आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पिं.रेणुकाई/ हसनाबाद- दोन मुलीनंतर वंशाचा दिवा म्हणून मुलगा जन्मला. मुलीला आराम मिळावा म्हणून सासरहून बाळंतपणाच्या देखरेखीसाठी माहेरी आणले. आई, आजीने बाळाला पेन्टा लस देण्यासाठी हसनाबादच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. लस दिल्यानंतर दोघी गावाकडे परत जाऊ लागल्या. परंतु, रस्त्यात बाळ मान टाकू लागल्याने पुन्हा रुग्णालयात नेले. परंतु, अर्ध्या तासातच बाळाचा मृत्यू झाला. बाळ गेल्याचे कळल्यानंतर आई आणि आजीने आजीने टाहो फोडला. यामुळे रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. दरम्यान, बाळाच्या मृत्यूप्रकरणी नातलगांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तर पालकांनी मृत बालकाला लसीकरणासाठी आणले होते, अशी तक्रार पोलिसांत दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा गुंता वाढला आहे.
रंजना मनोज सोनवणे हिचा फुलंब्री तालुक्यातील खामगाव येथील मनोज सोनवणे यांच्याशी २५ मार्च २०१० रोजी विवाह झाला. दरम्यान, रंजनाला पहिल्या दोन्हीही मुली झाल्या. दरम्यान, २२ ऑक्टोबर २०१८ रोजी मुलगा झाला. दोन मुलीनंतर मुलगा झाल्याने दोन्हीही कुटुंबामध्ये आनंद साजरा करण्यात आला. दरम्यान, बाळंतपणात मुलीला आराम राहावा व मुलाचे संगोपन माहेरी व्हावे, या उद्देशाने रंजनाला माहेरी सावखेडा येथे आणले होते. दरम्यान, मुलाला काही आजार होऊ नये, म्हणून बुधवारी सकाळी ११ वाजता हसनाबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लस देण्यासाठी दाखल केले. तेथे परिचारिकेने सचिनला पेन्टा लस दिली. लस दिल्यानंतर मुलाची आई, आजी गावाकडे जाण्यासाठी निघाल्या. परंतु थोड्या अंतरावर जात नाही तोच मुलगा एकदम थंड पडला. त्याने मान टाकल्याने पुन्हा आरोग्य केंद्रात नेले. पण काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. आई आणि आजीने टाहो फोडल्याचे ऐकून परिसरातील बहुतांश नागरिक गोळा झाले. काहींनी याबाबत त्यांच्या घरच्यांना माहिती दिली असता, नातेवाइकही आले. आक्रमक झालेल्या काही नातेवाइकांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी प्रकरण चौकशीवर ठेवले आहे.
मृतावस्थेत मुलाला दाखल केले : डॉक्टर
वैद्यकीय अधिकारी डॉ. ए. एच. देवरीकर यांनी भोकरदन ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार सचिन याला मृतावस्थेत त्याच्या पालकांनी सरकारी दवाखान्यात दाखल केले. त्यामुळे परस्पर विरोधी तक्रारीनंतर बालकाचा मृत्यू प्रकरणातील गूढ आणखीनच वाढले आहे.
तपासातच सत्य कळेल
पोस्टमार्टेम अहवालात नेमका बाळाचा मृत्यू कशामुळे झाला हे समोर येईल. आता सध्यातरी मृत्यूचे कारण सांगता येणार नाही. पोलिस तपास करतीलच. डॉ. डॉ. विवेक हतगावकार, आरोग्य अधिकारी, जालना.
औरंगाबादला शवविच्छेदन
बाळाचा मृत्यू झाल्यानंतर त्या ठिकाणी शवविच्छेदन होऊ नये म्हणून नातेवाइकांनी आक्रमक पावित्रा घेतला होता. यामुळे डॉक्टरांनी मुलाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात वाहनाने पाठवला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.