आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमल मदर केअर सेंटरमध्ये चेंबर्सचे जाळे, बेकायदा गर्भपातानंतर भ्रूण वाहून थेट गटारीत जाईल अशी व्यवस्था

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 औरंगाबाद - विमल मदर केअर सेंटरमधील गर्भलिंगनिदान आणि बेकायदा गर्भपात प्रकरणाचा 'दिव्य मराठी'ने पर्दाफाश केल्यानंतर या दवाखान्यातील तळघरात असलेले चेंबर पोलिसांनी मंगळवारी उघडले. त्या वेळी अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. तळघरातील तीन खोल्यांमध्ये एकूण चार चेंबर्स आढळून आले. बेकायदा गर्भपात केल्यानंतर या चेंबर्समध्ये भ्रूण टाकून थेट गटारीमध्ये जाईल अशी व्यवस्था करण्यात आली असावी, असा संशय पोलिसांना आहे. एका भिंतीवर रक्ताचे काही डाग असल्याचेही आढळले असून इमारतीमधील चेंबरची रचना पाहून पोलिसही चक्रावले आहेत. 


पोलिसांनी इमारतीमधील सगळे चेंबर उघडून त्यांची पाहणी केली. या पाहणीत पोलिसांना अनेक संशयास्पद गोष्टी सापडल्या आहेत. दवाखान्यासमोर पार्किंगमध्ये फरशीखाली ३ मीटरचे मोठे चेंबर, त्यात बोअरचे कनेक्शन अाहे. या बोअरच्या कनेक्शनमधून पाणी सोडल्यास जोरात प्रवाहामुळे चेंबरमधील वस्तू वाहून जाईल अशी रचना करण्यात आली आहे. फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार या प्रकरणाचा तपास केला जात आहे. 


या इमारतीतील चेंबरची ज्या पद्धतीने रचना करण्यात आली आहे, त्या इमारतीची ती गरज आहे का, याचीदेखील माहिती वास्तुविशारदांकडून घेतली जाणार आहे. या कारवाईच्या वेळी मनपाचे उपअभियंता के.डी. गायकवाड यांच्यासह आरोग्य अधिकारी नीता पाडळकर, सहायक पोलिस निरीक्षक श्रद्धा वायदंडे आणि उपनिरीक्षक मीरा लाड उपस्थित होत्या. पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद व उपायुक्त डॉ. राहुल खाडे या तपास पथकाला मार्गदर्शन करीत आहेत. 


कलमे वाढण्याची शक्यता 
या प्रकरणात कलम ३१५, ३४, सह कलम २३ पीसीएनडीटी अॅक्टसह कलम ३७, ४१ मेडिकल प्रॅक्टिशनर अॅक्टनुसार उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 


मागील १३ दिवसांत नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. यात राणासह चार डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. राणानंतर अटक करण्यात आलेल्या डॉक्टरांना वेळ मिळाल्यामुळे त्यांनी गर्भपाताचे पुरावे नष्ट केल्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. त्यामुळे या प्रकरणात कलम २०१ वाढू शकते, अशी शक्यता निर्माण झाली आहे. 

 

तळघरातील सर्व चेंबरची १२ इंच पाइपलाइन 
१. विमल मदर केअर सेंटर हे दोनमजली आहे. तळमजल्यावर ऑपरेशन थिएटर, पहिल्या मजल्यावर ओपीडी, दुसऱ्यावर निवासस्थान आहे. 
२. तळघरात पाच खोल्या आहेत. त्यापैकी तीन खोल्यांत रुग्णांना राहता येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक खोलीत दोन पलंग ठेवण्यात आले आहेत. 
३. ज्या ठिकाणी रुग्ण राहतात त्या एका खोलीत दोन चेंबर आणि दुसऱ्या दोन खोल्यांत एक-एक चेंबर आहे. 
४. दवाखान्याच्या समोर असलेल्या पार्किंगमध्ये तीन मीटर म्हणजे किमान नऊ ते दहा फूट खोल चेंबर आहे. तळघरातील सर्व चेंबरची किमान १२ इंच पाइपलाइन या चेंबरला जोडलेली आहे. 
५. या चेंबरमध्ये बोअरचे पाणी सोडले जात असल्याचेही प्राथमिक तपासात निदर्शनास आले आहे. जेणेकरून चेंबरमध्ये काही अडकल्यास बोअरचे पाणी सोडल्यास ते वाहून जाऊ शकेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. 
६. तळघरात असलेल्या लेबर रूममध्ये भिंतीवर रक्ताचे शिंतोडे असल्याचेही समोर आले आहे. 
तळमजल्यावर ज्या ठिकाणी रुग्ण राहतात त्या एका खोलीत २ चेंबर हाेते. 


काय म्हणतात तज्ज्ञ 
१. दोनमजली इमारतीसाठी चेंबरच्या पाइपलाइनसाठी वापरण्यात येणारा पाइप हा जास्तीत जास्त ६ इंच असावा. त्यापेक्षा माेठा गरजेचा नाही. 
२. तळघरात पावसाचे पाणी जाण्यासाठी डक चेंबर असते किंवा शौचालय अथवा इतर ठिकाणाहून येणारे पाणी पंप करावे लागते. मात्र विमल मदर केअर सेंटरमध्ये पंप करण्याची कुठलीही सुविधा नसल्याचे दिसून आले आहे. तळघर आणि पार्किंगमधील चेंबर्स एकाच रांगेत अाहेत. त्यामुळे तळघरात डक चेंबरमध्ये टाकलेली वस्तू थेट पार्किंगमधील मोठ्या चेंबरमध्ये जाते. 
३. पार्किंगमधील मोठ्या चेंबरचे कनेक्शन काही फुटांवर असलेल्या महापालिकेच्या मुख्य ड्रेनेज पाइपलाइनला जोडण्यात आले आहे. 
४. पोलिसांना फॉरेन्सिक तज्ज्ञांना घेऊन तसा डेमो करावा लागेल. 


या इमारतीत अशा प्रकारच्या चेंबरची आवश्यकता आहे का, हे जाणून घेण्यासाठी 'दिव्य मराठी'ने मनपाचे उपअभियंता के.डी गायकवाड अाणि वास्तुविशारद सुनील भाले यांना विचारले असता ही माहिती समोर आली. 


 

बातम्या आणखी आहेत...