबाबत अनेक वेळा पत्र व्यवहार केला.तसेच नोटीसही बजावल्या. मात्र शुल्क न भरता मंगळवारी काही पालकांनी अरेरावी करीत गोंधळ घातला. यावर शाळा संचालकांच्या आदेशानुसार शाळा बंद ठेवली आहे . दीपाली टाले, मुख्याध्यापिका, सिकची हायस्कूल 

 

प्रकार संतापजनक 
शैक्षणिक शुल्क न भरल्याच्या कारणावरुन विद्यार्थ्यांना बाहेर काढणे हा प्रकार संतापजनक आहे.शेतकरी वर्ग आपल्या पाल्यांची फी तूर,कापूस,हरभरा विकल्यावर भरु शकतो. त्यामुळे शाळा प्रशासनाने सामंजस्याने तोडगा काढून शेतकरी,गरीब पालकांना थोडा अवधी द्यावा. गोपाल अरबट,शिवसेना तालुका प्रमुख, दर्यापूर. 

 

शाळेचा निर्णय अतिशय चुकीचा 
शाळेने घेतलेला निर्णय अतिशय चुकीचा आहे.फी न भरल्याच्या कारणावरून विद्यार्थ्यांना बाहेर काढणे हे शाळा प्रशासनाचे अशोभनीय कृत्य आहे. शुल्क भरण्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणे या गंभीर प्रकाराची शिक्षणमंत्री, शिक्षणाधिकारी यांनी तातडीने दखल घेऊन पालकांना न्याय द्यावा. तसेच भविष्यात अशा घटना घडणार नाहीत,याची शिक्षण विभागाने खबरदारी घ्यावी. - विनोद वानखडे, पालक.