आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बजाज'मधून बोलतोय म्हणत ओटीपी मागून ऑनलाइन खरेदी करून गंडवले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- बजाज फिनसर्व्हमधून बोलतोय, असे सांगून ओटीपी नंबर विचारत ऑनलाइन खरेदी करून फसवणूक करणाऱ्या एका तरुणाला सायबर सेल व गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी जेरबंद केले. 


प्रदीप हिरालाल तुरी (वय २३, रा. अशोक टाॅवर, मरोळ, मुंबई, मूळ गाव झारखंड) याला शुक्रवारी नवीन डी-मार्टजवळ ताब्यात घेण्यात आले. ऑनलाइन खरेदी केलेले मोबाइल विकण्यासाठी तो सोलापुरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून ही कारवाई झाली. रमेश परबळकर (रा. घोंगडे वस्ती, भवानी पेठ सोलापूर) यांची २६ मे रोजी फसवणूक झाली होती. 'बजाज फायनान्समधून बोलतोय. तुमचे कार्ड नूतनीकरण करावयाचे आहे,' असे सांगून त्यांच्या ईएमआय कार्डची माहिती त्याने घेतली होती. मोबाइलवर आलेला ओटीपी नंबर विचारून ऑनलाइन फ्लिपकार्टवरून ३३ हजारांचे साहित्य खरेदी केले. 


याबाबत त्यांनी जोडभावी पोलिसात फिर्याद दिली होती. याचा तपास सायबर सेल पथकाकडून सुरू होता. फौजदार मधुरा भास्कर व त्यांच्या पथकाने फ्लिपकार्ट व बजाज फिनसर्व्ह कंपनीकडून तांत्रिक माहिती जाणून घेतली. या गुन्ह्यात वितरीत झालेला मोबाइल प्रदीप तुरी याच्याकडे झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्या अनुषंगाने तपास सुरू असताना तो शुक्रवारी सोलापुरात मोबाइल विक्रीसाठी येणार असल्याचे समजले. त्यावरून ही कारवाई करण्यात आली. एकूण सहा महागडे मोबाइल, एक लॅपटॉप, मोबाइलच्या पावत्या व अन्य साहित्य मिळून आले. त्याच्याकडे अजून चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी दिली. 


या पथकाकडून कारवाई 
उपायुक्त पौर्णिमा चौगुले, सहायक आयुक्त अभय डोंगरे, पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांच्यासह जयंत चवरे, अशोक लोखंडे, राजेश चव्हाण, शंकर मुळे, सुहास अर्जुन, अमोल कानडे, वसीम शेख, संतोष येळे, बाबू मंगरूळे, प्रवीण शेळकंदे, पूजा कोळेकर, काकडे. 


बोलण्यात गुंतवून ओटीपी विचारतात... 
प्रदीप याचा भाऊ झारखंडमध्ये राहतो. गावच्या अासपास गरीब कुटंुबाच्या नावे आधार कार्ड व अन्य ओळखपत्र मिळवतो. त्याच्या आधारे ऑनलाइन खरेदीसाठी बनावट फोन करून ओटीपी विचारतो. त्यानंतर बोलण्यात गुंतवून ठेवून ओटीपी सांगण्यास भाग पाडतो. ओटीपी आल्यानंतर ऑनलाइन खरेदी तत्काळ होते. त्यामुळे डेबिट नागरिकाच्या नावे पडते. खरेदी मात्र त्यांच्या नावे होते. प्रदीपवर सातारा व अकोल्यात गुन्हे दाखल आहेत. नागरिकांनी ओटीपी कोणासही सांगू नये, सावध राहावे अशी माहिती फौजदार भास्कर व खेडकर यांनी दिली. मूळ संशायिताला शोधण्यासाठी एक पथक जाणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...